Saturday, September 14, 2019

ड्रीमगर्ल



आयुषमानच्या सिनेमांचा आता एक सफल ढाचा बनला आहे, बिचारा नायक जो चेहर्यावरून निरागस वाटत असला तरिही काड्या करण्यात माहिर असतो. उत्तर भारतातलं एखादं शहर, रिअल लोकेशन्स आणि स्थानिक फ्लेवर , परिस्थितीत अडकत जाणारा नायक, फाॅर्म्युला हिट,  सिनेमा हिट.
ड्रीमगर्लही याच फाॅरम्युल्यामधे बांधलेला चटपटीत आणि चटोरा सिनेमा आहे.
करम (आयुषमान) लहानपणापासूनच एक अवली कला अंगी बाळगून आहे, तो हुबेहूब बायकांच्या आवाजात बोलू शकतो ( हे आपल्याला पटवून   देण्यात आलंय आणि आयुषमानप्रेमापोटी आपण ते पटवूनही घेतो 😜) त्याच्या या हुनरची चिड येणारा त्याचा बाप जगजीत सिंग (अनू कपूर) मयताचं  सामान विकण्याचा धंदा करत असतो. हिरोला हिरॅईन हवीच म्हणून मग एका सामान डिलिव्हरी दरम्यान त्याला माही (नुशरत) भेटते आणि कथेचा एक अध्याय संपतो.कथेचा दुसरा अध्याय करमच्या बेकारीला संपवून त्याच्या त्या अंगभूत कलेमुळे त्याला सेक्सचॅट करणार्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळण्यानं संपतो. तिसर्या अध्यायात करम पूजा बनून लोकांशी गप्पा मारत तिचा फॅनबेस तयार करताना दिसतो. सिनेमाचा हाच भाग प्रोमो आणि प्रसिध्दीत हायलाईट केलेला असल्यानं लोक पाॅपकाॅर्न घेऊन सरसावून बसतात मात्र प्रत्यक्षात  गरीब गालीबची शायरी,  पायरटेड रफीची गाणी आणि गरीब जस्टिन बिबरच्या बेबीसिटींगमधे पूजा हरवून जाते. इथून पुढे काय होणार आहे हे तुम्हाला कळतं, स्क्रिनप्लेवर होल्ड रहात नाही आणि तो ठेवण्याच्या प्रयत्नात प्रसंग आणखिन आणखिन चटकदार करण्याचे प्रयत्न सुरू होतात आणि समोर जे चाललंय ते ताणलं जात असल्याची भावना  मनात येते (निर्माती बालाजीवाल्या एकताची आहे) सुदैवानं रटाळ होण्याइतपत ताणलं न जाता कथा पुन्हा थोडी पटरी पकडते आणि  निरूपणाकडे प्रवास सुरू होतो. खरंतर सुरवातीपासूनच कोणताही विधीनिषेध न ठेवता, आव न आणता जो प्रवास सुरू असतो तो अचानकच लोकांचा एकाकीपणा, त्यातून अपरिचितांशी बोलण्याची गरज भासणं अशा प्रवचनाकडे सरकतो (जे अगदीच अनावश्यक वाटतं ) क्लायमॅक्सला राधे राधे राधे या सुंदर रासलिलेच्या गाण्याचा आधार दिलेला असतो, घागर्यातला आयुषमान आणि पंजाबी सूटमधली नुशरत मिठी बिठी मारून सिनेमा संपवतात आणि मेलं बाॅलिवुडच्या शास्त्राला अनुसरून एक दारूडं फंजाबी स्वांग ढणढण वाजायला लागतं. खरंतर आपण काही खुर्चीतच बसून रहाणार नसतो पण हे द्दारू, नश्शा, कुड्डी ऐकायला येऊ लागल्यानं जरा भरभर बाहेर जातो इतकंच.

