Tuesday, April 14, 2015

फ़्लॅशबॅक : पिंजर


सिनेमाच्या यच्चयावत ब्लॉग्जवर सगळेजण नव्या सिनेमांबाबत लिहित असताना मी हा जुना सिनेम का बरं काढून बसले?(त्यात पुन्हा इतक्या मोठ्या विश्रांतीनंतर लिहित असताना). सांगायला कारण  काहीच नाही. पण काही काही कलाकृती मनात असतात, त्या त्या वेळेस काही कारणानं त्यावर लिहिणं होत नाही. मग पुन्हा काहीतरी निमित्त होतं आणि मनातलं उतरवावसं वाटू लागतं. मुळात हा ब्लॉग चित्रपट समिक्षणाचा वगैरे नाहीच आहे, सिनेमाच्या प्रचंड प्रेमापोटी या विषयावर मला जे जे लिहावासं वाटतं त्यासाठी आहे.
सिनेमाचा अभ्यास करत होते तेंव्हाच्या काळात प्रबंधाचा विषय होता, "कादंबरी आणि त्यावर आधारीत चित्रपट"....मुळात अभ्यास करत होते म्हणून नव्हे तर त्याही आधीपासून कागदावरची कथा पडद्यावर उतरते ती प्रक्रिया मला जाम आवडायची. अरे पुस्तकात हे असं लिहिलं होतं आणि पडद्यावर हे असं दिसतंय अशी तुलना मनात अजाणता होत रहायची. या विषयावर केलेल्या प्रबंधानं इतकंच झालं की, या सगळ्या प्रक्रियेकडे आता तंत्रशुध्द पध्दतीने बघता येण्याची नजर मिळाली. साहित्यकृतींवर आधारीत असे अनेक चित्रपट इतक्या वर्षांत पाहिले. काहिंच्या नोंदी झाल्या, काही नाही. काही नोंदी पुन्हा पुन्हा चित्रपट पहात गेल्यावर बदलल्या. पहिल्यांदा पहाताना झालेल्या नोंदीमध्ये आणि नंतरच्या नोंदीत बदल होत गेले. कसं असतं नं, आपण एखाद्या नवीन गावाला पहिल्यांदाच जात असतो त्यावेळेस पहिल्यांदा प्रवास करत असताना आपण मागे धावणारी झाडं, आजूबाजूचा परिसर पहात जातो, नंतरच्या दोन तीन प्रवासांत पहिल्यावेळेसच्या बघण्यात तपशिलवार निरीक्षणं जोडली जातात, तसंच हे आहे.
खूप वर्षांनी परवा झी क्लासिकवर पिंजर बघतानाही असंच झालं. बरंच काही असं होतं जे नव्यानं उमगत होतं. सिनेमा नवा नवा आला होता तेंव्हा अर्थातच त्याची चर्चा खूप होती. एका अत्यंत रसरशीत, जीवंत साहित्यकृतीवर आधारीत चित्रपट आणि उर्मिला मातोंडकरसाखी तद्दन व्यावसायिक चित्रपटांतील अभिनेत्री सोबत छोट्या पडद्यावरून आलेला गुणी मनोज वाजपेयी चंद्रप्रकाश व्दिवेदींसारखा दिग्दर्शक या सगळ्याचीच चर्चा जास्त होती. अर्थातच पहिल्यांदा चित्रपट बघताना किमान माझं तरी असं झालं की मी उर्मिलाचंच प्रगती पुस्तक उघडून बसले. तिला एकूण हे सगळं कितपत पेलतंय हे पहाणंच मला जास्त महत्वाचं वाटलं असणार, शिवाय या कथेला असणारा हिंदू-मुस्लिम धर्माचा, हिंदूस्थान-पाकिस्तान फ़ाळणीचा करकरीत काठ जरा बोचरा होताच. मग झाला नां गोंधळ.  बाकीचे तपशिल अनावधानानं फ़िकुटले. ते सारे तपशिल यावेळेस बघताना अधोरेखित होत समोर आले.
