Friday, May 7, 2021

हिंदी गाण्यांवर आकाशवाणीची बंदी

 

हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या काळातच ऑल इंडिया रेडिओवर हिंदी चित्रपट संगीत प्रसारीत करण्यावर बंदी होती. ही बंदी थोडी थोडकी नाही तर तब्बल दहा वर्षं चालली. या बंदीचा फ़ायदा करून घेत रेडिओ सिलोननं एक अनोखा कार्यक्रम श्रोत्यांसाठी आणला ज्यानं रेडिओ जगतात इतिहास रचला.



तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे की जो कालखंड हिंदी चित्रपटांचा, हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ म्हणून नोंदवला गेला आहे त्याच काळात ऑल इंडिया रेडिओवर हिंदी चित्रपट संगीतावर चक्क बंदी घातली होती आणि या बंदीमागचं कारणही तितकंच धक्कादायक होतं. हिंदी चित्रपट संगीतातील गाण्याचे शब्द अश्लिल असतात, पाश्चिमात्य संगीत, वाद्यं या गाण्यात वापरली जातात आणि हे भारतीय अभिजात संगीतासाच्या भविष्यासाठी धोक्याचं असल्याचं कारण या बंदीमागे दिलं गेलं.

त्यावेळचे माहिती आणि प्रसारण मंत्री बी. व्ही. केसकर यांनी हि बंदी घातली होती. मात्र पूर्ण बंदी आधी कोटा पध्दत चालू करण्यात आली. या पध्दतीनुसार कोणती गाणी प्रसारीत करायची याची आधी चाळणी लावलि जायची आणि यातून पार होणारी गाणिच वाजवली जात.  प्रोड्युसर्स गिल्डनं याचा विरोध केला. अखेर केसकरना जे हवं होतं ते आपसूक घडलं कारण वैतागलेल्या निर्मात्यांनी आकाशवाणीला गाणी देणं बंद केलं. अखेर ऑल इंडिया रेडिओवरून हिंदी चित्रपट संगीत गायब झालं.

आकाशवाणीचा मार्ग बंद झालेला असला तरिही दुसरा मार्ग खुला झाला होता. रेडिओ सिलोन हे त्या काळातल्या सिलोन अर्थात श्रीलंकेतलं रेडिओ स्टेशन होतं. सिलोननं ही संधी हेरली आणि हिंदी चित्रपट संगीतासाठी आपली दारं मोकळी केली. आता श्रोते सिलोनवर रमू लागले. याच काळात सिलोननं एक अभिनव कार्यक्रम सादर करण्याचा निर्णय घेतला. हिंदी गाण्यांच्या काऊंटडाऊनचा हा कार्यक्रम मूळ इंग्लिश कार्यक्रमाची हिंदी आवृत्ती होती. अमिन सायानी या स्टार अनाउन्सरचा उदय या कार्यक्रमामुळे झाला. (याच अमिन सायानीनी अमिताभला आकाशवाणीच्या नोकरीच्या इंटरवह्यु मधे रेडिओसाठी आवाज योग्य नाही हे कारण सांगून रिजेक्ट केलं होतं). बिनाका गीतमाला हे त्या कार्यक्रमाचं नाव. सर्व लेटेस्ट चित्रपटातीलग णी लोकप्रियतेच्या क्रमवारीनुसार या कार्यक्रमात वाजवली जात. पुढे अनेक वर्ष हा कार्यक्रम चालला. सर्वात जास्त प्रसारण झालेला असा हा कार्यक्रम आहे. पायदान, बहेनो और भाईयो हे शब्द अमिन सायानींच्या आवाजात आयकॉनिक बनले. हा कार्यक्रम बनविणं मात्र खूप कठीण होतं कारण अगदी प्रामाणिकपणे संशोधन करत हा कार्यक्रम बनविला जात असे. अगदी लेटेस्ट क्रमवारी मिळावी म्हणून खूप आधी कार्यक्रम रेकॉर्ड केला जायचा नाही. याची विश्वासार्हता इतकी होती की एखादं गाणं टॉपला आहे याचाच अर्थ ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहे हे लोकांनाही मान्य असायचं. पहिल्या गाण्यासाथी बिगूल वाजवला जायचा. बिनाला गीतमाला क्रमवारीत पहिल्या तिनात येणं फ़ार प्रतिष्ठेचं मानलं जात होतं. रामायण आणी महाभारताच्या काळात ज्याप्रमाणे रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नसे त्याचप्रमाणे दर बुधवारी रात्री आठ वाजता लोक जिथल्या तिथे थांबत असत कारण त्यांना गीतमालाचा भाग चुकवायचा नसे.

