Sunday, November 5, 2017

तो क्या हुवा था कल रात को...




एखाद्या जुन्या सिनेमाचा रिमेक आला की जुन्यापेक्षा नवा वेगळा आहे का? जमलाय की फसलाय? ही तुलना अनिवार्य असते.

1969 च्या इत्तेफाक चा रिमेक येणार म्हटल्यावर  उत्सुकता हीच होती की नेमका काय बदल असेल नव्यात? 

69 मधे  नायिका ग्रे शेडमधे दाखविण्याच धाडस यश चोप्रानी दाखवलं हेच खूप. शिवाय ज्या काळात सिनेमातली गाणी जास्त गाजत त्या काळात गाणं विरहीत कथानक सादर करणंही धाडसाचंच होतं.
सर्वात मोठं धाडस म्हणजे अशा कथानकासाठी निवडलेली स्टारकास्ट. 

आता एव्हाना अशी कथानकं, ग्रे शेड असणार्या नायिका/नायक, अॅण्टिहिरो सगळं लोकमान्य झालंय. त्यामुळे प्रेक्षकाना धक्के देणं सोपं राहिलं नाही.

अशा प्रकारच्या सिनेमाचं कथानक जर आधीपासूनच माहित असेल तर आणखिनच कठीण परिक्षा.
आणि या सगळ्या परिक्षांत नवा इत्तेफाक अव्वल गुण घेत पास झालाय.
कथानक माहित असूनही कथेत आपण गुंतत जातो हे सगळ्यात जास्त कौतुकास्पद आहे.
69 चा काळ आणि 2017 मधे प्रचंड फरक आहे. सामाजिक, आर्थिक, तांत्रिक अनेक बाबतीत बदल झालेत या सगळ्याचं प्रतिबिंब नव्या सिनेमात आहे.
अट्टाहासानं जुनं धरून न ठेवता त्यात जे आवश्यक ते बदल केलेत, कथानकाच्या गाभ्याला न हलवता जे बदल केलेत त्यानं नाविन्य आलंय.

इस कहानी के तीन पेहेलू है... हा जुन्या इत्तेफाक मधला संवाद नव्यात आहे . पण इथे अक्षय बाजी मारतो.
जुन्यात इफ्तेकारला किंचीत वायाच घालवलाय असं अक्षयचा नवा पोलिस अधिकारी बघताना वाटतं.
नवा जास्त क्रिस्प बनलाय, अधिक तर्किक वाटतो. उदा. जुन्यामधे वेड्यांच्या हाॅस्पिटलमधला डाॅक्टर नेमका नायिकेच्या ओळखिचा (का? याचं उत्तरही नाही) , नायक नेमका तिच्या घरात घुसतो. (का चं उत्तर नाही) असे अनेक सुटलेले धागे नव्या कथानकात मस्त गुंफलेत आणि आपण त्यात अडकत जातो. 

जुन्यामधे  क्लायमॅक्सला या सगळ्या इत्तफाकचं वर्णन नायक करतो
तसाच नव्यातही करतो पण नव्यातल्या नायकाचं ऐकताना सॅल्यूटच ठोकायला होतं.

अर्थात नव्यातही काही गडबडगुंडे झालेत पण ते दूर्लक्ष करता येतात.

अक्षय खन्नाचा पोलिस अधिकारी आणि  सिध्दार्थचा नायक यांच्यासाठी बघायलाच पाहिजे असा सिनेमा.
#ittefaq #sidharthmalhotra#akshaykhanna#sonakshisinha#ratbakiremix#dhrmapictures

