Wednesday, March 23, 2022

मीना कुमारी जेंव्हा खुनभरी स्वाक्षरी देते

 

 

अभिनेते, अभिनेत्र्या यांचं वेड आम सगळ्यांनाच असतं. आपापल्या लाडक्या कलाकाराच्या प्रेमात वेडे लोक त्यांच्यासारखं दिसण्या बोलण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे फ़ोटो जमा करतात आणि अगदीच नशिबानं साथ दिली तर भेटून स्वाक्षरीही घेतात. मात्र कधी कधी या कलाकारांना आपल्या फ़ॅन्सचे असे काही अनुभव येतात की ते त्यांच्या आयुष्यभर लक्षत रहातात. सत्तरच्या दशकातील ट्रॅजिडी क्विन म्हणून लौकीक मिळविलेली अभिनेत्री मीना कुमारी. अत्यंत तरल असा अभिनय आणि शालीन सौंद्य अशी जिची ओळख होती ती मीना कुमारी लाखो दिलो की धडकन होती. तिची एक झलक मिळावी म्हणून तिचे चाहते तळमळत असत. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असे. मात्र एक अनुभव असा आला की त्यानं मीना कुमारीचा थरकाप उडाला. एका डाकू फ़ॅननं मीना कुमारीकदे अशी मागणी केली की मीना कुमारीच काय उपस्थित क्रु मेंबर्सनाही घाम फ़ुटला.

त्याचं झालं असं की, मीना कुमारी त्या काळात कमाल अमरोहींच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. त्यांच्याच पाकिजामधे कामही करत होती. पाकिजाच्या मेकिंगची चर्चा त्या काळात जोरदार होती. या चित्रपटाच्याच शुटिंगसाठी सगळं युनिट कुप्रसिध्द मध्य प्रदेशातील शिवपूरी भागात गेले होते. त्या काळात चंबळ मधील डाकूंनी नुसता धुमाकूळ घातला होता. अनेक क्रूर डाकू या भागात कार्यरत होते आणि त्यांच्या क्रुरतेच्या कहाण्यांनी वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरले जात होते. शहाणा माणूस या भागातून रात्रीचा प्रवासच काय पण दिवसाचा प्रवासही शक्यतो टाळत असे. या खोर्‍यात डाकूंच्या तावडीत सापडणं म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण बनलं होतं.

मीना कुमारी, कमाल अमरोही आणि काही क्रू मेंबर्सना शुटिंग संपवून मुंबईला परतताना रात्र झाली. कुप्रसिध्द चंबळच्या खोर्‍यातून जात असतान कधी एकदा या टापूतून बाहेर पडतोय असं प्रत्येकाला झालेलं होतं. मात्र नियतीनंच ती रात्र मीना कुमारीसाठी विचित्र रात्र म्हणून आधीच नोंदवून ठेवली होती. पुढे जे घडणार होतं ते भूतो न भविष्यती असं असणार होतं. दोन कारमधून ही मंडळी चाललेली असतानाच अचानक बियाबान भागात आल्यावर कारमधलं पेट्रोल संपलं आणि रस्त्याकडेला गाड्या थांबवल्या गेल्या. इतक्या रात्री पेट्रोल शोधायला जाणं म्हणजे डाकूंना आपणहोऊन आमंत्रण दिल्यासारखं होणार होतं. म्हणून कमालजींनी निर्णय घेतला की, गाड्या रस्त्याकडेला थांबवून मुंबईला जाण्याची काही सोय होतेय का बघायची. विचारविनिमय चाललेला असताना अचानकपणे डाकूंनी त्यांना घेरलं. कारमधल्या प्रत्येकाचं धाबं दणाणलं. आजूबाजूला बंदूकीचा निशाणा धरलेले डाकू आणि आता यातून सुटका नाही ही जाणीव झालेले कमालजी. खिडक्यांच्या काचा ठोठावत सगळ्यांना बाहेर येण्याविषयी सांगितलं जात होतं. कमालजिंनी धैर्य गोळा करत त्यापैकी एका डाकूला सांगितलं की तुझ्या सरदाराला मला येऊन भेटायला सांग. त्यांनी हे सांगताच याच घेरावातून एक सामान्य उंचीचा आणि रेशमी कुर्ता सलवार घातलेला एक इसम पुढे आला. त्यानं कमालजींना विचारलं,” तुम कौन हो?” कमालजींनी त्याला सांगितलं की,” मैं कलाम अमरोही हूं और मै चंबल शूटिंग करने आया हूं” शुटिंग हा शब्द ऐकताच तो इसम संतापला. तो कमालजींना पोलीस समजला आणि शूटिंग म्हणजेच डाकूंना मारायला हा पोलिसवाला आला आहे असा त्याचा समज झाल्यानं तो रागात बोलू लागला. कमालजींच्या लक्षात आलं की समोरच्या इसमाचा काही गैर्समज झालेला आहे. त्यांनी तातडीनं खुलासा केला की, शूटींग म्हणजे चित्रपटाचं शूटिंग. हे ऐकून तो इसम शांत झाला. कमालजींनी थोडं धाडस गोळा करत त्या इसमाला विचारलं की तुम्ही कोण आहात? यावर त्यानं जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांची भितीनं दातखिळ बसायची वेळ आली. या डाकूचं नाव होतं, डाकू अमृत लाल. त्या काळात अमृत लाल त्याच्या कारनाम्यांमुळे सतत बातम्यांत असायचा. त्याच्या क्रुरतेला सीमाच नव्हती. आता कमालजींकडे त्यानं अधिक चौकशी सुरू केली. कोणता चित्रपट, कलाकार कोण? मग त्याला कळलं की या चित्रपटात मीना कुमारी काम करत असून आत्ता या क्षणी ती तिथे उपस्थित आहे. झालं! तो इसम आनंदानं वेडा झाला कारण तो मीना कुमारीचा प्रचंड मोठा चाहता होता. त्यानं हट्टच धरला की त्याला मीना कुमारीला भेटायचं आहे. काही झालं तरी डाकूच तो, त्याला भेटायला मीना कुमारी राजी होईना. मात्र अमृत लालनं सांगितलं की, जर का त्याला मीना कुमारि भेटली तर तो सर्वांना पुढच्या प्रवासाला जाऊ देईल. अखेर क्रु मेंबर्सचा विचार करत मीना कुमारी या भेटीला तयार झाली. अमृत लाल आनंदानं अक्षरश: वेडा झाला. त्यानं या मंडळींच्या खानपानाची व्यवस्था केली आणि दरम्यान गाड्यांमधे पेट्रोल भरण्याची व्यवस्था केली. अमृतलालकडचा पहुणचार घेऊन मंडळी निरोप घेऊन निघाली. प्रत्येकाच्याच मनात सुटलो बुवा अशी भावना असतानाच अमृतलालचं डोकं पुन्हा फ़िरलं. आता त्याला मीना कुमारीची स्वाक्शरी हवी होती. ती द्यायला खरंतर मीना कुमारीची काहीच हरकत नव्हती पण डाकूला हवी असणारी स्वाक्षरी सामान्य कशी असेल? अमृतलालनं सुरीनं मीना कुमारीनं तिचं नाव स्वत:च्या हातानं अमृतलालच्या हातावर कोरावं अशी त्याची इच्छा होती. कधी कोणावर चढ्या आवाजातही न बोलणार्‍या मीना कुमारीला हे करणं म्हणझे साक्षात ब्रम्हांड आठवणारं होतं. तिनं नकार दिला मात्र डाकू हट्टालाच पेटलेला. अखेर मीना कुमारीनं कशीबशी हिंमत करुन हे कामही पार पाडलं आणि सगळ्या क्रु मेंबर्सची सुटका केली. स्वाक्षरी घेऊन अमृतलाल खुष झाला आणि क्रु मेंबर्स गाडीत बसून वेगात गाडी दामटवत मुंबईच्या दिशेने निघाले.