थोडक्यात महत्वाचे-
 सिनेमा बघावा का?
-हो
सिनेमा हसवतो का?
-तुकड्या तुकड्यात
प्रोमोमधे वाटतो तसा चावट आहे का?
- नाही.

एक अॅडल्ट विषय लहानमुलांसहित बघणेबल मांडल्यानं खरंतर कौतुकच करायला पाहिजे. नाहीतर काही वर्षांपूर्वी विद्या बालन आणि इम्रानचा घनचक्करनं हा genre  किळसवाणा करून टाकला होता.
असो. विकेंडचा टाईमपास म्हणून हा सिनेमा चांगला आहे .
आयुषमाननं होमपिचवर धमाल केली आहेच पण विशेष उल्लेख करमच्या मित्राच्या भूमिकेतल्या मनजोत सिंगचा करावा लागेल. प्रेमात पडावं इतकं गोड पात्र आहे हे😃 बाकी नुशरत नमक स्वादानुसार रितीला धरून आहे.

#Cसिनेमाचा
#Dreamgirl

Tuesday, September 10, 2019

घिसीपिटी तरिही गोड नेटफ्लिक्स मुव्ही: fall inn love



  .
Fall inn love ही टेलिफिल्मचा ढाचा समोर ठेवून बेतलेली,  बनवलेली romcom movie आहे. दीर्घकाळ लक्षात राहिल अशी नसली तरिही ती बघत गुंतवून ठेवते, प्रत्येक फ्रेम देखणी, रंगरंगीन असल्यानं ताजेपणा वाटतो. सिनेमा अत्यंत गंभीरपणे फुटपट्ट्यांवर मोजणार्यांनी वाटेला नाही गेलं तरिही चालेल कारण भयंकर predictable, cliche नी गर्दी असलेला सिनेमा काहीही नवीन दाखवत नाही. तरिही बोअरिंग दिवसाला ढकलण्यासाठी नक्कीच चांगला सिनेमा आहे, अर्थात तुम्हाला या प्रकारचा सिनेमा आवडत असेल तर.


नोकरीत कटकट, बाॅयफ्रेंड non-committalएकूणच जिंदगीला वैतागलेली कार्पोरेट कन्या गॅब्रिएला दियाझ (क्रिस्टिना मिलिआन्) नशेत एक  random   quiz जिंकते आणि बक्षिसात तिला चक्क न्युजिलॅण्ड मधलं inn मिळतं. नोकरी आणि बाॅयफ्रेंड दोघांनाही सोडून खुद की तलाश में वगैरे ती सॅनफ्रॅन्सिस्को सोडून न्युजिलॅण्ड गाठते. तिथे गेल्यावर भ्रमाचा भोपळा फुटतो.फोटोतला देखणा inn प्रत्यक्षात पडीक असतो. इथून पुढे जे जे तिच्या बाबतीत घडत जातं ते म्हणजे fall inn love ची गोष्ट.
अपेक्षित वळणं घेत आणि फार मोठे  धक्के न देता सिनेमा संपतो तेंव्हा एक फिलगुड मुव्ही बघितल्याचा अनुभव नक्कीच येतो.
सगळ्या उणिवांकडे दूर्लक्ष करत या सिनेमाचा आनंद घेता येऊ शकतो हेच या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे.

https://youtu.be/P9vXNloQfTM

#Cसिनेमाचा
#NETFLIX
#fallinn

Sunday, September 8, 2019

आर्टिकल 15


#SB
हा बहुचर्चित सिनेमा थिएटरमध्ये बघायचा राहून गेला होता. काल नेटफ्लिक्सवर पाहिला आणि एक अस्वस्थता वाटली. तीच शेअर करतेय.

भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.....आहेत? हा प्रश्न स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षं उलटल्यावरही अनुभव सिन्हाला आपल्या सिनेमातून विचारावा लागतो. जशी या देशाची समाजव्यवस्था जटील गुंतागुंतीची आहे तसंच या प्रश्नाचं उत्तरही साधं सरळ नाही.
याचं कारण , एका भारतात अनेक भारत नांदतात. एक भारत आहे , ज्यात मी आणि माझ्यासारखेच तुम्ही सगळे रहाता. जातपात मानणं (खासगीत आणि सार्वजनिक जीवनातही) गेल्या दोन पिढ्यांत नाहीसं झालंय. जातीचा काॅलम शाळाकाॅलेजात लिहायच्यावेळेस सरफेसवर येतो तेवढंच.
एक भारत आहे, जिथे या जातीच्या भींती अजूनही अभेद्य आहेत. हे एक वेगळंच जग वाटावं अशा पध्दतीचं सामाजिक वातावरण असणारा देश. दुर्दैवानं या देशाचं अस्तित्व नाकारता येत नाहिए. आर्टिकल 15 हा अत्यंत हुशारीनं लिहिलेला आणि सिनेमॅटिकली मांडलेला सिनेमा आहे. वास्तवातल्या घटनांचा (खरेतर) आधार घेत काल्पनिक मांडणी करताना तो सत्य असत्याच्या तुकड्यांची गोधडी उसवून आपल्यासमोर ठेवतो. सिनेमा कोणाचिही बाजू न घेता तटस्थपणे सगळ्या बाजू कथानकाच्या ओघातच समोर ठेवत जातो. आपण दी एण्डला पोहोचेपर्यंत वास्तवाचं भान घेऊन आलेलो असतो.
उत्तर भारतातल्या एका कसब्यात, जिथे जाती व्यवस्था अजूनही कडवी आहे तिथे शहारात जन्मलेला शिकलेला आणि आजच्या तटस्थ, बदललेल्या, पुरोगामी देशाचं, युथचं प्रातिनिधित्व करणारा तरूण पोलिस अधिकारी येतो. आल्या आल्याच तीन दलित मुलींच्या बेपत्ता असण्याची केस त्याच्या हाती येते. हाती येते म्हणण्यापेक्षा दाबलं 'जात' असलेलं प्रकरण तो बळेच हाती घेतो. या केसच्या अनुषंगाने उलगडत जातो एक 'भारत'. अछुत असलेला भारत, सवर्णपणाचा माज असलेला भारत, अछुतांना 'ते' म्हणत साधं रोजचं माणसासारखं जगणंही नाकारणारा भारत, जन्मासोबत जातीची लेबलं घेऊन आलेली माणसं आणि ही लेबलं कसोशिनं सांभाळणारी माणसं असलेला भारत. तुम्ही आणि मी कधीच न पाहिलेला, अनुभवलेला मात्र ऐकलेला भारत...
जातिच्या उतरंडित ब्राह्मण वर नाक असलेले म्हणतानाच आयनच्या प्रत्येकाला जात विचारण्यातून बहुजनांतही अभिमानानं मिरवले जाणारे जरा वरचे जरा खालचे sc, obc जातीचे शिक्के  दिसतात आणि सगळं किती खोकलं आहे हे उघड होतं. ब्राह्मणांना शिव्या घालताना आपल्या खालच्या जातीवर आकस असणारा बहुजनही दिसतो आणि या देशातल्या किळसवाण्या जातीव्यवस्थेचं उघडं वास्तव नागडं होऊन जातं.