Wednesday, June 21, 2017

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आतासारखं इंटरनेट आणि गुगल नावाची हुकमी हत्यारं सोबत नसण्याचा नव्वदीचा काळ. पत्रकारिता आणि संवादशास्त्र असं भारदस्त नाव असणारा पीजी कोर्स करत असण्याचा काळ. अनेक विषयांतून एक स्पेशल सब्जेक्ट निवडायचा होता. तोपर्यंत जनसंपर्क आणि जाहिरात हेच आपल्याला आवडतं हे ठामपणानं माहित होतं आणि त्यातच स्पेशलायझेशनही करायचं होतं. मात्र, पहिल्या वर्षी हळूच हा सिनेमा नावाचा विषयही आला. हळूहळू यात गोडी वाटायला लागली. सिनेमा शिकायचा असतो, जे दिसतं त्यापलिकडेही सिनेमात बरंच काही असतं जे आवर्जून शिकलं पाहिजे असं वाटायला लागलं. मग जनसंपर्क मागे पडून स्पेशलायझेशनला फ़िल्म घेतलं. सुरवातीचे रोमॅंटिक दिवस लगेचच उतरले कारण या विषयावर भरपूर काही शिकवतील अशी पुस्तकं मराठीत नव्हती आणि त्या काळात आपल्याला इंग्रजी झेपतच नाही असा ठाम न्यूनगंड होता. आमच्या डिपार्टमेंटचा जीवही तसा छोटाच होता आणि सिनेमा शिकणारे विद्यार्थी तर त्याहून कमी. पहिल्या वर्षी चारजणं होतो आणि मास्टर्सला तर मी एकटीच. तोकडे संदर्भ आणि मर्यादित लायब्ररी या बळावर सिनेमा शिकताना थकायला व्हायला लागलं आणि खरं सांगायचं तर गंमतही वाटत होती. एक असा विषय जो खरं तर आयुष्याचा जवळपास अविभाज्य भाग होता पण तो शिकायला संदर्भच नव्हते पुरेसे. पहिल्या वर्षी तर फ़िल्म शिकविणार्‍या फ़ॅकल्टिचाही आनंदच होता. एकतर बरेच आठवडे कोणी नव्हतंच. मग एक सर येऊ लागले. शिकवणं कमी आणि गप्पा जास्त होत्या. हळूहळू कळलं की सरांनी जॉकी नावाच्या एका मराठी मालिकेत एक्स्ट्राचं काम केल्याचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. मग लक्षात आलं की आता इथून पुढे आपलं आपल्यालाच या विषयाला भिडलं पाहिजे. जिथून जे मिळेल ते वाचण्याचा सपाटा लावला. पुढच्या वर्षी मात्र कुंडलीतले ग्रह चांगले जोरावर होते. अनुभवी, अभ्यासू नारकर सर फ़ॅकल्टी म्हणून मिळाले. खरं सिनेमा शिकणं इथून सुरू झालं. तुलनेनं छोटा आवाका असणार्‍या छोट्या शहरातल्या एका छोट्या डिपार्टमेंटमधल्या एकुलता एक विद्यार्थी असणार्‍या या वर्गाला सुरवात झाली. अंधार्‍या खोलीतल्या पडद्यावर दुनियाभरातल्या सिनेमांचे तुकडे दाखवत सर सिनेमाची भाषा शिकवायला लागले. ही नवी वर्णमाला खूपच अमेझिंग होती. आतापर्यंत जे शिकलो त्याहून वेगळं काहीतरी शिकतोय आणि असं काहीतरी शिकणारे आपण इथे तरी एकमेव आहोत हे जाणवून लई भारीवालं फ़िलिंग यायचं. 😉 
सत्यजीत रेंचे सिनेमे पूर्वी दूरदर्शनवर रविवारी दुपारी लागायचे ते त्या वयात बहुतेकदा रटाळ वाटुनही पाहिले होते. एकाच संथ लयीत चालणारे ते सिनेमे कधी संपणारच नाहीत असं वाटत असायचं. कळायचं तर ओ की ठो नाही. पण मोठ्यांच्य बोलण्यातून रेंच्या बद्दलचा आदर ऐकून वाटायचं आपण नक्कीच काहीतरी वेगळं आणि ग्रेट बघतोय. मला समोर जे चाललंय त्यातलं काहीएक कळत नाहीए हे सांगायला संकोच वाटायचा आणि मग तास न तास नुसतेच डोळे रुतवून त्या छोट्या पडद्याकडे बघत बसण्यावाचून पर्याय नसायचा.
आता आमच्या या दगडी भक्कम इमारत असणार्‍या या ह्युमॅनिटी डिपार्टमेंटमधल्या दुसर्‍या मजल्यावरच्या त्या थंड अंधार्‍या वर्गात बसून पुन्हा रेंचे सिनेमे बघताना नजर बदलली होती. हळूहळू सिनेमा कसा बघायचा, हे कळत चाललं होतं आणि लहानपणी रटाळ वाटलेला तोच सिनेमा आता काहीतरी वेगळीच अनुभूती देत होता. सिनेमा चालू असताना मधेच तो पॉज करून सर बोलायला लागयचे. प्रत्येक फ़्रेम समजावून सांगत अमूक असंच का आणि तमूक तसंच का, हे स्पष्ट करायचे. सरांच्या तासाला बेल नव्हती हे एक बरं होतं, कारण बोलत राहिले की सर बोलतच रहायचे. मग मधेच भानावर येत, "अंम, चला पुढे", असं म्हणत पॉज मोकळा करायचे.



सिनेमा शिकायचे दिवस भाग एक

Sunday, May 21, 2017

हॅपी हार्मोन्स : चिवचिसौका

अडीच तास डोकं घरात ठेवून थिएटरमधे गेला तर तुमच्या फेफड्यांत प्राणवायू ठुसठुसके भरायची खात्री देतो  , चि. व चि. सौ. का. पण अट एकच, ई ऽऽऽ ही माणसं अशी काय? हा प्रश्न मनात येऊ द्यायचा नाही. एक न एक पात्र सगळंच अती करतं  तरिही त्याची माती झालेली नाही हे महत्वाचं.
आम्ही तुम्हाला हसवणारच असं ठरवून बेतून शिवलेली पटकथा आहे आणि ती शिवण पक्की बसवणारे संवादही. प्रत्येक कलाकारानं लई भारी काम केलंय मात्र धमाल केलीय ती नायिकेच्या लहान भावानं (पुष्कर ).  त्याचा अगाऊपणा प्रत्येकवेळेस गदगदून हसवतो. त्याचे काही संवाद तर कहर आहेत. हे लिहितानाही मला त्याची पौगंडावस्था आणि हार्मोन्स आठवून हसायला येतंय 😂😂
संवादांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. खुसखुशीत आणि चटपटीत संवादांमुळे प्रासंगिक विनोद आणखी गुदगुल्या करतात.
ललीत  प्रभाकरच्याबाबतीत मी जरा बायस्ड असल्यानं तो चांगलाच आहे 😉 मृण्मयी खपून गेलीय पण मुळात ती सिनेमाची हिरोईन म्हणून पटतच नाही. (काही कलाकार मालिकेतच छान वाटतात )
एकूण , टाईमपास हवा असेल तर पहायला हरकत नाही मात्र ज्यांना हा लाऊडनेस फारसा रूचत नाही त्यांनी झी वरच्या प्रिमियरची वाट बघा.

* का कोणास ठाऊक सिनेमा बघताना सारखं वाटत होतं की, एका लग्नाची गोष्टची ही पुढची कडी आहे. खरं तर यावर धमाल मालिका बनवता आली असती.