 हा कार्यक्रम अक्षरश: लोकांनी डोक्यावर उचलुन धरला. या कार्यक्रमाच्या ऑडिओ कॅसेटसी निघाल्या. आजही सारेगम कारवावर गीतमालाचे एपिसोड उपलब्ध आहेत. यथावकाश ऑल इंडिया रेडिओनं ही बंदी उठवली आणि हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करायला सुरवात केली तरिही हा कार्यक्रम तितकाच लोकप्रिय राहिला. १९८९ पर्यंत सिलोनवरच हा कार्यक्रम प्रसारीत केला जात असे त्यानंतर मात्र तो आकाशवाणीनं घेतला. बिनाका गीतमालामुळे आकाशवाणीला एखाद्या कार्यक्रमाचं व्यावसायिक मूल्य काय असतं हे लक्षात आलं. उत्पन्नाचा मार्ग जाहिरातींमुळे सोपा होतो हे या कार्यक्रमामुळे कळलं. केसकर यांच्या भूमिकेला विरोध करनारे जसे होते तसेच त्याचं समर्थन करणारेही होते.

या बाबतीतला एक किस्सा असा सांगितला जातो की, १९५१ साली आलेल्या बाजी या चित्रपटात गीता दत्तच्या आवाजातलं तदबीर असे बिगदी हुई हे गाणंही केसकराम्नी नाकारलं होतं. याचं कारण हे गाणं मूळ एक गझल होती आणि सचिनदानी गिटारचा वापर करून त्या गझलला पाश्चिमात्य रूप दिलं होतं. केसकर हे पाश्चिमात्य वाद्यांचे कट्टर विरोध्क मानले जात. त्याऐवजी गाण्यात बासरी, तबला अशी भारतीय वाद्यं वापरावीत असा त्यांचा आग्रह होता. सुरवातीला सिलोनवरून प्रसारीत होणार्‍या हिंदी गाण्यांकडे कोणी फ़ारसं लक्ष दिलं नाही मात्र जसजशी सिलोनची लोकप्रियता भारतात वाढू लागली आणि ती वाढतच चालली तसे डोळे उघडणं भाग होतं आणि केसकरांवर ही बंदी उठवण्यासाठी दबाव येऊ लागला. अखेरीस केकर यांना नमतं घेत ही बंदी उठवावी लागली.


Inmarathi पूर्वप्रकाशित 


#binakageetmala #AIR # aminsayani


शाहरुखच्या घरात माधुरी अनिलचा नाच

 

मन्नत, बस नाम ही काफ़ी है. असा हा मुंबईतला पत्ता. या पत्त्यावर रहातो बॉलिवुडचा बादशहा, शाहरुख. याच मन्नत बंगल्यात अनिल कपूर आणि माधुरी एक दो तीन या लोकप्रिय गाण्यावर थिरकले होते. काय होता नेमका हा किस्सा?-




