Saturday, October 20, 2018

खुसखुशीत संवादांचा बधाई हो

एक छोटुसा प्लाॅट आणि त्यावर बेतलेलं कथानक. बधाई हो हा एक अत्यंत साधा आणि गोड सिनेमा आहे. ट्रेलरमधे दिसतं तेवढंच चित्रपटाचं कथानक आहे पण ते फुलवलंय अगदी सहजतेनं. फार काही मेलोड्रामा नाही पण घटनाक्रम एकातून एक सहज उलगडत कथा पुढे नेतात. तो कुठेही कंटाळवाणा होत नाही. खरंतर एरवी हाॅ फॅक्टर असणारे शब्द अत्यंत सहजतेनं यात ओघात येतात. यातलं शरीरसंबंधाविषयीचं बोलणं उगाचंच बोल्डनेसचा तडका मारण्यासाठी येत नाही तर पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यातून येतं.

दिल्लीतली टिपिकल घरं, भाषा आणि लोकांचे स्वभाव हे इतकं अस्सल आहे की, एखाद्याच्या घरातली खरी गोष्ट बघतोय असं वाटतं.

आयुषमान, नीना, गजराज सगळ्यांचीच कामं अव्वल झाली आहेत. पण खरी धमाल करते ती दादी, सुरेखा सिक्री.
या सिनेमाचा हिरो आहे यातले संवाद. एकामागून एक खटाखट संवाद येत रहातात आणि प्रेक्षकांच्या चेहर्यावरचं स्माईल सतत टिकवून ठेवतात. आयुषमानच्याच शुभमंगलची याबाबतीत आठवण येत रहाते. खुसखुशीत संवादांमुळे गंभीर, बोल्ड विषयही गंमतीदार होऊन जातो.
ज्या जोडप्याचा मुलगा लग्नाला आला आहे असं जोडपं नव्या बाळाची चाहूल लागते आणि बावचळतं. पत्नी बाळाला जन्म देण्याबाबत ठाम आहे मात्र पती जरा गोंधळलेला आहे. केसांत चंदेरी केस चमकायला लागलेल्या या जोडप्याच्या गुडन्यूजनं कुटुंबात आणि परिचितात ज्या प्रतिक्रिया उमटतात त्या स्वाभाविक दाखवल्या आहेत. वास्तवातही जर असं काही घडलं तर जशा असतील अगदी तशाच आहेत. पण त्या ज्या पध्दतीनं साकारल्या आहेत ते बघताना मजा येते. हळूहळू बाळाच्या आईबरोबरच इतर सगळे बाळाला स्विकारतात. पन
 सगळं रामायण झाल्यानंतर दादी शेवटी जो एक तडीपार बाॅल मारते त्यानं बेक्कार हसायला येतं😁😁😁