* काल आयपीएल ची फायनल असूनही सिनेमाचे सगळे शो फूल होते. तिकिटं मिळणं मुश्किल झालं होतं

* याचा अर्थ मराठी माणसाला पुणे-मुंबई मॅचमधे काडीचा इंटरेस्ट नव्हता असा घ्यायचा की, सिनेमाची प्रसिध्दी इतकी करेक्ट झाली की त्यानं लोकांना आयपीएलच्या मोहमायेतून थिएटरकडे खेचून आणलं असा घ्यायचा?

* मराठी सिनेमाची तिकिटं बुक करताना " फिलिंग फास्ट" दिसलं आणि थिएटर गच्च भरलेलं पाहिलं की फार फार भारी वाटतं.
#chivchisouka

Thursday, April 20, 2017

तापसीचा शबाना



नाम शबाना. ट्रेलरवरून जसा वाटला होता तसाच आहे. निरजचे सिनेमे सहसा फसत नाहीत आणि शबानाही त्याला अपवाद नाही. बेबीचा प्रिक्वल म्हणून याची जाहिरात झाली असली तरिही हा तसा स्वतंत्र सिनेमा आहे. पात्रं सोडली तर बाकी कोणताच धागा काॅमन नाही. बेबीमधे तापसी मधेच येते आणि काम आटपून जाते. ती होती म्हणून फार ग्रेट काही नव्हतं आणि नसती तरी फार फरक पडला नसता. अगदी तसंच शबानामधे अक्षयचं आहे. तो येतो आणि काम करून निघून जातो. पूर्ण कथानक शबानाभोवती फिरत रहातं आणि तापसीनं शबानाला दोनशे टक्के न्याय दिलेला आहे. सुरवातीपासून शेवटपर्यंत कोरडा चेहरा ठेवून वावरणारी शबाना क्वचित हसली आहे. तिचा टफनेस तापसीनं खूप कन्व्हिन्सिंगली व्यक्त केलाय. हरवलेली नजर, कोरडा चेहरा आणि अॅथलिट बिल्ट यामुळे ती 100% "शबाना" वाटतेच. एकूणंच या सिनेमाचं "दिसणं" खूप वास्तव झालंय. शबाना रहाते तो मुहल्ला, तिथली टिपिकल गर्दी, गजबजलेलं मार्केट हे रियल लोकेशनवरचं आहे. या बॅकड्राॅमुळे सिनेमाला एक चेहरा मिळाला आहे. अगदी शबाना जाते ते ईराणी हाॅटेलही या सगळ्यात खटकन बसतं.
चित्रपटाच्या सुरवातीलाच एक पंटर शबाना धक्का मारतो आणि ती त्याला रितसर धुवून काढते. पुढे हाच पंटर टॅक्सी ड्रायव्हर म्हणून गाठ पडतो आणि सेकंदात शबाना  ओळखते की हा एजन्सीचा माणूस आहे. तो विचारतो कहां जाना है मॅडम ? त्यावर निर्विकारपणानं ती घर ही छोड दो भैय्या म्हणते. हा सिन का कोणास ठाऊक लक्षात रहातो. एका सेकंदासाठीही तापसीनं भूमिकेचं बेअरिंग सोडलेलं नाही. निरजच्या कथेनं तिला तसं करूही दिलेलं नाही.
 दिवसेंदिवस तापसीच्या प्रेमात पडावं अशा भूमिका ती साकारतेय. शबाना तापसीसाठी महत्वाचा टप्पा आहे. ही नाॅनग्लॅमरस भूमिका तिनं सहज साकारली आहे, थोडक्यात शबाना पूर्णपणे तापसीचा सिनेमा आहे आणि तथाकथित सुपरस्टारव्हॅल्यू नसणार्या तापसीनं एकहाती किल्ला लढून जिंकला आहे. कथानकात काही बिळं भोकं आहेत पण निरजच्या कथानकाला एक वेग असतो ज्यामुळे जे पटत नाही तिथे फार रेंगाळायला होत नाही.

तापसी शिवाय जर आणखी कोणी लक्षात रहात असेल तर तो म्हणजे पृथ्वी. अय्यामधे दिसलेला आणि शबानात असलेला पृथ्वी यात जमिन अस्मानाचं अंतर आहे.  बाकी अक्षय, अनुपम, डॅनी आणि मनोज हा यशस्वी फौजफाटा आहेच. मात्र तरिही लक्षात रहाते तापसीच