आजच्या पोस्टसाठी जो व्हिडिओ जोडलेला आहे तो मीनाकुमारी यांनी फ़ौजी भाईयों के लिए सादर केलेल्या जयमाला कार्यक्रमाचा आहे. मीना कुमारी यांचा आवाज यात ऐकायला मिळेल.

[लेख पूर्वप्रसिध्दी inmarathi]

#meenakumari#jaymala#oldhindisongs#dilekmandir



 

ओरिजिनल ड्रीमगर्ल- देविका राणी

 

 भारतीय चित्रपट रसिकांसाठी ड्रीम गर्ल म्हणलं की हेमा मालिनी हे समिकरण आज जरी रुळलं असलं तरिही या किताबाची पहिली मानकरी आहे देविका राणी. सौंदर्य आणि अभिनय यांचा अनोखा मिलाप म्हणजे देविका राणी होत्या. आज अनेकांना देविका राणी हे नाव माहितही नाही मात्र एकेकाळी चित्रपट सृष्टीवर राज्य केलेली ही अभिनेत्री त्याकाळातली अत्यंत बोल्ड ॲण्ड ब्युटीफ़ूल अभिनेत्री म्हणून ओळखली जात असे.

देविका राणी यांचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी विशाखापट्टण येथे झाल्या.  गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांची त्या नात होत. देविकाचे वडील कर्नल एम एन चौधरी हे मद्रासचे पहिले सर्जन जनरल होते. लहानपणापासूनच देविका अत्यंत मोकळ्या वातावरणात वाढली. त्यांनी लंडनमधून थिएटरचे शिक्षण घेतले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिला तिच्या अभिनयासाठी कौतुक लाभलं. दहा वर्षांची कारकीर्द असणार्‍या देविकानं अवघ्या पंधरा चित्रपटांत भूमिका साकारल्या मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या चित्रपटात भूमिका साकारुनही हिंदी चित्रपट इतिहासात अजरामर झालेलं नाव म्हणजे, देविका राणी.