खरी गोष्ट पुरो आणि रशिद यांची असली तरिही कथेचा कॅनव्हास इतका जबरी की त्यात अपरिहार्यपणे पुरोचे जमिनदार  वडील, तिचा भावी पती रामचंद, जो जमिनदार असूनही पुढारलेल्या विचारांचा आहे, आगतिक आई, बहिणीवर माया करणारा भाऊ आणि त्याची अल्लड बायको हे सगळे महत्वाच्या भूमिका बजावतात. पुरो आणि रशिदची गोष्ट जास्त परिणामकारक होते ती या सगळ्यांमुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुरो हिंदू आणि रशिद मुस्लिम असल्यानं या सगळ्याला वेगळी धार लाभते. गोष्ट फ़ाळणीपूर्व हिंदूस्थानात सुरू होते आणि फ़ाळणीनंतरच्या भळभळीत काळात संपते. या गोष्टीतली मला सगळ्यात जास्त आवडलेली बाब म्हणजे एका वळणानंतर इथे हिंदू किंव मुस्लिम हे महत्वाचं न रहाता माणूसपण अधोरेखित होत जातं. माणूसपण म्हणजे अर्थातच माणुसकी नव्हे. मनुष्य हा देखिल प्राणी आहे आणि प्राणी हे जंगलीही असतात. प्राण्यांना जात नसते, धर्म तर अजिबातच नसतो. म्हणूनच फ़ाळणीची हिंदू-मुस्लिम पार्श्वभूमी या कथेत प्रवेशल्यानंतर हिंदू पुरो आणि मुस्लिम रशिद ही माणसं बनतात आणि बाकी सगळं धर्माचे मुखवटे घेऊन जंगल बनतं. या कथेत कोणते धर्मिक जास्त हिंस्त्र बनले याच्या तपशिलात न जाता पुरो आणि रशिदच्या गोष्टीचा धागा अत्यंत चिकाटीनं हातात ठेवण्याची कसरत जशी लेखिकेनं कागदावरच्या गोष्टीत यशस्वीरित्या पेलली आहे तशीच ती रूपेरी पडद्यावर दिग्दर्शकानंही पेलंली आहे. (नाहीतर पिंजरचा गदर होण काही फ़ार कठीण नव्हतं :)) फ़ाळणीची जखमच अशी आहे की ती उघडी होते तेंव्हा भळभळा वाहू लागते. अजूनही एक पिढी अशी आहे की तिच्या या आठवणीच्या जखमा ताज्या आहेत. हे होणं अर्थात सहाजिकच आहे.  तरिही या तपशिलांत जाण्याचा मोह आवरत ज्या आटोपशिरपणानं कथा या सगळ्या पार्श्वभूमीला बगलेत घेत पुढे जाते ते इतकं सहज घडलं आहे की वाचताना वाचक आणि पहाताना प्रेक्षकही या सगळ्यात अडकून पडत नाही. पुरो आणि रशिदच्या या पिंजरचा हा मला सगळ्यात मोठा गुण वाटतो.
फ़ाळणी जशी पार्श्वभूमीवर ठेवत हा चित्रपट पुढे सरकतो तसंच आणखी एक अगदी नोंद घेण्याजोगं परिवर्तन म्हणजे पुरोचं हळूहळू हमिदा बनणं. त्या काळाचा विचार करता पुरोनं रशिदला कबुल है म्हटल्यानंतरच ओघानंच तिचा धर्म बदलणं सहाजिक होतं. तरिही एकदम धप्पकन अंगावर आल्यागत तिचा धर्म बदलत नाही. सर्वात आधी तिचं दिसणं बदलतं मग नातेवाईकांच्या आग्रहाखातर रशिदचं तिच्या मनगटावर हमिदा गोंदविणं (जे त्या काळात सर्रास केलं जात असे) घडतं आणि पुरोची हमिदा बनून जाते. तरिही रशिदसमोर ती पुरो म्हणूनच उभी असते. ही आतली बाहेरची घालमेल आहे ती उर्मिलानं अचूक पोहचविली आहे. जे पहिल्यांदा चित्रपट बघताना (२००३) नोंदविण्याचं निसटून गेलं होतं, ते या वेळेस असं लख्खकन दिसलं. मुलगी ते पोक्त बाई आणि हिंदू मुलगी ते मुस्लिम गृहिणी हा प्रवास काही मिनिटात स्वीच ऑन, स्वीच ऑफ़ सारखा झाला हे जाणवू न देता अलगद समोर आणणं हे चित्रपटात कसरतीचं. कारण काही मिनिटांपूर्वीची रशिदचा व्देष करणारी पुरो रशिदसोबत संसार करू लागली, तिनं बंड केलं नाही की स्वत:ला संपविण्याचा फ़िल्मी नाटकीपणा केला नाही तरिही तिची चीड न येता रशिद तिला ज्या सहजतेनं स्वीकारतो त्याच सहजतेनं प्रेक्षकही स्वीकारतो. ही कसरत पेलणं कठीण काम होतं. तिचं बदलणं खड्यासारखं दातात न येता पुढे सरकतं आणि पात्रं महत्वाची न होता कथा महत्वाची ठरते.