Saturday, September 15, 2018

अनुरागी मनमर्झियां




मनमर्झियां हम दिल दे चुके सनम या सुपरहिट प्रेमकहाणीचा रिमेकसदृश सिनेमा आहे. ट्रेलरवरूनच ते स्पष्ट होत होतं. मग याचा वेगळेपणा काय? का बघावा लोकानी पुन्हा तोच घिसापिटा त्रिकोण? याचं उत्तर अभिषेकची सोकाॅल्ड नवी इनिंग. यातला अभिषेक वेगळाच आहे, वडिलांच्या स्टारडमशी टक्कर देण्याचा त्याचा काळ आता संपलाय, प्रेक्षकांना त्याच्या हिरोगिरीपेक्षा त्याचा अभिनय, भूमिकेतला वावर जास्त महत्वाचा वाटतोय. त्याच्या या मॅच्युरिटीला साजेशा भूमिका जर त्याला मिळत गेल्या तर ही त्याची एक डिसेंट इनिंग ठरेल यात शंकाच नाही.
हम दिल दे चुके सनम मधे अजय देवगण जवळपास अर्धा सिनेमा झाला की येतो. इथे सुरवातीच्या काही मिनिटातच अभिषेक येतो. खेळायला मिळालेल्या जास्तीच्या ओव्हर्स तो मस्त बॅटिंग करतो.
संजय लिला भन्साळीच्या ट्रेडमार्क पोषाखीपटांची सुरवात होता hddcs मोठाले सेट, महागडे पोषाख, सुंदर सुंदर दिसणारी पात्रं, कथेतल्या इमोशन्सही कवितेसारख्या पडद्यावर येणं.... अनुरागचं सादरीकरण अगदी याच्या विरुध्द. तिकडे भव्य सेटस असतील तर इकडे रिअल लोकाशन्सवर कथा वावरते. अम्रितसरच्या जुनकट गल्ल्या, अरूंद बोळ, रंग उडालेली घरं आणि दाटीवाटीनं गल्ल्यात गच्च उभी घरं हे सगळं कथानक   जमिनीवर ठेवायला मदत करतं.
 मुळात अनुरागचं सादरीकरण राॅ जातकुळीतचं. अलवार, हळूवार हे शब्द त्याच्या शब्दकोषातच नाहीत. प्रेमापासून सुडापर्यंत सगळं डार्क शेडमधेच रंगतं त्याच्या पडद्यावर. मनमर्झियांही त्याला अपवाद नाही. कथेत अनावश्यकच सेक्स हे तर त्याचं खास वैशिष्ट्य, अत्यंत गलिच्छ वाटाव्या अशा शिव्या, सिगरेट, दारू यांचे मिनिटा मिनिटाला येणारे सिन्स ही सगळी कश्यपी स्टाईल आहे.  अनुरागच्या कथांतला गुलाबी रंगही करड्यात भिजून येतो.
hddcs चा सगळा हळवारपणा तासून तो कश्यपी मसाल्यात मॅरिनेट होऊन जे समोर येतं, ते म्हणजे मनमर्झियां.
मुख्य तिनही कलाकार मुळातच ताकदीचे आहेत त्यामुळे सिनेमा पकड ढिली सोडत नाही.  एक पूर्ण वेगळा विकी कौशल यात दिसतो. तापसीनं यापूर्वी इतक्या ताकदीच्या आणि वैविध्यपूर्ण मिका केल्यात की हा सिनेमा तिच्यासाठी बच्चों का खेल आहे. रूमी साकारताना तिला किंचितही मेहनत घ्यावी लागली नाहिए. अभिषेक अत्यंत मॅच्युरिटीनं वावरलाय. कश्यपी मसाल्यात स्वतःला त्यानं अजिबात हरवू दिलं नाहिए म्हणून त्याचं विशेष कौतुक.
सिनेमाचा शेवटही बदलला नाहिए. मात्र शेवटाकडे जातानाचा प्रवास छान आहे. hddcs चा शेवट जितका फिल्मी वाटतो तितकाच याचा शेवट सच्चा आणि क्यूट वाटतो.
देव  डी, तनू वेडस मनू, हम दिल दे चुके सनम या सगळ्याची तुरट, तिखट भेळ म्हणजे हा सिनेमा.
लिड कास्ट किंवा अनुराग यापैकी काहीही आवडत नसणार्यानी याच्या वाटेला न गेलेलंच बरं.

उगाच जाता जाता- 1- दोन जुळ्या, नकट्या, बसक्या चेहर्याच्या कन्या एकसारखे कपडे घालून सतत दिसत रहातात. एक वेगळी ट्रीटमेंट म्हणून हे प्रकरण हाताळलं असलं तरिही नंतर नंतर जरा वातच आणतात त्या.
2-एका सिनमधे पोस्टरवरचं भाजपचं कमळ दिसतं. का कुणास ठाऊक, ते लक्षात येतं आणि रहातं.
3- या सिनेमाची जर एखादी टॅगलाईन असती तर ती,'टेक युवर टाईम' असती.
4 - आपल्या घरायल्या तरूण मुलीला भेटायला एक तरूण गच्च्यांवरून उड्या मारून येतो. दार बंद करून जे करायला हवं ते दिवसातून दोनदा करतो (इतकं नियमान कोणी औषधंही घेत नसेल) आणि हे सगळं कुटुंबिय अगदी निव्वांतपणानं मान्य करतात/पचवतात/मूकसहमती देतात . शिवाय तो मुलगा लग्न करत नाही म्हणल्यावर तितक्याच निव्वांतपणानं दुसरा मुलगा शोधतात. मुलगा शोधल्यावर पुन्हा गच्ची हिरो तयार होतो तर निव्वांतपणानं आधीचं लग्न मोडून या गच्ची लग्नाला तयार होतात. हे लग्न मोडलं की पुन्हा बॅक टू स्क्वेअर वनवरही निव्वांतपणानं जातात.आता  हे लग्न हनिमूननंतर तुटल्यावर आधीच्या गच्ची हिरोशी निव्वांतपणानं नव्यानं लग्नाची बोलणी करतात. मुलीचं सासरहून परत आलेलं सामान वाण्याचं सामान आल्यागत शांतपणे बघतात.