Monday, January 23, 2017

अनुभव




कसं असतं नां की, श्रवणीय गाणं जमायला सूर लागावा लागतो, उत्तम पदार्थ बनण्यासाठी सगळे घटकपदार्थ अचूक पडावे लागतात आणि एक छान सिनेमा बनायला अभिनयापासून कथेपर्यंत सगळी भट्टी जमून यावी लागते. असाच मस्त जमलेला चित्रपट आहे बासुदांचा "अनुभव". बासुदांच्या तीन चित्रपटांच्या सेरीजमधला हा माझा सर्वात आवडता चित्रपट आहे. तो काळच सिनेमांचा सर्वोत्तम काळ होता. व्यावसायिक चित्रपटांच्या बरोबरीनं समांतर सिनेमे निघत होते.  कथा, अभिनय या निकषांवर अस्सल असणारे अनेक सिनेमे या काळात आले. यापैकीच बासुदांचे सिनेमे. मुख्यत: पती पत्नी संबंधांवर बेतलेले.  अनुभवही याच जातकुळीचा सिनेमा, लग्नानंतर काही वर्षांनी स्थिरावलेलं पती पत्नीचं नातं आणि त्यात काही कारणानं काही काळ उठणारे तरंग असा कथाविषय असाणारा हा चित्रपट. ब्लॅक- व्हाईट असुनही कमालिचा सुंदर किंबहुना ब्लॅक व्हाईटमुळेच जास्त सुंदर दिसणारा.
             हा चित्रपट बघताना आतून एक बेचैन बुलबुला सतत अस्वस्थपणे हलत असतो, याचं कारण, याची प्रत्येक फ्रेम चित्रपटाच्या कथेशी इमान राखून समोर येते. चित्रपट बघताना नक्की कसं वाटतं माहित आहे? भर दुपारी तुम्ही कधी एखाद्या निरव ठिकाणच्या डोहावर गेलाय? आजुबाजुला चिटपाखरू नसताना, कसलाही आवाज, हालचल नसताता तो गडद हिरवा खोल डोह कसा कंटाळवाणा चुपचाप पसरलेला असतो? आपल्याला ते पाहून खडा टाकून या चित्रात जरा जीवंतपणा आणावासा वाटतो......तसं काहिसं हा चित्रपट पहाताना जाणवत रहातं. लग्नानंतर काही वर्षांनी पतीपत्नीचं काहिसं एकसुरी होणारं नातं इतकं परफेक्ट समोर येतं की आपण या दोघांत तिसरे होउन फिरत रहातो. त्यांच्या त्या संथ डोहासारख्या आयुष्याचे साक्षिदार बनत जातो आणि मग अशाच एक वळणावर  गीता दत्तचं  मेरी जान मुझे जान न कहो गाणं चित्रपटात इतकं सहजपणानं येउन जातं की आपल्या  लक्षातही  येत नाही, कथेत हळूवार गाणं कसं गुंफ़ावं याचं हे गाणं म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.  आपण गाणं पाहिलं असं न वाटता अलगद ते कथे च्या ओघात येऊन जातं.  घरकाम करताना एखादी गृहिणी जसं गुणगुणत एका लयीत  काम आवरत असते तसं हे गाणं येतं आणि जातं.
                     हे गाणं  दोन येतं, पहिल्यांदा चित्रपटची नायिका - तनुजा , अंघोळ करताना सहज गुणगुणत असते आणि दुसर्‍यांदा नायक नायिका - संजीव कुमार आणि तनुजा खुप दिवसांनंतरचा जुना निवांतपणा अनुभवत असतात तेंव्हा. यातला दुसरा भाग जास्त तरल झाला आहे. अलिकडे एकमेकांसाठी रिकामा वेळच मिळत नाही अशी सल असणारं, तरूणपणाकडून प्रौढपणाकडे चाललेलं एक तरूण जोडपं, कार्यमग्न पती आणि कलाकार, रसिक पण रिकामपणानं घर सांभाळणारी ग्रुहिणी. सगळ निरस कंटाळवाणं चाललेलं आहे, एकमेकाविरूध्द तक्रार करण्याचंही आता रूटिन बनलं आहे, जे चाललंय त्यात आता काही बदल होणार नाही हे सत्य स्वीकारून एकमेकासोबत रहाणारे पती पत्नी आणि एक दिवस अचानकच तो चुकार निवांत दिवस या जोडप्याच्या आयुष्यात येतो.  ऊन्हाची तलखी पावसाच्या एका सरसरून आलेल्या सरीमुळं कशी धुवून जाते तसं होतं. सगळे शिकवे गिले दूर होतात, अगदी निवांत चाललेल्या या दिवसाची दुपार डोक्यावर येते आणि अचानक पाऊस बरसायला लागतो, बस्स! आणखी काय पाहिजे? बाहेर कोसळणार्या सरी, आणि खिडकीच्या तावदाना पलिकडून डोकावणारा निशिगंध, पाण्याचे टपोरे थोंब माळलेली निशिगंधाची ताजी फुलं आणि हे जोडपं.  केवळ केवळ आणि केवळ इतक्या भांडवलावर हे कमालिचं रोमॅंटिक गाणं येतं. तनुजाचे टाईट क्लोजअप फ्रेममधून आपली नजर हलूच देत नाहीत. गोड दिसणारी तनुजा या गाण्यात,"दो जुडवा होठों की बात कहो आंखो से...मेरी जान" असं म्हणताना आणखिनच खट्याळ गोड दिसलीय. गीता दत्तचा लडिवाळ आवाज, तनुजाचा तितकाच लाडिक अभिनय आणि संजीवकुमारचं कमालिचं रोमॅंटिक दिसणं या सगळ्यानं हे गाणं अजरामर झालंय. बॉलिवुडवाल्यांना रोमान्स करताना पाऊस अगदी हटकून लागतोच मात्र बरेचदा हा पाऊस अगदी ओढून ताणून आणल्यासारखा येतो. या गाण्यात मात्र तो अगदी सहज अलगद बरसलाय. बॉलीवुडच्या पावसातल्या रोमॅंटिक गाण्यात या गाण्याचा म्हणूनच अगदी वरचा नंबर लागतो.


