Monday, August 26, 2019

बाॅलिवुडचा नवा patriotism



बाॅलिवुडमधे देशभक्तीपर सिनेमे म्हणजे एकतर जेपी दत्ताछाप वाॅरपट किंवा भारतकुमार म्हणून ओळखल्या जाणार्या मनोजकुमारचे देशभक्तीपर सिनेमे इतकंच सिमित विश्र्व होतं. मात्र गेल्या दोन तीन वर्षात बाॅलिवुडनं या  genre मधे कात टाकत अलिकडचा इतिहास मांडायला सुरवात केली आहे.
साधारण बेबीपासून याचा आगाज झाला आणि व्हाया ऊरी बाटला हाऊस पर्यंत  आपण थेट नावं घेत मांडणी करण्याइतके धीट झालो आहोत.
भारत गेली अनेक वर्षं आतंकवादाशी झुंजत आहे.  आतंकवादाला रंग किंवा धर्म नसतो हे क्लिशे वाक्य प्रचलात येण्याआधीपासूनच एक रंग मात्र सतत याच्याशी जोडला गेला. एक धर्म त्यातल्या सिलेक्टिव्ह कडवेपणासहित सतत आतंकवादी कारवायांमुळे देशाच्या नाही तर जगाच्या बातम्यांत आणि नजरेत येत राहिला.  अलिकडेच आलेले दोन चित्रपट, इंडियाज मोस्ट वाटण्टेड आणि बाटला हाऊस देशात झालेल्या आतंकी  हल्ल्यानंतरच्या धरपकडीवर आधारीत आहेत. आज देशात बरेच बदल झालेले आहेत, असे विषय निर्भिडपणे हाताळता येत आहेत हे चांगलं लक्षण आहे कारण कुठे नं कुठे हे विषय येतात तेंव्हा पार्श्वभूमीला तत्कालीन राजकीय घडामोडींचे पदरही असतात. या दोन्ही चित्रपटांची मला आवडलेली ही महत्वाची बाब हीच आहे की, या पाश्र्वभूमीला कुठेही फोरग्राऊंडवर येऊ न देता, आरोपांच्या फिल्मी फैरी न झाडता विषयाशी प्रामाणिक रहात स्क्रिनप्ले लिहिले साकारले गेले आहेत.
इंडियाज मोस्ट वाॅण्टेड-
अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाची कथा , पुण्यातल्या जर्मन बेकरी आणि इतर ठिकाणच्या बाॅम्ब स्फोटांत आरोपी असणार्या , भारताच्या मोस्ट वाॅण्टेड यादीत असणार्या यासिन भटकळच्या मुसक्या बांधण्यात आली त्यावर आहे. बिहार नेपाळ सीमेवर भटकळला अटक करण्यात आली.
चित्रपटाची कथा या ऑपरेशनभोवतीच गुंफली आहे. उगाचंच फापटपसारा  नाही. गुप्तचर संस्थांना हाती लागणारे धागेदोरे आणि त्याआधारे तुटपुंज्या मदतीआधारे केलेली धरपकड बघताना आपण आपल्या सुरक्षयंत्रणांना किती हलक्यात घेतो हे उमजून लाज वाटते.
(मुख्य भूमिकेतल्या अर्जून कपूरनं भूमिका पेलली असली तरिही इथे जाॅन, अक्षय, अभिषेक असं कोणी हवं होतं असं सतत वाटत रहातं.)

बाटला हाऊस
 याच भटकळच्या इंडियन मुजाहिदिननं देशात सिरियल ब्लास्ट करून आतंक माजवला होता. महाराष्ट्र,  गुजरात, राजस्थान, दिल्ली.सगळीच पोलिस दलं अव्याहत   या ब्लास्टमागचे हात आणि मास्टरमाईंड शोधण्यासाठी झटत होते. अशातच दिल्लीच्या स्पेशल सेलला एक धागा हाती लागतो. गजबजलेल्या बाटला हाऊसच्या एका चिंचोळ्या गल्लीतल्या L18 इमारतीत काही आतंकवादी आसरा घेऊन आहेत ही बातमी लागते आणि देशाला हादरवणारं बाटला हाऊस एन्काऊंटर घडतं. हे एन्काऊंटर 2008 साली मिडिया, मानवतावादी संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या भूमिकांमुळे सतत उलट सुलट बातम्यात राहिलं. मुळात हे एन्काऊंटर फेक होतं ही या सगळ्यांची भूमिका होती. जिवावर उदार होऊन, एका ऑन ड्युटी ऑफिसरचा प्राण गमावून पार पाडलेल्या या एन्काऊंटरमुळे स्पेशल पेलला judicial inquiry ला सामोरं जावं लागलं.  अनेक निवडणुकांत विविध पक्षांनी त्याचं भांडवलही केलं मात्र सत्याची अनेक versions असली तरिही शेवटी एकच सत्य उशिरा का होईना, समोर येतं. या घटनेनंतर अनेक वर्षांनी एक व्हिडिओ  प्रसारीत झाला ज्यामुळे हे एन्काऊंटर फेक नसल्याचं फायनली सिध्द झालं.
ही इतकी सगळी पार्श्वभूमी सांगण्याचा उद्देश इतकाच की ताजं सत्तांतर  आणि अलिकडची विवादात अडकलेली घटना असूनही यावर सिनेमा बनविण्याचं धाडस केलं गेलं. मात्र वर म्हणलं तसं हा सिनेमा फक्त या घटनेवर भाष्य करतो. Judicial inquiry ला सामोरं जाताना एकिकडे कर्तव्य आणि दुसरीकडे त्याच कर्तव्यावरचं प्रश्नचिन्ह घेऊन कर्तव्य पार पाडणारा पोलिस फोर्स दिसतो. काहीजणांना हा प्रपोगंडा मुव्ही अगदीच वाटू शकतो पण अनेक सत्यापैकी किंवा सत्याच्या अनेक थिअरीजपैकी पोलिस अधिकारी संजयकुमार याच्या पीओव्हीतून दिसणारं सत्य यात मांडलं गेलं आहे आणि म्हणूनच ते पोलिस यंत्रणेचं सत्य आहे. चित्रपटाला छान गती आहे त्यामुळे तो कुठेही रेंगाळत नाही. फक्त कोर्टप्रकरण फारच पटकन आटपतं असं वाटतं. संजयकुमारांचा एक प्रतिवाद या प्रकरणाचा निकाल लावतो हे फारच बाॅलिवुड स्टाईलनं झालं आहे. वास्तवात ते तितकं सहज नव्हतं.
यात आरोपिंचे वकील त्यांची बाजू मांडतात ते ज्या व्हिज्युअल ट्रिटमेंटनं दाखवलं आहे तो वेगळेपणा आहे. (अशाच पध्दतीची ट्रिटमेंट इत्तेफाकमधेही दिसली होती मात्र इथे ती जास्त परिणामकारक वाटते)
जाॅन अब्राहमला  या प्रकारच्या भूमिका चांगल्या साकारता येतात. त्याचा दगडी  चेहरा अशा भूमिकांना साजेसा आहे. बाकी सगळे जिथल्या तिथे.
-SB