एन चंद्रानं तेजाब बॉलिवुड प्रेमींच्या बकेट लिस्टमधली गोष्ट असते, मुंबईतल्या मन्नतला भेट देणं. हा मन्नत बंगला आज शाहरूखचा म्हणून ओळखला जात असला तरिही या बंगल्याचिही सुरस कथा आहे. या बंगल्याचा मूळ मालक गुजराती पारसी होता. खानदानी घर असणार्‍या गांधी कुटुंबातल्या किकी गांधीकडे याची मालकी होती आणि याचं नाव होतं,” व्हिला व्हिएन्ना”. अगदी नव्वदीच्या दशकापर्यंत हा बंगला याच नावानं ओळखला जात असे. किकूला अपत्य नसल्यानं त्यानं पुढे हा बंगला त्याची बहिण गुलबानोचा मुलगा नरिमन याच्या नावावर केला. गंमत म्हणजे नरिमनचा मुलगा आयरिश आणि शाहरूखचा मुलगा आर्यन हे खूप चांगले मित्र आहेत. शाहरूख नरिमनचा शेजारी होता. शाहरूखनं पहिल्यांदा हे घर पाहिलं तेंव्हाच त्याला ते खूप आवडलं आणि जर शक्य असेल तर हेच घर विकत घ्यायचं त्यानं ठरवलं. ते घर भाड्यानं देण्याचा निर्णय घेतल्याचं कानावर आल्यावर शाहरूखनं त्याला तो बंगला विकत घेण्याचा प्रस्ताव दिला. १९९५ मधे बरेच प्रयत्न केल्यानंतर शाहरूखनं अखेर नरिमनला हे घर विकण्यासाठी राजी केलं. त्याकाळात शाहरूखनं हा बंगला घेण्यासाठी १५ कोटी रुपये मोजले होते. अजच्या घडीला या बंगल्याची किंमत दोनशे कोटींहून जास्त आहे. या घराला आधी त्यानं जे आहे तेच नाव ठेवलं होतं मात्र इथे रहायला आल्यावर हे घर त्याच्यासाठी फ़ारच लकी ठरलं आणि त्यानम या घराचं नाव बदलून मन्नत ठेवलं. या बंगल्याची बांधणी ही विसाव्या शतकातली असून वर्ल्ड हेरीटेजच्या ग्रेड थ्री मधली आहे. सर्व बाजूंनी मोकळा असा हा बंगला, आकाश, वारा आणि समुद्राचं दर्शन यानी समृध्द आहे.

मात्र मन्नत शाहरूखचा होण्यापूर्वी तो व्हिला व्हिएन्ना होता आणि तो हिंदी चित्रपटांना शुटिंगसाठी भाड्यानं दिला जात असे. अनेक चित्रपटांचं शूटींग या बंगल्यात झालेलं आहे. मात्र १९८८ मधे एका  चित्रपटानं धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचं नाव होतं, तेजाब. एन रामचंद्राचा हा सिनेमा त्या काळचा नंबर वन स्टार अनिल कपूर आणि अनेक चित्रपटात सहय्यक भूमिका करूनही हवं ते यश न मिळालेली माधुरी दीक्षित यांना घेऊन बनवला होता. चित्रपतात माधुरी एक क्लब डान्सर असते त्यामुळे एक डान्स नंबर या चित्रपटात घेतला होता ज्यानं चित्रपट प्रदर्शित झाल्यावर धुमाकूळ घातला होता. या गाण्यानं माधुरीला रातोरात स्टार शर्यतीत आणून बसवलं. हे गाणं होतं, एक दो तीन. हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर याचा गाण्याचं मेल व्हर्जनही चित्रपतात घेण्याचं ठरलं. मग या गाण्यासाठी लोकेशनचा विचार सुरू झाला आणि चित्रपटात व्हिला व्हिएन्ना कथेत आला असल्यानं हेच लोकेशन घेण्याचं ठरलं त्यानुसार एक दो तीन च्या मेल व्हर्जनचं शुटिंग या बंगल्यात पार पडलं.  आज हा व्हिला व्हिएन्ना शाहरूखचा मन्नत पत्ता असल्यानं सामान्यांना केवळ गेटचं दर्शन घेणं शक्य आहे मात्र नव्वदच्या दशकाच्या आधिच्या  चित्रपटांनी आपल्याला पडद्यावर मन्नतचं दर्शन शक्य करून ठेवलं आहे. अर्थात व्हिला व्हिएन्नाला मन्नत बनवायला गौरी खाननं चार वर्षं आणि तेरा कोटी रुपये खर्च केले आहेत  पण मन्नतच्या मूळ रुपाची झलक सिनेमातून का होईना नक्कीच बघता येईल.