कहानी



कसं असतं नां की आपण रोज तेच ते जेवत असतो कधी भाजी चांगली जमते तर कधी कोशिंबीर एखादा रविवार असा उजाडतो की रोजचाच सगळा स्वयंपाक पंचपक्वानांइतका रूचकर बनतो मग आपण तो तुडुंब जेवतो आणि तृप्तीचा ढेकर देतो. कहानीच्याबाबतीतही असंच झालंय. सगळं नेहमीचंच असलं तरिही त्याची भट्टी इतकी छान जमलिय की थिएटमधून बाहेर येऊनही त्याचा प्रभाव उतरत नाही. चित्रपटाचं समिक्षण वगैरे इथे अजिबात करणार नाहीए मात्र हा चित्रपट बघताना खुप दिवसांनी जो मस्त अनुभव आला नां तो तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावासा वाटला.
एव्हाना या चित्रपताबाबत भरपूर लिहूनही आलेलं आहे आणि जबरदस्त हिटचा दर्जाही त्याला मिळालेला आहे, मात्र हिटच्या स्टार्सच्याही पलिकडचा एक अनुभव हा चित्रपट देतो. विद्या बालन ही बाई आता एक जबरदस्तच प्रस्थ झालेली आहे. इश्किया, पा, जेसिका, डर्टी पिक्चर आणि आता कहानी. इतकी जबरदस्त रेंज असणारी आजच्या पिढीत ती एकमेव अभिनेत्री आहे (अर्थात असं माझं वैयक्तिक मत आहे). द डर्टी पिक्चरचा अंमल अजून पुरता ओसरला नसताना, कहानी तिची ती डर्टी इमेज कुठच्या कुठे घेऊन गेलाय. या चित्रपटात पहिल्या फ़्रेमपासून अखेरच्या फ़्रेमपर्यंत तिनं जे काही साकारलंय ते मस्त आहे. हा सिनेमा म्हणजे अक्षरश: रोलर कोस्टर राईड आहे. थोडा सुखावह, थोडा पोटात गोळा आणणारा, नको नकोसा तरिही हवाहवासा वाटणारा अनुभव देणारी ही राईट अजिबात चुकवू नये अशीच आहे.
कथानकाबद्दल बोलायचं तर चित्रपटभर "बिद्या मॅडम" आहेत त्यांच्यासोबत असणारा इस्पेक्टर आहे, ऑफ़िसर मिस्टर खान आहे, विमा एजंट बॉब आहे, हॉटेलमधला पोर्‍या आहे, दर दोन मिनिटांनी संवादातून येणारा मिलान दाबजी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोलकता आहे. तरिही या चित्रपटात दोनच मुख्य भुमिका आहेत एक बिद्या बाकची आणि दुसरं "कोलकोता".
कोणताही चित्रपट दोन अर्थांनी "दिसतो". एक म्हणजे समोर जे कथानक साकारलं जात आहे ते आणि दुसरं म्हणजे तो चित्रपट आपल्याला जो "फ़िल" देतोय ते. हा फ़िल शब्दात पकडता येण्यासारखा नसतो, प्रत्येकाला अनुभवाला येणारा तरिही त्याची व्याख्या न करता येणारा हा फ़िल चित्रपटातून त्याच्या रंग-रूप-गंधासह भिडत रहातो आणि असा भिडणारा फ़ील चित्रपटाला वेगळा परिणाम प्राप्त करून देतो. "कहानी"तला कोलकता शहराचा जो फ़ील आहे तो असाच भिडतो (ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यांना मला नेमकं काय म्हणायचं आहे समजेल). या शहरातल्या अरूंद गल्ल्या, वहानांच्या विविध हॉर्नचे एकाचवेळेस येणारे आवाज, माणसं-वाहनं यांची एकच कचकच गर्दी आणि या गर्दीत एकटी भिरभिर फ़िरणारी बिद्या बाकची.
रहस्यमय चित्रपटाचं यश असतं ते म्हणजे कथानकात प्रेक्षकाला गुंतवत असतानाच त्याचा अंत काय असेल, रहस्यभेद काय असेल याचे अंदाज लावायला भाग पाडणं. या फ़्रंटवर चित्रपट शंभर टक्के यशस्वी झालाय. मध्यंतरानंतर पाच दहा मिनिटांनी साधारण कल्पनाही येऊन जाते तरिही कथानकातला इंटरेस्ट तसुभरही कमी होत नाही हे कौतुकास्पदच आहे. याला कारण आहे कथानक सांगण्याचा वेग. त्यात घाईही नाही आणि उगाच रेंगाळलेपणाही नाही. मध्येच हा सयको-थ्रिलर असावा की काय असा अंदाज करायलाही कथानक भाग पाडतंच. चित्रपटातलं प्रत्येक पात्र त्याची भक्कम कामगिरी करतं विशेषत: विमा एजंट इतका छान नीच वठवला आहे की त्याला जाऊन चार रट्टेच घालावेत असं वाटतं. तरिही यापैकी कोणत्याही पात्राला बिद्या बाकचीच्या "कहानी"वर वरचढ होऊ न देण्याची किमया दिग्दर्शकानं साधली आहे. या सगळ्या सुंदर प्रवासावर कथाकथनावर कळस चढविला आहे अमिताभ बच्चन यांच्या आवाजातल्या रविंद्रनाथ टागोर यांच्या "एकला चलो रे" या गाण्यानं आणि त्यांच्या नॅरेशननं. इतक्या नेमकेपणानं हे गाणं कथानकात येतं की त्याची मग एक धुंदीच चढते. विद्या बालनच्या अभिनयाबाबत काहीच बोललं नाही तर ते पाप होईल. विद्या डोळे, ओठ, भुवया, नाक या सगळ्यांसहित सुंदर डॊयलॊग डिलिव्हरी करते. तिची बिद्या मॅडम इतकी कन्व्हिसिंग आहे की डर्टी पिक्चरमधली सिल्क एका क्षणासाठीही तिच्यात दिसत नाही. या दोन भिन्न व्यक्ती असाव्यात इतका वेगळेपणा दिसण्यापासून अभिनयापर्यंत आणि व्यक्त होण्यापर्यंत आहे. अखेरच्या प्रसंगातले तिचे डोळे आणि त्यातले भाव चित्रपट पाहून बाहेर आल्यावरही आठवत रहातात. अख्खा चित्रपट तिनं एकहाती तोलून नेलाय. सोन्यासारख्या गोष्टीला तिनं सोन्यासारखा बावनकशी अभिनय दिलाय. हा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला ती आवडून घ्यावीच लागेल
एकला चलो रे.....