देविका राणी यांनी १९३३ साली कर्मा या चित्रपटातून पदार्पण केलं. हा पहिलाच इंग्रजी भाषेतील चित्रपट मानला जातो जो भारतीयानं बनविला होता आणि या आपल्या पहिल्याच चित्रपटात त्यांनी तब्बल चार मिनिटं लांबीचं चुंबन दृष्य दिलं. ज्या काळात स्त्रिया पडदा पध्दतीतून बाहेर आल्या नव्हत्या, पतीचा हातही चारचौघात धरणं जिथे शिष्टाचाराला धरून मानलं जात नव्हतं तिथे देविका राणीनं चुंबदृश्य देऊन खळबळ माजवली. यापूर्वी अशा प्रकारे चुंबनदृश्य चित्रीत केलं नव्हतं. अपवाद मूकपट  सीता देवी आणि चारू रॉय यांच्यावर चित्रीत झालेल्या मूकपटातील चुंबनदृश्य. मात्र या चुंबनाची जितकी चर्चा झाली नाही तितकी चर्चा देविका राणी आणि हिमांशु रॉय यांच्या पडद्यावरील चार मिनिटं लांबीच्या चुंबनमुळे झाली. भारतीय चित्रपट इतिहासातील हे आजवरचे सर्वात दीर्घ चुंबनदृष्य मानले जाते. मात्र वास्तविक पहाता पडद्यावर हा प्रसंग जसा घडतो ते पहाता हे रुढार्थानं चुंबन नव्हते. या चित्रपटातील हिमांशु जे पात्र साकारत होते त्या पात्राला साप चावला असता त्याला शुध्दीवर आणण्यासाठी देविका राणींचं पात्र चुंबनांचा वर्षाव करतं. हे करत असतानाच ओठांचं चुंबनही घेतलं जातं. हे दृश्य त्या काळात पडद्यावर बघून प्रेक्षकांचे श्र्वास थांबले होते. या दृश्यावर टिकाही भरपूर झाली कारण त्या काळात खुलेआम अशा प्रकारचा प्रणय दाखविणं समाजमान्य नव्हतं.

देविका राणींच्या खात्यात आणखिन एका गोष्टीचं श्रेय जातं आणि ते म्हणजे त्यांनी भारतीय चित्रपसृष्ट्रीचा ट्रॅजेडी किंग, दिलिप कुमार अर्थात युसुफ़ खान शोधला आणि या हिर्‍याला कोंदणात बंदिस्त केलं. दिलिप कुमारना चित्रपटात आणण्याचं श्रेय देविका राणींना जातं. युसुफ़ खानचा दिलिप कुमारही देविका राणीनीच केला.

१९२८ साली देविका आणि हिमांशू यांची भेट झाली आणि त्याच वर्षी त्यांचा विवाहही झाला. यानंतर या जोडप्यानं बॉम्बे टॉकिज नावाच्या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करुन अनेक गुणी कलाकारांना प्रेक्षकांसमोर आणलं. बोल्डॲण्ड ब्युटीफ़ूल या उक्तीला जर मानवी चेहरा दिला तर तो देविका राणी असे. आपल्या कारकीर्दीत आणि नंतरही निर्माती म्हणून देविका राणींनी खबळळ उडवून दिली होती.

[लेख पूर्वप्रसिध्दी inmarathi]

#devikarani#dreamgirl#achutkanya#janmbhoomi#blackwhitecinema#saraswatidevi#ashokkumar#oldsongs

  




Sunday, August 1, 2021

चौदा फेरे

 


याचे प्रोमोज बघून कधी एकदा रिलीज होतोय असं झालेलं. राॅमकाॅम हा आवडता प्रकार आणि फिलगूड जाॅनर् असल्यानं चौदा फेरेची उत्सुकता होतीच.
मात्र, विक्रांत आणि कीर्ती अशी वेगळी कास्टिंग असणारा चौदा फेरे जमता जमता राहिलेली दम बिर्याणी आहे. फसलेली म्हणणार नाही. कारण अगदीच फसलेली नाही, फक्त अतिप्रचंड predictable गोष्ट अतिप्रचंड predictable पात्रं आणि एकूण प्रवासही predictable. इतका की इथे स्पाॅयलर्स अलर्टही द्यायला नको.
दोन भिन्न जातीतले नायक नायिका कुटुंबातल्या कट्टरतेला बघता फेक आईवडील उभे करून लग्नाला उभे रहातात या गोष्टीत जे जे काही घडू शकतं ते ते पडद्यावर घडत रहातं.
मुळात ट्रेलरमधे दाखवल्याप्रमाणे हे दोघे एकदा नायकाच्या गावाला आणि एकदा नायिकेच्या गावाला जाऊन लग्न करतात. यात एक आईवडिलांची खोटी जोडी उभी करतात. जी नायिकेच्या कुटुंबाला नायकाचे आईवडिल म्हणून भेटतात तर नायकाच्या कुटुंबात नायिकेचे आईवडिल म्हणून भेटतात. आणि नेमकं हेच कारण आपल्याला सिनेमा बघण्यासाठी एक्साईट करतं. खरंतर या प्लाॅटमधे कहर घडामोडी घडू शकतात. पण सिनेमात त्या घडतच नाहीत आणि आपण अपेक्षाभंग घेऊन बसतो.

प्रियदर्शन सारख्यानं या प्लाॅटवर हास्याची इमारत उभी केली असती. इथे मात्र प्रचंड पोटेन्शियल असणारी स्क्रिप्ट घासून गुळगुळीत ट्रॅकवर घसरत जाते.