Inmarathi पूर्वप्रकाशित 


#madhuridixit #anilkapoor #tezab #mannat







फ़ाळणीनंतर भारतात परतलेल्या भावंडांनी देशाला घाबरवलं

 



 

भारत –पाकिस्तान फ़ाळणी नंतर भारतात आलेलं एक कुटुंब. डोक्यावर कर्जाचा बोजा असलेल्या या कुटुंबातल्या भावंडानी नंतर सिनेमा क्षेत्रात खळबळ माजवून टाकली. ही भावंडं म्हणजेच रामसे बंधू. भारतीय भयपट म्हणलं की पहिलं नाव डोळ्या समोर येतं ते रामसे बंधूंचंच. अशा या भावंडाची ही गोष्ट-

 

स्वातंत्र्यपूर्व काळात रामसे ब्रदर्सचे वडील फ़तेहचंद रामसिंघानी यांचं पाकिस्तानातल्या कराचीमधे वीजसाहित्य विक्रीचं दुकान होतं. कुटुंब कबिला मोठा होता आणि दुकान ठीक चाललं होतं. त्याकाळात ब्रिटिशांचं राज्य होतं आणि रामसिंघानींच्या दुकानात बहुतेक गिर्‍हाईक ब्रिटीश असत. मात्र अडचण ही होती की दुकानावर लावलेल्या पाटीवरचं नाव ब्रिटीशांना नीट वाचता येत नसे. रामसिंघानी इतकं मोठं नाव वाचताना इंग्रजी गिर्‍हाईकांना त्रास व्हायचा. हे लोक फ़तेहचंदांना रामसे सदृष काहीतरी हाक मारायचे. फ़तेहचंदांनी विचार केला की आपल्या ग्राहकांना जे सोयीचं पडत आहे ते नाव धारण करावं जेणेकरुण त्यांना नाव उच्चारताना त्रास होणार नाही. फ़तेहचंदांनी नविन बोर्ड बनवून त्यावरचं रामसिंघानी नाव बदलून रामसे लिहिलं. आता गिर्‍हाईकही खुष झालं. दुकान चांगलं चालायला लागलं होतं मात्र ही परिस्थिती फ़ारकाळ टिकली नाही. १९४७ ला देशाची फ़ाळणी होऊन धर्मावर आधारीत दोन देश बनले. फ़तेहचंद रामसे आपला कुटुंब कबिला घेऊन भारतात मुंबईत आले.

मुंबईत आल्यावरही फ़तेहचंदांनी आपला जुनाच व्यवसाय नव्यानं चालू केला. मुंबईतल्या लॅमिंग्टन रोडवरील अप्सरा सिनेमाच्या समोर त्यांनी वीज साहित्याचं दुकान थाटलं. नविन दुकान, नविन शहर असलं तरिही त्यांनी नाव मात्र रामसेच ठेवलं. ते बदललं नाही. रामसिंघानी आता कायमचेच रामसे झाले होते. त्याकाळातला सुप्रसिध्द मर्फ़ी रेडिओ फ़तेहचंदांच्या दुकानाता प्रामुख्यानं विक्रिला होता. नविन शहर, गिर्‍हाईकांची मानसिकता नवी. धंद्याचा सूर काही ठीक लागत नव्हता. अशातच फ़तेहचंदांचं लक्ष नव्यानंच बहराला येऊ पहात असणार्‍या एका क्षेत्राकडे गेलं. हे क्षेत्र होतं सिनेमा निर्मितीचं. फ़तेहचंदांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरायचं ठरवलं. १९५४ साली आलेला शहीद-ए-आजम भगत सिंह हा निर्माता म्हणून फ़तेहचंदांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट फ़ारसा चालला नाही. यानंतर त्यांनी पृथ्वीराज कपूर आणि सुरैय्या यांना मुख्य भुमिकांत घेऊन रुस्तुम सोहराब (१९६३) बनविला जो सुपरहिट ठरला. फ़तेहचंदांच्या नावावर एक फ़्लॉप एक हिट होता अशातच त्यांनी तिसर्‍या चित्रपटाच्या निर्मितीला सुरवात केली. एक नन्ही मुन्नी सी लडकी हा त्यांचा पुढचा चित्रपट अत्यंत वाईट पध्दतीनं फ़्लॉप झाला. हे अपयश इतकं जोरदार होतं की फ़तेहचंदांनी चित्रपटसृष्टीचा नाद सोडण्याचं आणि चित्रपट निर्मिती न करण्याचं ठरविलं.