Thursday, January 19, 2017

वेगळे आणि दमदार

सिनेमा म्हणलं की हिरो आला आणि हिरो म्हणलं की , देखणा, ढिशुंम ढिशुम फ़ायटिंग करणारा, बागेत गाणं म्हणणारा, डॉयलॉगबाजी करणारा आणि चिकना चुपडा नरपुंगव अशीच काहिशी व्याख्या बॉलिवुडच्या मसाला पटांनी केलीय. या सगळ्यात न बसणारे वेगळे आणि भारी हिरोही अधून मधून बॉलिवुड मसाल्यात आपलं वेगळेपण दाखवतात. भलेही यांचे सिनेमे कोटिच्या बाता करत नाहीत पण ते जिंदगी के करिब असतात, त्यांचं वागणं, बोलणं, दिसणं सगळंच खूप रिअल असतं आणि म्हणूनच हिरोगिरी न करताही ही मंडळी भाव खाऊन जातात.
हे सगळ असं सांगायला लागलं की सर्वात पहिलं नाव येतं इरफ़ान खान चं. पूर्वी ही जागा मनोज वाजपेयीला मी अनेक वर्षं प्रेमानं देऊ केली होती मात्र पठ्या त्याच त्या चाकोरीतून हलायलाच तयार नाही. त्यामुळे त्याचं स्थान किंचित हललं आणि मग तिथे इरफ़ान आला. इरफ़ान अत्यंत वाईट दिसतो, त्याचे डोळे बाहेर आल्यासारखे आहेत आणि असंच बरंच काही अनेकांना वाटतं तरिही इरफ़ान खानचं हे वेगळं असणंच मला खूप आवडतं. हा शांतपणानं अस्वाद घेत घेत तो स्टोरी पुढे नेतो. उगाच घाई गडबड करत अभिनय तोंडावर फ़ेकत गोष्टीचा हिरो बनणं त्याला अमान्य आहे. त्याचा कोणताही सिनेमा घ्या, त्याला एक मध्यम लय आहे. सगळ्यात मस्त सिनेमा म्हणजे लंच बॉक्स किंवा पिकू...किंवा पिकू आधी आणि मग लंच बॉक्स...किंवा दोन्ही दाटीवाटीनं एकाच स्थानावर. गंमत म्हणजे दोन्ही पात्रं एकदम विरोधी स्वभावाची . त्यांच्या देहबोलीपासून सगळंच वेगळं तरिही पडदाभर व्यापून रहातो इरफ़ान. लंचबॉक्समधला नायक ज्येष्ठ म्हणावा अशा वयोगटातला, एकलकोंडा, अंतर्मुख, जगापासून दूर एकांतात रहाणारा, एकसुरी आयुष्य जगणारा, सीधा साधा. हे पात्र कमालिचं कंटाळवाणं होण्याच्या शक्यता होत्या मात्र एकसुरीपणातल्या ज्या छटा इरफ़ान दाखवतो त्यानं पात्राला बिल्ट अप मिळतो. रूढार्थानं बॉय मिटस अ गर्ल, सिनेमा नाहीच शिवाय अजिबातच मसाला नाही तरिही सिनेमाची गोष्ट खिळवून ठेवते त्याला कारण ही तीन पात्रं. मदारी या अगदी अलिकडच्या सिनेमातही त्यानं लाजवाब काम केलंय.  त्याचं सर्वात महत्वाचं आहे दिसणं. अत्यंत सामान्य दिसतो म्हणूनच तो कन्ह्विसिंगही वाटतो. पिकूमधे म्हणूनच अमिताभ नावाचं गारूड आणि दिपिकाच्या ग्लॅमरमधेही तो मस्त भाव खातो. त्याच्या सिनेमाला कथा असते आणि यात त्यानं सातत्य ठेवलंय. याचमुळे इरफ़ान लाडक्या यादीत वर आलाय.



नवाझुद्दिन सिद्दकी कहानी दोन पर्यंत कोणाला माहितीही नव्हता. या सिनेमात भकाभका सिगरेटी पिणार्‍या पोलिस अधिकार्‍याची भूमिका ही मी पाहिलेली भूमिका.  गॅंग ऒफ़ चा एकही भाग मी पाहिला नसल्यानं यातल्या त्याच्या भूमिकेचं कौतुक फ़क्त मी ऐकून आहे. त्यानंतर तो एकदम पक्का लक्षात बसला ते तलाश मधल्या लंगड्या तैमूरच्या भूमिकेमुळं. या भूमिकेत तो इतका खरा खुरा दिसलाय की वाटतच नाही हा अभिनय करतोय. देहबोलीसहित त्याचं तैमूर असणं निव्वख लाजवाब. खरं तर ही अगदीच साईडची भूमिका पण नवाझुद्दीननं ती अशा उंचीवर ठेवलीय की त्याच्या जागी इतर कोणी अशी कल्पनाही करवत नाही. तीनमधेही त्याची महत्वाची भूमिका होती मात्र स्क्रिनप्लेमधेच विसविशीतपणा आल्यानं त्याची भूमिका पकड घेता घेताच थांबते. तरिही जो काही भाग त्याच्या वाट्याला आला आहे त्यात त्यानं अगदी जान ओतत नवाझुद्दीन छाप सोडला आहे. आत्ताशी त्याची सुरवात झाली आहे आणि अजून बराच मोठा पल्ला तो गाठेल यात शंकाच नको.





