Saturday, September 15, 2018

अनुरागी मनमर्झियां




मनमर्झियां हम दिल दे चुके सनम या सुपरहिट प्रेमकहाणीचा रिमेकसदृश सिनेमा आहे. ट्रेलरवरूनच ते स्पष्ट होत होतं. मग याचा वेगळेपणा काय? का बघावा लोकानी पुन्हा तोच घिसापिटा त्रिकोण? याचं उत्तर अभिषेकची सोकाॅल्ड नवी इनिंग. यातला अभिषेक वेगळाच आहे, वडिलांच्या स्टारडमशी टक्कर देण्याचा त्याचा काळ आता संपलाय, प्रेक्षकांना त्याच्या हिरोगिरीपेक्षा त्याचा अभिनय, भूमिकेतला वावर जास्त महत्वाचा वाटतोय. त्याच्या या मॅच्युरिटीला साजेशा भूमिका जर त्याला मिळत गेल्या तर ही त्याची एक डिसेंट इनिंग ठरेल यात शंकाच नाही.
हम दिल दे चुके सनम मधे अजय देवगण जवळपास अर्धा सिनेमा झाला की येतो. इथे सुरवातीच्या काही मिनिटातच अभिषेक येतो. खेळायला मिळालेल्या जास्तीच्या ओव्हर्स तो मस्त बॅटिंग करतो.
संजय लिला भन्साळीच्या ट्रेडमार्क पोषाखीपटांची सुरवात होता hddcs मोठाले सेट, महागडे पोषाख, सुंदर सुंदर दिसणारी पात्रं, कथेतल्या इमोशन्सही कवितेसारख्या पडद्यावर येणं.... अनुरागचं सादरीकरण अगदी याच्या विरुध्द. तिकडे भव्य सेटस असतील तर इकडे रिअल लोकाशन्सवर कथा वावरते. अम्रितसरच्या जुनकट गल्ल्या, अरूंद बोळ, रंग उडालेली घरं आणि दाटीवाटीनं गल्ल्यात गच्च उभी घरं हे सगळं कथानक   जमिनीवर ठेवायला मदत करतं.
 मुळात अनुरागचं सादरीकरण राॅ जातकुळीतचं. अलवार, हळूवार हे शब्द त्याच्या शब्दकोषातच नाहीत. प्रेमापासून सुडापर्यंत सगळं डार्क शेडमधेच रंगतं त्याच्या पडद्यावर. मनमर्झियांही त्याला अपवाद नाही. कथेत अनावश्यकच सेक्स हे तर त्याचं खास वैशिष्ट्य, अत्यंत गलिच्छ वाटाव्या अशा शिव्या, सिगरेट, दारू यांचे मिनिटा मिनिटाला येणारे सिन्स ही सगळी कश्यपी स्टाईल आहे.  अनुरागच्या कथांतला गुलाबी रंगही करड्यात भिजून येतो.
hddcs चा सगळा हळवारपणा तासून तो कश्यपी मसाल्यात मॅरिनेट होऊन जे समोर येतं, ते म्हणजे मनमर्झियां.
मुख्य तिनही कलाकार मुळातच ताकदीचे आहेत त्यामुळे सिनेमा पकड ढिली सोडत नाही.  एक पूर्ण वेगळा विकी कौशल यात दिसतो. तापसीनं यापूर्वी इतक्या ताकदीच्या आणि वैविध्यपूर्ण मिका केल्यात की हा सिनेमा तिच्यासाठी बच्चों का खेल आहे. रूमी साकारताना तिला किंचितही मेहनत घ्यावी लागली नाहिए. अभिषेक अत्यंत मॅच्युरिटीनं वावरलाय. कश्यपी मसाल्यात स्वतःला त्यानं अजिबात हरवू दिलं नाहिए म्हणून त्याचं विशेष कौतुक.
सिनेमाचा शेवटही बदलला नाहिए. मात्र शेवटाकडे जातानाचा प्रवास छान आहे. hddcs चा शेवट जितका फिल्मी वाटतो तितकाच याचा शेवट सच्चा आणि क्यूट वाटतो.
देव  डी, तनू वेडस मनू, हम दिल दे चुके सनम या सगळ्याची तुरट, तिखट भेळ म्हणजे हा सिनेमा.
लिड कास्ट किंवा अनुराग यापैकी काहीही आवडत नसणार्यानी याच्या वाटेला न गेलेलंच बरं.

उगाच जाता जाता- 1- दोन जुळ्या, नकट्या, बसक्या चेहर्याच्या कन्या एकसारखे कपडे घालून सतत दिसत रहातात. एक वेगळी ट्रीटमेंट म्हणून हे प्रकरण हाताळलं असलं तरिही नंतर नंतर जरा वातच आणतात त्या.
2-एका सिनमधे पोस्टरवरचं भाजपचं कमळ दिसतं. का कुणास ठाऊक, ते लक्षात येतं आणि रहातं.
3- या सिनेमाची जर एखादी टॅगलाईन असती तर ती,'टेक युवर टाईम' असती.
4 - आपल्या घरायल्या तरूण मुलीला भेटायला एक तरूण गच्च्यांवरून उड्या मारून येतो. दार बंद करून जे करायला हवं ते दिवसातून दोनदा करतो (इतकं नियमान कोणी औषधंही घेत नसेल) आणि हे सगळं कुटुंबिय अगदी निव्वांतपणानं मान्य करतात/पचवतात/मूकसहमती देतात . शिवाय तो मुलगा लग्न करत नाही म्हणल्यावर तितक्याच निव्वांतपणानं दुसरा मुलगा शोधतात. मुलगा शोधल्यावर पुन्हा गच्ची हिरो तयार होतो तर निव्वांतपणानं आधीचं लग्न मोडून या गच्ची लग्नाला तयार होतात. हे लग्न मोडलं की पुन्हा बॅक टू स्क्वेअर वनवरही निव्वांतपणानं जातात.आता  हे लग्न हनिमूननंतर तुटल्यावर आधीच्या गच्ची हिरोशी निव्वांतपणानं नव्यानं लग्नाची बोलणी करतात. मुलीचं सासरहून परत आलेलं सामान वाण्याचं सामान आल्यागत शांतपणे बघतात.

हे सगळं बघून वाटतं की अनुरागही त्याच भारतात रहातो का? जिथे उर्वरित भारत रहातो? असो. सौ बात की एक बात, अभिषेक चाहत्यांसाठी हा सिनेमा थंडी हवा का झोंका है. एक बार देखना बनता है