Sunday, August 1, 2021

चौदा फेरे

 


याचे प्रोमोज बघून कधी एकदा रिलीज होतोय असं झालेलं. राॅमकाॅम हा आवडता प्रकार आणि फिलगूड जाॅनर् असल्यानं चौदा फेरेची उत्सुकता होतीच.
मात्र, विक्रांत आणि कीर्ती अशी वेगळी कास्टिंग असणारा चौदा फेरे जमता जमता राहिलेली दम बिर्याणी आहे. फसलेली म्हणणार नाही. कारण अगदीच फसलेली नाही, फक्त अतिप्रचंड predictable गोष्ट अतिप्रचंड predictable पात्रं आणि एकूण प्रवासही predictable. इतका की इथे स्पाॅयलर्स अलर्टही द्यायला नको.
दोन भिन्न जातीतले नायक नायिका कुटुंबातल्या कट्टरतेला बघता फेक आईवडील उभे करून लग्नाला उभे रहातात या गोष्टीत जे जे काही घडू शकतं ते ते पडद्यावर घडत रहातं.
मुळात ट्रेलरमधे दाखवल्याप्रमाणे हे दोघे एकदा नायकाच्या गावाला आणि एकदा नायिकेच्या गावाला जाऊन लग्न करतात. यात एक आईवडिलांची खोटी जोडी उभी करतात. जी नायिकेच्या कुटुंबाला नायकाचे आईवडिल म्हणून भेटतात तर नायकाच्या कुटुंबात नायिकेचे आईवडिल म्हणून भेटतात. आणि नेमकं हेच कारण आपल्याला सिनेमा बघण्यासाठी एक्साईट करतं. खरंतर या प्लाॅटमधे कहर घडामोडी घडू शकतात. पण सिनेमात त्या घडतच नाहीत आणि आपण अपेक्षाभंग घेऊन बसतो.

प्रियदर्शन सारख्यानं या प्लाॅटवर हास्याची इमारत उभी केली असती. इथे मात्र प्रचंड पोटेन्शियल असणारी स्क्रिप्ट घासून गुळगुळीत ट्रॅकवर घसरत जाते.

तुम्हाला 2004 ला प्रदर्शित झालेला प्रियदर्शन चा हलचल आठवतोय? त्यात जसा सगळा गैरसमजांचा , नात्यांचा गुंता होत जातो तसं काहीतरी चौदा फेर्‍यात होईल असं वाटत असताना गोष्ट फारशी गडबड गोंधळ न करता क्लायमॅक्स कडे जाते.

याचं कास्टिंग मस्त आहे. सगळ्यानी जीजानसे काम केलेलं आहे. गौहर खानला जास्त भावखाऊ भूमिका मिळालेली आहे आणि तिनं चीज केलं आहे. बाकी विक्रांत च्या जागी एका पाॅईंटनंतर आयुषमान असता तर? वाटत रहातं.
या सिनेमाला मी बनता बनता राहिलेली बिर्याणी म्हणण्याचं कारण हेच आहे. सगळे घटक अचूक प्रमाणात जमवलेले आहेत. मात्र खाताना जाणवतं, अरेच्चा यात मीठच नाही, भातही कच्चट शिजलाय. मग इतकावेळ पसरलेला सुगंध धत्त तेरी फिलिंग देतो.

जस्ट टाईमपास हवा असेल आणि थोडं सहन करायची तयारी असेल, विक्रांत चे फॅन असाल तर एकदा बघण्याइतपत आहे.

त.टी. - 1- हा सिनेमा संपल्यावर लगेचच आटोप्ले मोडवर ऑलटाईम फेवरेट सोचा नं था लागला. या रिव्ह्यूवर सोचा न था च्या मूडचा परिणाम असण्याची शक्यता गृहीत धरा आणि नाही आवडले चौदा फेरे तर मला दोष देऊ नका😉

#14Phere
#vikratmassy#kirtikharbanda