मनोज वाजपेयीनं छोट्या पडद्यावरच्या मोठ्या मालिकेत काम करून त्याकाळात प्रचंड ग्लॅमर कमावलं, कौतुक कमावलं. याचं कारण कदाचित ती भट कॅम्पची मालिका होती हे ही असावं. त्यावेळेस छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर आलेल्यापैंकी एक शाहरूख आणि दुसरा मनोज हे दोघेच दमदार यश मिळवू शकले. पहिलाच सिनेमा रामगोपाल वर्माचा आणि चित्रपटाची नायिका त्या काळातली टॉपची, उर्मिला. मनोजचा भिकू म्हात्रे. खरं तर मनोज त्या अर्थानं या कथानकाचा नायक नव्हताच पण त्याच्या भिकूनं सत्याला कायच्या काय बनवून टाकला. मुख्य हिरो त्या सिनेमातही झाकोळला गेला आणि नंतरही फ़ारसा आलाच नाही. मनोजच्या करियरची गाडी मात्र निकल पडी. ओमशिव पुरीनंतर मनोज मला त्या गटातला वाटातो. सर्वच प्रकारच्या भूमिका तितक्याच गांभिर्यानं करत छाप पाडणारा. स्पेशन छब्बीसमधे कलाकारांची फ़ौज असतानाही मध्यतरांच्या आसपास आलेल्या त्याच्या भूमिकेत म्हणूनच तो लक्षात रहातो.



या तिकडीनंतरचं नाव आहे, जिमी शेरगील. एकदम चिकना चुपडा आणि चॉकलेट हिरो मटेरियल. आला गुलझारच्या माचिसमधून आणि मग रूळला यश चोप्रांच्या सिनेमामधून, पण तिथे त्याला सूर सापडलाच नाही. ऑफ़बीट सिनेमांमधून आजूबाजूच्या भूमिकांमधे मात्र हा भाव खाऊन जातो. तन्नू वेडस मन्नू मधल्या दोनही भागात हा एकटाच आहे ज्यानं त्याच्या भूमिकेचं बेअरींग जराही सोडलेलं नाही. कंगना पहिल्या भागात जितकी नैसर्गिक वाटलीय तितकीच दुसर्‍या भागात "मैं हिरोईन हूं" अविर्भाव बाळगणारी. माधवन पहिल्या भागात जितका नैसर्गिक बावळट वाटलाय तितकाच दुसर्‍या भागात ओढून ताणून बावळट. पण जिम्मी पहिल्या भागात जसा आहे तसाच दुसर्‍या भागात वाटातो खर सांगायचं तर दुसर्‍या भागातून त्याचं पात्र काढलं असतं तर सिनामीतली जान गेली असती इतका भक्कम आधार त्याच्या भूमिकेचा आहे. स्पेशन छब्बीस, वेन्स्डे, यकिन, मदारी अशा एकाहून एक सिनेमांमधून छोट्या मोठ्या भूमिका त्यानं केलेल्या असल्या तरिही त्याची प्रत्येक भूमिका लक्शात रहाते. खरं तर जीमी याहून जास्त मोठं यश डिझर्व्ह करतो. पूर्ण लांबीची नायिकाची भूमिका डिझर्व्ह करतो पण आपल्या इंडस्ट्रीत शिक्के मारायची फ़ार घाई असते आणि जिमी हाही शिक्क्याला बळी पडलेला गुणी अभिनेता आहे. त्याचा मुहब्बते किंवा मेरे यार की शादी है ते तनू वेडस मनू हा प्रवास थक्क करणारा आहे. सुरवातीच्या काळात साबणासारखा मख्ख चेहरा असणारा हा कधी आयुष्यात अभिनयही करेल यावर विश्र्वास बसणं कठीण होतं.



ही यादी खरं तर इथेच संपत नाही. असे अनेक चेहरे आहेत इंडस्ट्रीत जे रूढार्थानं हिरो मटेरियल नाहीत पण त्यांचं असणं खूप महत्वाचं आहे. कारण मसाला मारके फ़िल्ममधे झटका आणण्याचं काम ही मंडळी करतात.

Monday, January 16, 2017



सुईंया सुईंया....






काही काही सिनेमा का आवडतात? याचं काही लॉजिक नसतं. पडेल कॅटेगरीत जमा झालेले हे सिनेमे कधी कधी सिरियस मनोरंजन करतात. हे सिनेमे पाहिले की असं वाटतं अरेच्चा,आधी का बरं आपण हा सिनेमा पाहिला नाही? बरेचदा सिनेमाची पब्लिसिटी नीट झालेली नसते, कधी प्रस्थापित कलाकार नसतात तर कधी मोठ्या चित्रपटांच्या हवेत हे विरून जातात बिचारे.