तुम्हाला 2004 ला प्रदर्शित झालेला प्रियदर्शन चा हलचल आठवतोय? त्यात जसा सगळा गैरसमजांचा , नात्यांचा गुंता होत जातो तसं काहीतरी चौदा फेर्‍यात होईल असं वाटत असताना गोष्ट फारशी गडबड गोंधळ न करता क्लायमॅक्स कडे जाते.

याचं कास्टिंग मस्त आहे. सगळ्यानी जीजानसे काम केलेलं आहे. गौहर खानला जास्त भावखाऊ भूमिका मिळालेली आहे आणि तिनं चीज केलं आहे. बाकी विक्रांत च्या जागी एका पाॅईंटनंतर आयुषमान असता तर? वाटत रहातं.
या सिनेमाला मी बनता बनता राहिलेली बिर्याणी म्हणण्याचं कारण हेच आहे. सगळे घटक अचूक प्रमाणात जमवलेले आहेत. मात्र खाताना जाणवतं, अरेच्चा यात मीठच नाही, भातही कच्चट शिजलाय. मग इतकावेळ पसरलेला सुगंध धत्त तेरी फिलिंग देतो.

जस्ट टाईमपास हवा असेल आणि थोडं सहन करायची तयारी असेल, विक्रांत चे फॅन असाल तर एकदा बघण्याइतपत आहे.

त.टी. - 1- हा सिनेमा संपल्यावर लगेचच आटोप्ले मोडवर ऑलटाईम फेवरेट सोचा नं था लागला. या रिव्ह्यूवर सोचा न था च्या मूडचा परिणाम असण्याची शक्यता गृहीत धरा आणि नाही आवडले चौदा फेरे तर मला दोष देऊ नका😉

#14Phere
#vikratmassy#kirtikharbanda



Thursday, July 1, 2021

 


लग्नामधे गाणी गाणारे वडील आणि त्यांची दोन मुलं. पैकी एकानं पाॅपसंगीत क्षेत्रात नाव  कमावलेलं आहे. तो अगदी हार्टथ्रोब वगैरे तर दुसरा तितकसं यश मिळवू न शकलेला आणि स्वतःचा बॅण्ड असलेला. या दोघांत भावंडातलं प्रेम वगैरे नाही असेलच तर कटुताच आहे. पण, वडिलांच्या मृत्यूमुळे अंत्यसंस्कारासाठी दोघांना एकत्र यावं लागतं. वडिलांची अंतीम इच्छा म्हणून एका लग्नात गाण्याच्या कार्यक्रमासाठी वडिलांच्याच जुन्या ऑलमोस्ट खटारा गाडीतून ते प्रवासाला निघतात.

त्या प्रवासाची गोष्ट म्हणजे कार्देशिम बेनीम (माय ब्रदर). 

कारा सेवदा नंतर आलेला बुराक ओझ्तीवितचा सिनेमा.  तुर्कीश आणि मराठीमधे हे साम्य आहे. यांची सिरियल इंडस्ट्री सिनेमापेक्षा जास्त प्रभावी आहे. इकडचे तिकडं म्हणजे सिरियलमधलेच सिनेमातही दिसण्याचं प्रमाण जास्त. बुराकनं कारा सेवदामधे भारी काम केलं होतं म्हणून याच्या सिनेमाची उत्सुकता होती. कार्देशिम बेनीम, 2016 ला प्रदर्शित झालेला हा सिनेमा त्यांच्याकडच्या सिरियलच्या एका एपिसोडचा जीव असलेला छोटा सिनेमा आहे. 

मात्र याची कथा मस्त आहे. रोड जर्नी जाॅनर मधे प्रवासाचं कारण तगडं लागतं ते इथे एका बापाची अंतीम इच्छा हे आहे. या विचित्र बापानं विचित्र पध्दतीनं मुलांसमोर सादर केलेलं मृत्युपत्र आहे. हा भाग मला सगळ्यात जास्त आवडला.

दोघा भावंडांचा प्रवास जसजसा पुढे सरकतो तसं या मृत्यूपत्राचं कारण लक्षात येऊ लागतं. प्रवासाच्या शेवटी जो धक्का आहे तो अनपेक्षित असाच आहे. फक्त

ओढूनताणून प्रेमकथेचा ट्रॅक नसता तरी काही बिघडलं नसतं असं वाटतं. 

यांचे सिनेमेच मुळात छोटेखानी असतात तसाच हाही आहे. लाॅकडाऊन मधे थोडावेळ बरा जावा वाटत असेल आणि अत्युच्च अपेक्षा नसतील तर हा सिनेमा चांगला आहे. माझा स्वतःचा हा अत्यंत लाडका जाॅनर् आहे त्यामुळे मी याप्रकारचे सिनेमे जे समोर येतील ते बघू शकते. इथे तर बुराकचं तगडं कारण होतं.

#loveforturkushmovies

#kardesimbeni.

#burak

Friday, May 7, 2021

हिंदी गाण्यांवर आकाशवाणीची बंदी

 

हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या काळातच ऑल इंडिया रेडिओवर हिंदी चित्रपट संगीत प्रसारीत करण्यावर बंदी होती. ही बंदी थोडी थोडकी नाही तर तब्बल दहा वर्षं चालली. या बंदीचा फ़ायदा करून घेत रेडिओ सिलोननं एक अनोखा कार्यक्रम श्रोत्यांसाठी आणला ज्यानं रेडिओ जगतात इतिहास रचला.



तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे की जो कालखंड हिंदी चित्रपटांचा, हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ म्हणून नोंदवला गेला आहे त्याच काळात ऑल इंडिया रेडिओवर हिंदी चित्रपट संगीतावर चक्क बंदी घातली होती आणि या बंदीमागचं कारणही तितकंच धक्कादायक होतं. हिंदी चित्रपट संगीतातील गाण्याचे शब्द अश्लिल असतात, पाश्चिमात्य संगीत, वाद्यं या गाण्यात वापरली जातात आणि हे भारतीय अभिजात संगीतासाच्या भविष्यासाठी धोक्याचं असल्याचं कारण या बंदीमागे दिलं गेलं.

त्यावेळचे माहिती आणि प्रसारण मंत्री बी. व्ही. केसकर यांनी हि बंदी घातली होती. मात्र पूर्ण बंदी आधी कोटा पध्दत चालू करण्यात आली. या पध्दतीनुसार कोणती गाणी प्रसारीत करायची याची आधी चाळणी लावलि जायची आणि यातून पार होणारी गाणिच वाजवली जात.  प्रोड्युसर्स गिल्डनं याचा विरोध केला. अखेर केसकरना जे हवं होतं ते आपसूक घडलं कारण वैतागलेल्या निर्मात्यांनी आकाशवाणीला गाणी देणं बंद केलं. अखेर ऑल इंडिया रेडिओवरून हिंदी चित्रपट संगीत गायब झालं.

आकाशवाणीचा मार्ग बंद झालेला असला तरिही दुसरा मार्ग खुला झाला होता. रेडिओ सिलोन हे त्या काळातल्या सिलोन अर्थात श्रीलंकेतलं रेडिओ स्टेशन होतं. सिलोननं ही संधी हेरली आणि हिंदी चित्रपट संगीतासाठी आपली दारं मोकळी केली. आता श्रोते सिलोनवर रमू लागले. याच काळात सिलोननं एक अभिनव कार्यक्रम सादर करण्याचा निर्णय घेतला. हिंदी गाण्यांच्या काऊंटडाऊनचा हा कार्यक्रम मूळ इंग्लिश कार्यक्रमाची हिंदी आवृत्ती होती. अमिन सायानी या स्टार अनाउन्सरचा उदय या कार्यक्रमामुळे झाला. (याच अमिन सायानीनी अमिताभला आकाशवाणीच्या नोकरीच्या इंटरवह्यु मधे रेडिओसाठी आवाज योग्य नाही हे कारण सांगून रिजेक्ट केलं होतं). बिनाका गीतमाला हे त्या कार्यक्रमाचं नाव. सर्व लेटेस्ट चित्रपटातीलग णी लोकप्रियतेच्या क्रमवारीनुसार या कार्यक्रमात वाजवली जात. पुढे अनेक वर्ष हा कार्यक्रम चालला. सर्वात जास्त प्रसारण झालेला असा हा कार्यक्रम आहे. पायदान, बहेनो और भाईयो हे शब्द अमिन सायानींच्या आवाजात आयकॉनिक बनले. हा कार्यक्रम बनविणं मात्र खूप कठीण होतं कारण अगदी प्रामाणिकपणे संशोधन करत हा कार्यक्रम बनविला जात असे. अगदी लेटेस्ट क्रमवारी मिळावी म्हणून खूप आधी कार्यक्रम रेकॉर्ड केला जायचा नाही. याची विश्वासार्हता इतकी होती की एखादं गाणं टॉपला आहे याचाच अर्थ ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहे हे लोकांनाही मान्य असायचं. पहिल्या गाण्यासाथी बिगूल वाजवला जायचा. बिनाला गीतमाला क्रमवारीत पहिल्या तिनात येणं फ़ार प्रतिष्ठेचं मानलं जात होतं. रामायण आणी महाभारताच्या काळात ज्याप्रमाणे रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नसे त्याचप्रमाणे दर बुधवारी रात्री आठ वाजता लोक जिथल्या तिथे थांबत असत कारण त्यांना गीतमालाचा भाग चुकवायचा नसे.

 हा कार्यक्रम अक्षरश: लोकांनी डोक्यावर उचलुन धरला. या कार्यक्रमाच्या ऑडिओ कॅसेटसी निघाल्या. आजही सारेगम कारवावर गीतमालाचे एपिसोड उपलब्ध आहेत. यथावकाश ऑल इंडिया रेडिओनं ही बंदी उठवली आणि हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करायला सुरवात केली तरिही हा कार्यक्रम तितकाच लोकप्रिय राहिला. १९८९ पर्यंत सिलोनवरच हा कार्यक्रम प्रसारीत केला जात असे त्यानंतर मात्र तो आकाशवाणीनं घेतला. बिनाका गीतमालामुळे आकाशवाणीला एखाद्या कार्यक्रमाचं व्यावसायिक मूल्य काय असतं हे लक्षात आलं. उत्पन्नाचा मार्ग जाहिरातींमुळे सोपा होतो हे या कार्यक्रमामुळे कळलं. केसकर यांच्या भूमिकेला विरोध करनारे जसे होते तसेच त्याचं समर्थन करणारेही होते.