स्क्रिनप्लेमधलं प्रत्येक पात्र फार हुशारीनं क्राफ्ट केलेलं आहे. ब्राह्मण लेबल असणारा पण त्यानं फरक न पडणारा आयन (आयुषमान), ब्राह्मणच  पण त्याचा माज असलेला ब्रह्मदत्त  सिंह (मनोज पहावा), खालच्या जातीतला मात्र कष्टानं शिक्षण घेत पोलिस दलात आलेला जाटव (कुमुद मिश्रा), दलितांचा युवा नेता निषाद (मोहम्मद अयुब) आणि त्याला साथ देणारी त्याची धाडसी प्रेयसी आणि बेपत्ता मुलीतल्या एकीची बहिण गौरा (सयानी गुप्ता). या सगळ्या पात्रांच्या अवती भवती फिरत कथा पुढे सरकत जाते.
कथेचा क्लायमॅक्स एका पातळीवर भावनिक समाधान देणारा तर दुसर्या बाजूला अस्वस्थता देणारा करून योग्य नोटवर दीएण्ड येतो.
मला या सिनेमातली आवडलेली हीच गोष्ट आहे. सिनेमा सगळ्या पलिस्थितीवर 'केवळ भाष्य' करतो. काय असलं पाहिजे याचं लफ्फेदार संवादी स्वरूप किंवा तात्विक भाषण टाळतो मात्र त्याच वेळेस छोट्या छोट्या प्रसंगातून काय असायला पाहिजे यावरही 'सूचक भाष्य' ही करतो.

याचं मस्त उदाहरण म्हणजे, आयन टपरीवालीला जात विचारतो आणि त्याचवेळेस मेरा भारत महान लिहिलेला ट्रक धाडधाड आवाज करत जातो ज्यात तिचा आवाज दबतो.
ऐंशीच्या दशकात येता तर समांतर, आर्ट फिल्मचा शिक्का बसून मुख्यप्रवाहातून बाजूला ठेवला असता हा सिनेमा. मात्र गेल्या काही वर्षांत बाॅलिवुड हटके विषय मुख्यप्रवाहात मांडतो आहे आणि त्याला प्रेक्षकांची (मासची) पसंतीही मिळतेय. एकिकडे प्रेक्षक सिनेमा अधिक चांगल्या पध्दतिनं बघायला शिकला आहे आणि दुसर्या बाजूला आजच्या परिस्थितीत अशा विषयावर, अशी मांडणी करणारा सिनेमा बनविण्याचं स्वातंत्र्य सढळपणानं आहे हे खरोखरच चांगलं चिन्ह नव्हे का?
#articale15
#NETFLIX

Saturday, September 7, 2019

बस 'स्टाॅप' म्हणावा असा

कधी कधी डोक्यावर पडल्यासारखा आपण एखादा सिनेमा बघतो आणि फार मनस्ताप होतो. प्राईमवर असे बरेच मराठी सिनेमे आहेत.
बसस्टाॅप हा मल्टीस्टारर त्यापैकीच एक.  (स्पाॅईलर्स असल्याने कृपया ज्यांना हा सिनेमा बघायचा आहे अशांनी ही पोस्ट वाचू नये. खिक्)
सहनशक्तीचा अंत बघणारा स्क्रिनप्ले हे सर्वात मोठं वैशिष्ट्य. एकजात पकाऊ अभिनय हे दुसरं. वयात येण्याच्या किंचीत पुढच्या वयातल्या मुलांशी आईबापांनी कसं लागावं हे बाळबोध पध्दतीनं आणि काळ्या पांढर्या रंगात चितारणारी कथा. बसस्टाॅपचा शून्य संबंध असणार्या या सिनेमाला क्लायमॅक्सला शब्दबंबाळ संवादात बसस्टाॅपर बळंच नेऊन ठेवलंय.

हा आणि असे सिनेमे बघितले की मला त्या लेखकांचंच कौतुक वाटतं. नाही नाही, कथेबद्दल नाही. तर, अशा कथा निर्मात्याच्या गळ्यात कसे उतरवत असतील म्हणून. या लेखकांसोबत नरेशनला जाण्याची फार इच्छा होते.
असो.
बॅक टु बसस्टाॅप.  अमृता खानविलीरचं पात्र , लाॅजिक काशीत नेऊन ठेवतं, ढोमेचं पात्र डोक्याची काशी करतं तर अनिकेत आणि पूजाचं पात्र नेमकं काय करतंय हेच कळत नाही.