परवा काय झालं की मॉर्निंग वॉकला जाताना रेडिओवर एक कायच्या काय शब्द असलेलं मात्र कमालिची गोड चाल असलेलं गाणं लागलं. दिल मर्द जात है बदमाश बात है...तन में सुईंया सुईंया...असं काहीतरी. चेहर्‍यावर हसू आलं आणि नंतर विसरायलाही झालं. पुन्हा एक दोन दिवसांनी हेच गाणं लागलं. मग मात्र लक्ष देऊन ऐकलं आणि गंमतच वाटली. मागून उत्सुकताही की हे गाणं आहे कोणत्या सिनेमातलं? एरवी त्याच त्या गाण्याचा अहोरात्र रतीब घालणार्‍या एफ़एमनं हे जरा वेगळं गाणं लावलं म्हणून बरंही वाटलं. पण हे गाणं कोणत्या सिनेमातलं? हा किडा काही स्वस्थ बसू देईना. बरं घरी आल्यावर शब्द विसरायला होत होते, फ़क्त सुईंया सुईंया काहीतरी आहे इतकंच लक्षात राहिलं होतं. मग काय गुगलबाबाला शरण गेले. सुईंया सुईंया चा सर्च टाकला तर भलतंच जपानी काहीतरी दाखवायला लागला. दोन तीन दिवस फ़ारच त्रास दिला या गाण्यानं आणि एरवी एक दिवसाआड लागणारं अचानकच बंद झालं पुढे चार पाच दिवस लागलंच नाही आणि अखेर एक दिवस त्याच्या नेहमीच्या वेळेत लागलं. ताबडतोब वॉक थांबवून गुगलच्या बॉक्समधे शब्द टाईप करून सर्च केलं आणि इतकं बरं वाटलं .... कारण यावेळेस बरोबर काम झालं होतं. या सुईंया सुईंयाची सगळी कुंडली समोर आली होती. गुड्डू रंगीला या भन्नाट नावाच्या सिनेमातलं हे गाणं आहे. पोस्टरवर अर्शद वारसी दिसला आणि मेमरी कार्डमधे खळबळ झाली. मग आठवलं की मागच्या वर्षी असा एक पडेल सिनेमा आला होता. त्यातलं माता का ईमेल आया है हे गाणं सारखं प्रोमोमधे लागत होतं. ते गाणं बघताना अगं आई गं कसले कसले सिनेमे बनतात आणि कसली कसली गाणी असतात असं म्हणत थेट रिजेक्शन स्टॅम्प मारला होता. आज त्याच रिजेक्टेड फ़ाईलला उत्सुकतेनं उघडून बघितल्यावर प्रकरण फारच पडेल नसावं असं वाटलं. मग हा सिनेमा बघितला पाहिजे असंही वाटायला लागलं. युट्युबला शरण जाऊनही उपयोग झाला नाही कारण नळीवर हा सिनेमाच नाही. पुन्हा एकदोन दिवस वैतागात गेले. एकूण हा सिनेमा डोक्याला ताप झाला होता. आधी गाणं मग सिनेमा मिळेना. आता ठरवलंच की बेट्या माझ्यापेक्षा जास्त हुशार आहेस काय? फ़ारफ़ार सर्च करून कष्टानं लिंक मिळवली आणि हॉटस्टारवर अख्खा सिनेमा सापडला. 
वाटलं होतं तितका पडेल अर्थातच नव्हता. म्हणजे दबंग सारखा सिनेमा जर मनोरंजक असेल तर गुड्डू त्याहून दहापट जास्त मनोरंजन नक्कीच करतो आणि राम रतन धन पायोच्या तुलनेत तर सुपरहिट मनोरंजन करतो (उप्स...नेमकी दोन्ही उदाहरणं भाईच्याच सिनेमांची झाली की पण ठीकच आहे म्हणा. शंभरकोटीच्या पायंड्याचं पेटंटही त्याच्याच खिशात आहेच की).
प्रामाणिकपणानं सांगायचं तर सिनेमा नव्वद टक्के जमलाय आणि दहा टक्के गडबडलाय आणि तो इतका गडबडलाय की फ़्लॉपचा शिक्काच बसला. तरिही नव्वद टक्के चांगला असणं हे चांगलंच नाही का?
याचं कथानक फ़िरतं गुड्डू आणि रंगिला या दोन भावांभोवती. माता का जगराता करणं हा मुख्य धंदा आणि या जगरात्याच्या निमित्तानं श्रीमंत घरांची रेकी करून दरोडेखोरांना माहिती देणं हा जोडधंदा ही दोघं करतात. एक कोर्टकेस चालली आहे आणि त्यासाठी दोघे कष्टानं पै पै जोडत आहेत. याचवेळेस एक पंटर यांना किडनॅपिंगची सुपारी देतो. काम सोपं असतं आणि पैसे भरपूर म्हणून गरजेपोटी दोघं तयार होतात. जिला किडनॅप करायचं ती मुकी बहिरी असते. दोघं मोहिम फ़त्ते करतात आणि मुलिला घेऊन थेट शिमला गाठतात. इथे आल्यावर सुरू होता एकाहूनएक जबरदस्त ट्वीस्ट. या मुलिला किडनॅप करून हे दोघे एका सापळ्यात अडकत जातात, त्यातून ते कसे बाहेर पडतात याची गोष्ट म्हणजे गुड्डू रंगीला.
मुख्य भूमिका आहेत अर्शद वारसी, अमित सध, आदिती राव हैदरी आणि रोनित रॉय यांच्या.

चित्रपटाचं रंग रूप रॉ आहे. म्हणजे यात एक रांगडेपणा आहे. नाव अतरंगी आहेच पण सिनेमाही तितकंच अतरंगी मनोरंजन करतो विश्र्वास ठेवा.

ते सुईंया सुईंया बघायचंय? 
इथे बघा   -    https://www.youtube.com/watch?v=6XHsuANpOGU