या बाबतीतला एक किस्सा असा सांगितला जातो की, १९५१ साली आलेल्या बाजी या चित्रपटात गीता दत्तच्या आवाजातलं तदबीर असे बिगदी हुई हे गाणंही केसकराम्नी नाकारलं होतं. याचं कारण हे गाणं मूळ एक गझल होती आणि सचिनदानी गिटारचा वापर करून त्या गझलला पाश्चिमात्य रूप दिलं होतं. केसकर हे पाश्चिमात्य वाद्यांचे कट्टर विरोध्क मानले जात. त्याऐवजी गाण्यात बासरी, तबला अशी भारतीय वाद्यं वापरावीत असा त्यांचा आग्रह होता. सुरवातीला सिलोनवरून प्रसारीत होणार्‍या हिंदी गाण्यांकडे कोणी फ़ारसं लक्ष दिलं नाही मात्र जसजशी सिलोनची लोकप्रियता भारतात वाढू लागली आणि ती वाढतच चालली तसे डोळे उघडणं भाग होतं आणि केसकरांवर ही बंदी उठवण्यासाठी दबाव येऊ लागला. अखेरीस केकर यांना नमतं घेत ही बंदी उठवावी लागली.


Inmarathi पूर्वप्रकाशित 


#binakageetmala #AIR # aminsayani


शाहरुखच्या घरात माधुरी अनिलचा नाच

 

मन्नत, बस नाम ही काफ़ी है. असा हा मुंबईतला पत्ता. या पत्त्यावर रहातो बॉलिवुडचा बादशहा, शाहरुख. याच मन्नत बंगल्यात अनिल कपूर आणि माधुरी एक दो तीन या लोकप्रिय गाण्यावर थिरकले होते. काय होता नेमका हा किस्सा?-




एन चंद्रानं तेजाब बॉलिवुड प्रेमींच्या बकेट लिस्टमधली गोष्ट असते, मुंबईतल्या मन्नतला भेट देणं. हा मन्नत बंगला आज शाहरूखचा म्हणून ओळखला जात असला तरिही या बंगल्याचिही सुरस कथा आहे. या बंगल्याचा मूळ मालक गुजराती पारसी होता. खानदानी घर असणार्‍या गांधी कुटुंबातल्या किकी गांधीकडे याची मालकी होती आणि याचं नाव होतं,” व्हिला व्हिएन्ना”. अगदी नव्वदीच्या दशकापर्यंत हा बंगला याच नावानं ओळखला जात असे. किकूला अपत्य नसल्यानं त्यानं पुढे हा बंगला त्याची बहिण गुलबानोचा मुलगा नरिमन याच्या नावावर केला. गंमत म्हणजे नरिमनचा मुलगा आयरिश आणि शाहरूखचा मुलगा आर्यन हे खूप चांगले मित्र आहेत. शाहरूख नरिमनचा शेजारी होता. शाहरूखनं पहिल्यांदा हे घर पाहिलं तेंव्हाच त्याला ते खूप आवडलं आणि जर शक्य असेल तर हेच घर विकत घ्यायचं त्यानं ठरवलं. ते घर भाड्यानं देण्याचा निर्णय घेतल्याचं कानावर आल्यावर शाहरूखनं त्याला तो बंगला विकत घेण्याचा प्रस्ताव दिला. १९९५ मधे बरेच प्रयत्न केल्यानंतर शाहरूखनं अखेर नरिमनला हे घर विकण्यासाठी राजी केलं. त्याकाळात शाहरूखनं हा बंगला घेण्यासाठी १५ कोटी रुपये मोजले होते. अजच्या घडीला या बंगल्याची किंमत दोनशे कोटींहून जास्त आहे. या घराला आधी त्यानं जे आहे तेच नाव ठेवलं होतं मात्र इथे रहायला आल्यावर हे घर त्याच्यासाठी फ़ारच लकी ठरलं आणि त्यानम या घराचं नाव बदलून मन्नत ठेवलं. या बंगल्याची बांधणी ही विसाव्या शतकातली असून वर्ल्ड हेरीटेजच्या ग्रेड थ्री मधली आहे. सर्व बाजूंनी मोकळा असा हा बंगला, आकाश, वारा आणि समुद्राचं दर्शन यानी समृध्द आहे.