त्यांनी हा निर्णय घेतला असला तरिही नियतीनं वेगळाच डाव त्यांच्यासमोर मांडलेला होता लवारच रामसे हे नाव भारतीय भयपटांचं जनक बनणार होतं आणि हे घडायला कारण ठरला फ़्लॉप चित्रपटातला एक सिन.

त्याचं झालं असं की फ़तेहचंदांची मुलं, श्याम आणि तुलसी चित्रपटगृहात चित्रपट झळकला की प्रेक्षकांत बसून तो बघत असत. जेणेकरून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समजाव्यात. एक नन्ही मुन्नी सी लडकी बघायलाही हे दोघे भाऊ चित्रपटगृहात गेले. त्यांना तो सिनेमा बघताना लक्षात आलं की एक विशिष्ट सीन चालू असताना प्रेक्षक कमालिचे उत्कंठीत झाले होते. या सिनमधे एक चोरी घडते ज्यात पृथ्वीराज  कपूर भारी भक्कम पोषाख घालून, मास्क लावून आणि उंच बूट घालून म्युझियममधे चोरी करायला जातात. तुलसी रामसेंनी निरिक्षण केलं की या सिनमधे पृथ्वीराज एखाद्या सैतानासारखे भासत होते आणि पोलिसांनी मारलेल्या गोळ्याही त्यांना काहीही इजा न करता बाजूला पडत होत्या हे बघून प्रेक्षक हैराण झाले होते. पडद्यावर हे सिन बघताना थिएटरमधे टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या. लोकांना काय बघायला आवडतं हे रामसे बंधूंना समजलं होतं.