हे सगळं बघून वाटतं की अनुरागही त्याच भारतात रहातो का? जिथे उर्वरित भारत रहातो? असो. सौ बात की एक बात, अभिषेक चाहत्यांसाठी हा सिनेमा थंडी हवा का झोंका है. एक बार देखना बनता है



Sunday, May 6, 2018

निरागस सायकल

प्रकाश कुंटेचा आधीचा फक्त काॅफी आणि... पाहिलाय मी. सायकल आणि काॅफीमधे एक गंमतीशीर साम्य आहे. दोनही सिनेमाची वनलायनर अख्खा सिनेमा डोळ्यासमोर आणण्याइतकी साधी आहे.  कदाचित पहिल्यांदा ऐकल्यावर यावर पूर्ण लांबीचा सिनेमा बनण्याइतका कथेचा जीव आहे? असा प्रश्न पडावा. अशा छानशा वनलायनरला फुलवत प्रकाश कुंटे जे काही समोर ठेवतो ते लाजवाब आहे.
अगदी साधी, फारसे नाट्यमय चढउतार नसलेली ही कथानकं सिनेमॅटिकली सादर करताना पडद्यावरून विचलीत होऊ देत नाहीत.
पहिल्या अगदी पंधरा मिनिटातच कथानक कुठला रस्ता पकडून मुक्काम गाठणार हे चाणाक्ष प्रेक्षकानं ओळखलेलं असतं आणि तरिही तो प्रवास, रस्ता हवाहवासा वाटतो आणि सिनेमा संपताना, मुक्कामावर पोहोचताना एक छान स्माईल चेहर्यावर सोडून जातो.
सायकलचं कथानक न सांगता त्याचं कौतुक करणं खरंच कठीण आहे. पण ते सांगायचा मोह आवरणार आहे आणि यातल्या इतर मला भावलेल्या गोष्टींवर बोलणार आहे.
अभिनय- सिनेमाची भट्टी जमायची असेल तर अचूक कास्टिंग होणं फार गरजेचं. कथेतली पात्रं पडद्यावर ती पात्रं म्हणून प्रेक्षकाना पटली तरच तो सिनेमा भिडतो. नाहीतर अमक्या तमक्या स्टारचा सिनेमा अशी ओळख मिरवत कथानक फाट्यावर मारतो.
ह्रषिकेश  जोशी हा केशवदादा म्हणून अक्षरशः पटतो. भोळा, मनानं मोठा केशवदादा ह्रषिकेशशिवाय दुसरं कोणी करू शकेल असं वाटत नाही.
तुकाराम- प्रियदर्शन जाधव. विनोदातूनच ज्याची ओळख झाली असा सेन्सिबल अभिनेता. त्याचं विनोदाचं टायमिंग जितकं जबरदस्त आहे तितकंच भावनिक प्रसंग तरलपणे साकारणंही फार ताकदीचं आहे. यातला त्याचा भामटा चोर दुष्ट किंवा क्रूर नाही तसाच तो रूढार्थानं विनोदीही नाही. प्रासंगिक विनोद घडतात आणि म्हणून तुकाराम क्वचित विनोदाची किनार असणारं पात्र वाटतं. ही तारेवरची कसरत प्रियदर्शननं ज्या सहजतेनं सांभाळलीय त्याला पैकीच्या पैकी मार्क.