पुढे लज्जोला-पुरोची वहिनी- वाचविताना तिच्या मदतीला हे मनगटावर गोंदलेलं हमिदा धावून येतं त्यातही अभिनिवेश नाहीच. एकाच कुटुंबातील दोन मुलींसोबत घडलेली घटना सारखीच मात्र लज्जोला कुटुंबानं स्वीकारणं आणि पुरोला नाकारलेलं असणं हेदेखिल पुरो समंजसपणानं स्वीकारते. फ़ाळणीनंतर काळ बदलला आहे आता मुस्लिमांनी पळवून नेलेल्या हिंदू मुली पुन्हा कुटुंबात परतत आहेत आणि कुटुंबियही त्यांना आपलसं करत आहेत हे समाज परिवर्तन अलगद उलगडत जातं. काही वर्षांपूर्वीच पुरोला मात्र कुटुंबियांनी नाकारलेलं असतं. आता संधी आहे आणि पुरोदेखिल परतू शकते. तिच्या परतण्याला रशिदची हरकत नाही तसंच तिला स्विकारण्यात तिच्या कुटुंबियांबरोबरच रामंदचीही (जो अद्याप अविवाहीत आहे)हरकत नाही. आता पुरोला मनाचा कौल घ्यायचा आहे. मनाच्या एका कोपऱ्यात रामचंदची पत्नीच असण्याची इच्छा बाळगून जगलेली पुरो, रशिदशी नाईलाजानं बांधलं गेल्याचं दु:ख घेऊ जगणारी पुरो अखेर रशिदच्या माणुसकीपुढे हार मानते. त्यानं केलेल्या गुन्ह्याला माफ़ करून टाकते आणि हिंदूस्थानात जाणाऱ्या नातेवाईकांना रशिदसोबत निरोप देते.  कथेचा शेवट काहीसा अपेक्षीतच असला तरिही पुरोच्या त्या निर्णयाची आपण वाट बघतो. अखेरच्या पानावरचा शेवट आणि अखेरच्या रीळातला शेवट तितकाच परिणामकारक असणं हे दोन्ही कलाकृतींचं यश आहे.
अर्थातच कादंबरी आणि चित्रपट अशी तुलना होते तेंव्हा माझा स्वत:चा कौल थोडा कादंबरीच्या बाजूनं झुकलेला असतो कारण कथा वाचताना तिच्यातली पात्रं आपण आपल्या मनात उभी केलेली असतात. त्यांच्या दिसण्यापासून वागण्या बोलण्यापर्यंतचे तपशिल आपण मनाशी चितारलेले असतात. पडद्यावर ही कथा उतरत असताना दिग्दर्शकाच्या मनातली पात्रं उभी रहातात आणि बऱ्याचदा त्यांच्या आणि आपल्या प्रतिमेत तफ़ावत दिसते मग समोर कितिही छान गोष्ट उभी रहात असली तरिही मनातल्या मनात तुलना होत समोरचं दिसणं फ़टकारलं, नाकारलं जात असतं (शाळा आणि दुनियादारीच्यावेळेस हा अनुभव अगदी प्रकर्षानं आला. स्वतंत्र कलाकृती म्हणून विचार केला तर दोनही चित्रपट सरस आहेत यात शंकाच नाही मात्र ज्यांनी पुस्तकरूपी कथा वाचल्या आहेत त्यांना चित्रपट तितका भिडला नाही हे देखिल वास्तव. असो.) पिंजरच्याबाबतीत मात्र हे तितकं होत नाही ही सुदैवाची गोष्ट म्हटली पाहिजे. त्या काळातलं लोकांचं दिसणं असो, गाव असो की कपड्यांचे आणि एकूणच फ़िल्मच्या रंगाचा पोत असो, मूळ कथेच्या जवळपास रहात पडद्यावर कथा साकारत जाते. ज्या प्रकारचा अभिनय या कथेत आवश्यक आहे तो सगळीचपात्रं साकारतात विशेषत: उर्मिला साकारते ही आणखी एक जमेची बाजू. पहिली काही मिनिटं ती रामूच्या, डेव्हिड धवनच्या चित्रपटातली उर्मिलाच वाटते, तेच एक्सप्रेशन्स, तेच भेदरलेले डोळे आणि वावर मात्र रशिद तिला पळवून नेतो त्या प्रसंगानंतर तिला भूमिकेचा सूर सापडल्यासारखी वाटते. हे बेअरींग अखेरच्या रीळापर्यंत कायम राहिलेलं आहे हे महत्वाचं. रशिद अर्थात मनोज वाजपेयी तर बाप माणूस आहे. एका क्षणात त्याची चीड यावी तर दुसऱ्याच क्षणात त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी हे अभिनयातून सहजगत्या केवळ तोच पोहचवू शकतो. इथेही त्याचा रशिद कव्हिसिंग होण्यात त्याच्या अभिनयाचा वाटाच महत्वाचा ठरला आहे. आपण केले कृतीचा पश्चाताप मनात घेऊन वावरणारा र्शिद, पुरोवर मनापासून प्रेम करणारा रशिद, काही काळापुरता बेभान झालेला आणि नंतर संयमी, समंजस झालेला रशिद, पुरोला मदत करणारा, तिला समजून घेणारा रशिद त्यानं अत्यंत बारकाव्यांसहित साकारला आहे.
या चित्रपटापूर्वीही खलनायकालाच नायक बनविण्याचा प्रयत्न करणारे तद्दन फ़ालतू तरिही गल्ला जमा केलेले अनेक चित्रपट येऊन गेले असले तरिही खलनायकाचा नायक सहजगत्या बनविणं, दर्शकांना यासाठी कन्व्हिन्स करणं काय असतं याचा धडा घ्यायचा असेल तर या सगळ्या हिरोंनी मनोजचा पिंजरमधला अभिनय पहावाच.