मात्र मन्नत शाहरूखचा होण्यापूर्वी तो व्हिला व्हिएन्ना होता आणि तो हिंदी चित्रपटांना शुटिंगसाठी भाड्यानं दिला जात असे. अनेक चित्रपटांचं शूटींग या बंगल्यात झालेलं आहे. मात्र १९८८ मधे एका  चित्रपटानं धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचं नाव होतं, तेजाब. एन रामचंद्राचा हा सिनेमा त्या काळचा नंबर वन स्टार अनिल कपूर आणि अनेक चित्रपटात सहय्यक भूमिका करूनही हवं ते यश न मिळालेली माधुरी दीक्षित यांना घेऊन बनवला होता. चित्रपतात माधुरी एक क्लब डान्सर असते त्यामुळे एक डान्स नंबर या चित्रपटात घेतला होता ज्यानं चित्रपट प्रदर्शित झाल्यावर धुमाकूळ घातला होता. या गाण्यानं माधुरीला रातोरात स्टार शर्यतीत आणून बसवलं. हे गाणं होतं, एक दो तीन. हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर याचा गाण्याचं मेल व्हर्जनही चित्रपतात घेण्याचं ठरलं. मग या गाण्यासाठी लोकेशनचा विचार सुरू झाला आणि चित्रपटात व्हिला व्हिएन्ना कथेत आला असल्यानं हेच लोकेशन घेण्याचं ठरलं त्यानुसार एक दो तीन च्या मेल व्हर्जनचं शुटिंग या बंगल्यात पार पडलं.  आज हा व्हिला व्हिएन्ना शाहरूखचा मन्नत पत्ता असल्यानं सामान्यांना केवळ गेटचं दर्शन घेणं शक्य आहे मात्र नव्वदच्या दशकाच्या आधिच्या  चित्रपटांनी आपल्याला पडद्यावर मन्नतचं दर्शन शक्य करून ठेवलं आहे. अर्थात व्हिला व्हिएन्नाला मन्नत बनवायला गौरी खाननं चार वर्षं आणि तेरा कोटी रुपये खर्च केले आहेत  पण मन्नतच्या मूळ रुपाची झलक सिनेमातून का होईना नक्कीच बघता येईल.


Inmarathi पूर्वप्रकाशित 


#madhuridixit #anilkapoor #tezab #mannat







फ़ाळणीनंतर भारतात परतलेल्या भावंडांनी देशाला घाबरवलं

 



 

भारत –पाकिस्तान फ़ाळणी नंतर भारतात आलेलं एक कुटुंब. डोक्यावर कर्जाचा बोजा असलेल्या या कुटुंबातल्या भावंडानी नंतर सिनेमा क्षेत्रात खळबळ माजवून टाकली. ही भावंडं म्हणजेच रामसे बंधू. भारतीय भयपट म्हणलं की पहिलं नाव डोळ्या समोर येतं ते रामसे बंधूंचंच. अशा या भावंडाची ही गोष्ट-

 

स्वातंत्र्यपूर्व काळात रामसे ब्रदर्सचे वडील फ़तेहचंद रामसिंघानी यांचं पाकिस्तानातल्या कराचीमधे वीजसाहित्य विक्रीचं दुकान होतं. कुटुंब कबिला मोठा होता आणि दुकान ठीक चाललं होतं. त्याकाळात ब्रिटिशांचं राज्य होतं आणि रामसिंघानींच्या दुकानात बहुतेक गिर्‍हाईक ब्रिटीश असत. मात्र अडचण ही होती की दुकानावर लावलेल्या पाटीवरचं नाव ब्रिटीशांना नीट वाचता येत नसे. रामसिंघानी इतकं मोठं नाव वाचताना इंग्रजी गिर्‍हाईकांना त्रास व्हायचा. हे लोक फ़तेहचंदांना रामसे सदृष काहीतरी हाक मारायचे. फ़तेहचंदांनी विचार केला की आपल्या ग्राहकांना जे सोयीचं पडत आहे ते नाव धारण करावं जेणेकरुण त्यांना नाव उच्चारताना त्रास होणार नाही. फ़तेहचंदांनी नविन बोर्ड बनवून त्यावरचं रामसिंघानी नाव बदलून रामसे लिहिलं. आता गिर्‍हाईकही खुष झालं. दुकान चांगलं चालायला लागलं होतं मात्र ही परिस्थिती फ़ारकाळ टिकली नाही. १९४७ ला देशाची फ़ाळणी होऊन धर्मावर आधारीत दोन देश बनले. फ़तेहचंद रामसे आपला कुटुंब कबिला घेऊन भारतात मुंबईत आले.

मुंबईत आल्यावरही फ़तेहचंदांनी आपला जुनाच व्यवसाय नव्यानं चालू केला. मुंबईतल्या लॅमिंग्टन रोडवरील अप्सरा सिनेमाच्या समोर त्यांनी वीज साहित्याचं दुकान थाटलं. नविन दुकान, नविन शहर असलं तरिही त्यांनी नाव मात्र रामसेच ठेवलं. ते बदललं नाही. रामसिंघानी आता कायमचेच रामसे झाले होते. त्याकाळातला सुप्रसिध्द मर्फ़ी रेडिओ फ़तेहचंदांच्या दुकानाता प्रामुख्यानं विक्रिला होता. नविन शहर, गिर्‍हाईकांची मानसिकता नवी. धंद्याचा सूर काही ठीक लागत नव्हता. अशातच फ़तेहचंदांचं लक्ष नव्यानंच बहराला येऊ पहात असणार्‍या एका क्षेत्राकडे गेलं. हे क्षेत्र होतं सिनेमा निर्मितीचं. फ़तेहचंदांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरायचं ठरवलं. १९५४ साली आलेला शहीद-ए-आजम भगत सिंह हा निर्माता म्हणून फ़तेहचंदांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट फ़ारसा चालला नाही. यानंतर त्यांनी पृथ्वीराज कपूर आणि सुरैय्या यांना मुख्य भुमिकांत घेऊन रुस्तुम सोहराब (१९६३) बनविला जो सुपरहिट ठरला. फ़तेहचंदांच्या नावावर एक फ़्लॉप एक हिट होता अशातच त्यांनी तिसर्‍या चित्रपटाच्या निर्मितीला सुरवात केली. एक नन्ही मुन्नी सी लडकी हा त्यांचा पुढचा चित्रपट अत्यंत वाईट पध्दतीनं फ़्लॉप झाला. हे अपयश इतकं जोरदार होतं की फ़तेहचंदांनी चित्रपटसृष्टीचा नाद सोडण्याचं आणि चित्रपट निर्मिती न करण्याचं ठरविलं.