चित्रपट पाहून परत आल्यावर या दोघांनी वडिलांशी चर्चा केली. आपण हॉरर चित्रपट बनवुया असा प्रस्ताव या दोघांनी वडीलांसमोर ठेवला. फ़तेहचंदांनी झालेलं नुकसान बघता आता निर्मितीतून अंग काढून घायचं हे निश्चित केलं होतं. मात्र मुलांचं मन त्यांना मोडवलं नाही आणि अखेर त्यांनी चित्रपटात पैसा गुंतवायला होकार दिला. वडिलांनी होकार कळवला असला तरिही पुढचं सगळं अवघड होतं कारण चित्रपट नेमका कसा बनवतात हे त्यांना माहित नव्हतं. त्यांनी मग Filve Cs of Cinematography हे पुस्तक खरेदी केलं. त्यानंतर त्यांनी थेट श्रीनगर गाठलं आणि एक हाऊसबोट भाड्यानं घेतली. पुढचे तीन महिने त्यांनी या हाऊसबोटीत स्वत:ला चक्क कोंडून घेत सिनामाचं स्वयंअध्ययन चालू केलं. पुढचे तीन महिने सर्व भावंडांनी मिळून हे पुस्तक अक्षरश: पाठ करत सिनेमा बनविण्याचं तंत्र शिकून घेतलं. मुंबईत परतल्यावर त्यांनी आपल्या पहिल्या हॉरर पटाला सुरवात केली. या चित्रपटाचं नाव होतं, दो गज जमिन के नीचे. चित्रपट बनविण्याचा पैसा वाचवायचा म्हणून रियम लोकेशनवर शूट करण्याचं ठरविलं आणि युनिट महाबळेश्वरला गेलं. चर्चच्या पाद्रींची परवानगी घेत स्मशानात खड्डा उकरण्याचं काम चालू झालं. मात्र झालं असं की नीट पहाणी करून निवडलेल्या जागीही अचानक मृतदेह सापडला आणि जीर्ण सापळा नव्हे तर अलिकडेच मरण पावलेला मानवी देह. यामुळे स्थानिकांत असंतोष पसरला. युनिटला घेरण्यासाठी लोक जमू लागले आणि कसं बसं युनिट सहीसलामत बाहेर पडलं.  कसंबसं शूटींग पूर्ण झालं. चित्रपट प्रदर्शित झाला आणि तुफ़ान चालला. त्यानंतर रामसे बंधूंनी मागे वळून पाहिलंच नाही. विशेष म्हणजे रामसेबंधू निर्मित असं म्हणताना शब्दश: सगळे रामसे बंधू निर्मितीत सहकार्य करत असत. कुमार रामसे स्क्रिप्ट लिहित, गंगू रामसे कॅमेरा सांभाळत, केशू रामसे प्रोडक्शन बघत, किरण साऊंड्चं बघत असत, तुलसी आणि श्याम दिग्दर्शन करत असत. अर्जून एडिटींगचं काम बघत असत.


#ramsebandhu #fogajzaminkeniche


Inmarathi पूर्वप्रकाशित 


त्रिभंग

 

#Tribhang #त्रिभंग 




एक छानशी कादंबरी वाचावी असा अनुभव हा सिनेमा देतो या वाक्यानं सुरवात झालेल्या रिव्ह्यूत चित्रपटपटाचं कौतुकच असणार हे ओघानंच आलं. 

मुळात मी रिव्ह्यू लिहीणार नाहीए. कारण सिनेमा बघितल्यावर बरंच काही विचार करायला लावतो हा सिनेमा. रूटिन रिव्ह्यू पलीकडचं खूप काही लिहावसं वाटतं हा चित्रपट बघून. हे या चित्रपटाचं नव्हे तर कथेचं यश आहे. चित्रपटाचं नव्हे या वाक्याचा अर्थ कथा उत्तम आणि सादरीकरण माती असा अजिबात नाही. मात्र सिनेमा हेही सिनेमॅटिक भाषेतली गोष्ट सांगणंच असतं. गोष्ट हा आत्मा असेल तर या सिनेमाचा आत्मा प्रेमात पडावा असा आहे. 

ही गोष्ट सिनेमा म्हणून पडद्यावर आणताना कसरत होती कारण अनेक जागा होत्या जिथे कथा पटकन सुटून भरकटण्याची पूर्ण शक्यता होती. सिनेमात दिग्दर्शक दिसतो तसा या सिनेमात "लेखक" दिसतो. एका लेखिकेची गोष्ट साकारली जाताना ही गोष्ट जिने लिहिली ती दिसत रहाते. सतत .आणि हे दिसणं खूप छान आहे. (म्हणूनच पोस्टला रेणुका असलेलं पोस्टर आवर्जून निवडलेलं आहे) हा सिनेमा बघताना दुपारच्या वेळेत वाचल्या जाणाऱ्या कादंबरीचा फील येतो. आता हा सिनेमा अनेकांना अजिबात का आवडला नाही याचं कारणही कळायला हरकत नाही. मुळात हा gener जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्हाला हा सिनेमा आवडणारच नाही हे अगदी नक्की. 