दुसरा चोर आहे भाऊ कदम. खरं सांगायचं तर हवा येऊद्यानं या सगळ्यांवरच विनोदाचा एक शिक्का बसवलाय. त्या विनोदाचे साईडइफेक्टस आहेत हे. आभ पब्लिक या सगळ्यांना पाहिलं की आता गदगदून हसायला लावणारे पंच फुटणार अशाच अपेक्षेनं बघते. मागणी तसा पुरवठा नाही झाला तर प्रवाहाबाहेर जायची धास्ती. बरं चोखंदळ प्रेक्षक याना हवापेक्षा वेगळ्या भूमिकेत बघतो तर त्यालाही धास्ती की अरे बाप रे आता इथेही तसलाच विनोद बघायला मिळतो की काय? पण भाऊनी कंट्रोलमधे रहात विठ्ठल चोर साकारलाय. त्याचा निष्पाप चेहरा  आणि भोळसट वागणं इतकं गोड आहे की त्यातून झालेली विनोद निर्मिती खसखस पिकवते.
एक खूप चांगल्या मनाचा ज्योतिषी आणि त्याची जीव की प्राण असलेली सायकल आणि दुसर्या बाजूला चोरी हे कर्म मानून पार पाडणारे पण दुष्ट नसलेले चोर, जे योगायोगानं नेमकी हीच सायकल चोरतात आणि प्रेक्षक म्हणून आपण कोणा एकाची बाजू घेऊच शकत नाही. खरंतर चोरांचा राग यायला हवा पण तो येत नाही.
इतर पात्रात केशवदादाची बायको झालेली दीप्ती लेले खूप शोभून दिसलीय . सहजपणानं कोकणातली सत्तरच्या दशकातली गृहिणी तिनं साकारलीय.
या दोघांची मुलगी असलेली मैथिली पटवर्धनचा उल्लेख केला नाही तर रिव्ह्यू अपूर्ण राहिल. कसली गोड आहे ही चिमुरडी. आणि कामही अगदी ठसक्यात केलंय. बालकलाकार खूप आत्मविश्वासाने काम करतात तेंव्हा ती अगाऊ वाटतात बरेचदा. पाठ केल्यासारखे संवाद बोलल्यानं निरागसता हरवते. इथे मैथिलीने छान मोठे मोठे ( तिच्या वयाच्या मानाने) संवादही तिच्या पडद्यावरच्या वयाला साजेसे म्हणलेत. दिग्दर्शकाचंही यात कौतुक आहेच.
आता महत्याचं म्हणजे या कथेचा बॅकड्राॅप. कोकणातल्या छोट्याशा खेड्यात हे कथानक सुरू होतं आणि मग छोट्या छोट्या गावातून फिरवतं. शेवटी एका धक्क्याला येऊन संपतं. किंवा धक्क्याला लागतं. झपाट्यानं होणार्या शहरीकरणात आपली गावं हरवत चालली आहेत त्यामुळे ही अशी लोकेशन्स मिळणं दिवसेंदिवस कठीण होत जाणारेय. सायकलमधेही त्या काळाशी विसंगत माॅडर्न गोष्टी हळूच डोकावतात पण त्याकडे दूर्लक्ष करायलाच हवं. कारण बाकी पितळ्याच्या भांड्यापासून शेणानं सारवलेल्या भिंती आणि धुवट कपड्यांपर्यंत सगळं अगदी नॅचरल लूकमधे आहे. कोकणातली साधी भोळी माणसं कथानकाच्या ओघात येत जातात आणि कथेतला निरागसपणा अधोरेखित करतात. लक्षात घ्या ही माणसं निरागस दाखवलीत, बावळट नाहीत आणि म्हणूनच ती पटतात.

आपल्या सगळ्यांच्या मनात असाच निरागसपणा दडलेलला असतो मात्र व्यवहारी जगात वावरताना त्याला अट्टाहासानं मनात कुलूपबंद करावं लागतं. या सिनेमाच्या निमित्तानं ते कुलूप काढून कल्पनेतली का होईना एक सायकलराईड बनती है.