त्यांनी हा निर्णय घेतला असला तरिही नियतीनं वेगळाच डाव त्यांच्यासमोर मांडलेला होता लवारच रामसे हे नाव भारतीय भयपटांचं जनक बनणार होतं आणि हे घडायला कारण ठरला फ़्लॉप चित्रपटातला एक सिन.

त्याचं झालं असं की फ़तेहचंदांची मुलं, श्याम आणि तुलसी चित्रपटगृहात चित्रपट झळकला की प्रेक्षकांत बसून तो बघत असत. जेणेकरून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समजाव्यात. एक नन्ही मुन्नी सी लडकी बघायलाही हे दोघे भाऊ चित्रपटगृहात गेले. त्यांना तो सिनेमा बघताना लक्षात आलं की एक विशिष्ट सीन चालू असताना प्रेक्षक कमालिचे उत्कंठीत झाले होते. या सिनमधे एक चोरी घडते ज्यात पृथ्वीराज  कपूर भारी भक्कम पोषाख घालून, मास्क लावून आणि उंच बूट घालून म्युझियममधे चोरी करायला जातात. तुलसी रामसेंनी निरिक्षण केलं की या सिनमधे पृथ्वीराज एखाद्या सैतानासारखे भासत होते आणि पोलिसांनी मारलेल्या गोळ्याही त्यांना काहीही इजा न करता बाजूला पडत होत्या हे बघून प्रेक्षक हैराण झाले होते. पडद्यावर हे सिन बघताना थिएटरमधे टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या. लोकांना काय बघायला आवडतं हे रामसे बंधूंना समजलं होतं.

चित्रपट पाहून परत आल्यावर या दोघांनी वडिलांशी चर्चा केली. आपण हॉरर चित्रपट बनवुया असा प्रस्ताव या दोघांनी वडीलांसमोर ठेवला. फ़तेहचंदांनी झालेलं नुकसान बघता आता निर्मितीतून अंग काढून घायचं हे निश्चित केलं होतं. मात्र मुलांचं मन त्यांना मोडवलं नाही आणि अखेर त्यांनी चित्रपटात पैसा गुंतवायला होकार दिला. वडिलांनी होकार कळवला असला तरिही पुढचं सगळं अवघड होतं कारण चित्रपट नेमका कसा बनवतात हे त्यांना माहित नव्हतं. त्यांनी मग Filve Cs of Cinematography हे पुस्तक खरेदी केलं. त्यानंतर त्यांनी थेट श्रीनगर गाठलं आणि एक हाऊसबोट भाड्यानं घेतली. पुढचे तीन महिने त्यांनी या हाऊसबोटीत स्वत:ला चक्क कोंडून घेत सिनामाचं स्वयंअध्ययन चालू केलं. पुढचे तीन महिने सर्व भावंडांनी मिळून हे पुस्तक अक्षरश: पाठ करत सिनेमा बनविण्याचं तंत्र शिकून घेतलं. मुंबईत परतल्यावर त्यांनी आपल्या पहिल्या हॉरर पटाला सुरवात केली. या चित्रपटाचं नाव होतं, दो गज जमिन के नीचे. चित्रपट बनविण्याचा पैसा वाचवायचा म्हणून रियम लोकेशनवर शूट करण्याचं ठरविलं आणि युनिट महाबळेश्वरला गेलं. चर्चच्या पाद्रींची परवानगी घेत स्मशानात खड्डा उकरण्याचं काम चालू झालं. मात्र झालं असं की नीट पहाणी करून निवडलेल्या जागीही अचानक मृतदेह सापडला आणि जीर्ण सापळा नव्हे तर अलिकडेच मरण पावलेला मानवी देह. यामुळे स्थानिकांत असंतोष पसरला. युनिटला घेरण्यासाठी लोक जमू लागले आणि कसं बसं युनिट सहीसलामत बाहेर पडलं.  कसंबसं शूटींग पूर्ण झालं. चित्रपट प्रदर्शित झाला आणि तुफ़ान चालला. त्यानंतर रामसे बंधूंनी मागे वळून पाहिलंच नाही. विशेष म्हणजे रामसेबंधू निर्मित असं म्हणताना शब्दश: सगळे रामसे बंधू निर्मितीत सहकार्य करत असत. कुमार रामसे स्क्रिप्ट लिहित, गंगू रामसे कॅमेरा सांभाळत, केशू रामसे प्रोडक्शन बघत, किरण साऊंड्चं बघत असत, तुलसी आणि श्याम दिग्दर्शन करत असत. अर्जून एडिटींगचं काम बघत असत.


#ramsebandhu #fogajzaminkeniche


Inmarathi पूर्वप्रकाशित