दुसरा आक्षेप, काजोलची लाऊड अॅक्टिंग. ती लाऊड आहे का? तर हो. तिचं पात्राशी एकरूप होणं कमी पडलंय का? तर हो. ती कथेत फिट नाही का? याचं उत्तर जरा संदिग्ध आहे. म्हणजे तुम्ही जर तब्बूचे फॅन असाल तर सतत वाटत रहातं यार, ही भूमिका तब्बूसाठीच लिहिली आहे. इतकी ती अनुच्या कॅरेक्टरमधे  दिसते. विशेषतः जो हायपाॅईंट आहे, जिथे अनुला नयनचा पश्चाताप कळतो त्या सिनमधे तर फार फार वाटतं की तब्बूनं हा सिन फार उच्च लेव्हलवर केला असता.  तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय? (विचित्र उदाहरण आहे, त्याबद्दल साॅरी. पण दुसरं चपखल आठवलं नाही) की चपलेला खिळा असतो तो सुरवातीला टोचून हैराण करतो नंतर नंतर त्याची सवय होते आणि काही वाटेनासं होतं. किंवा ड्रेसला जो प्राईस टॅग असतो त्याची ती नायलाॅनची दोरी चुकून रहाते मग मानेवर टोचत रहाते, अनईझी होत रहातं थोडावेळ पण मग दूर्लक्ष करता येतं ते टोचणं. तसं काहिसं झालंय हे अनु चं कास्टिंग. पण पूर्ण फसलेलं अगदी नक्की नाही. काजोलनं पूर्ण प्रयत्नानी पेलवलं आहे. फक्त तिच्यावरची दिग्दर्शकाचीच पकड मधेच ढिली झालेली जाणवते पण तितकंच. मात्र हे सगळं कुठेही रसभंग करत नाही कारण बाकी सगळं कास्टिंग इतकं पर्फेक्ट आहे की क्या केहेने! 

मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ही की, सिनेमाची कथा मराठी कुटुंबात घडते आणि "ओघात" मराठी संवाद येतात. हे ओघात येणं फार छान  जमलंय. इंग्लिश-हिंदी-मराठीची भेळ न होता ते ओघवतं वाटतंय आणि हे लिहिणं अजिबात सोपं नाहिए.

कथानक अजिबातच सांगणार नाही याचं कारण स्पाॅयलर्स नसून काही गोष्टी या सांगण्यापेक्षा अनुभवण्यात जास्त मजा असते. मात्र यातल्या व्यक्तीरेखांविषयी उल्लेख करण्याचा मोह टाळता येत नाही. 

मनस्वी असणं हे कितिही पोएटिक वाटत असलं तरिही त्याची किंमत मनस्वी व्यक्तीशिवाय बरेचण चुकवतात. खासकरून अगदी जवळची माणसं. हे त्या व्यक्तीच्या गावीही नसतं बहुतेकदा. 

आपण आपले निर्णय फार बोल्डपणे घेतले असं मानणारे  त्याचा परिणाम इतरांवर होऊ शकतो हे सोयिस्कर विसरतात. ज्यांचा या मनस्वीपणाशी संबंध नसतो ना या बोल्डनेसशी ती जवळची माणसं मात्र नाहक भरडली जातात.

त्रिभंग हे भरडलं जाणं फार अलवारपणे दाखवतो.


याचा क्लायमॅक्सही खूप हुशार फ्रेम्समधून केला आहे. मला कोणत्याही उणिवांशिवाय हा सिनेमा आवडलाय. 

महत्वाचं, वयवर्षं 17 सोबत बघितला आहे. शिव्या, सिगरेट,  दारू हे काहीही आड येत नाही. (तसंही फक ही अलिकडे शिवी राहिली नाहीए)  बिलिव्ह मी. कारण सिनेमा गोष्टीत गुंतवून ठेवण्याचं काम पर्फेक्ट करतो.


तुम्ही अगदीच पिटातले प्रेक्षक असाल तर नाद सोडा पण चांगली गोष्ट बघायला आवडत असेल तर नक्की बघा. एकदा बघावा असा नक्कीच आहे.


अवांतर- यातले काही अनुभव,  काही नाती कोणी अनुभवली असतील तर हा सिनेमा तुम्हाला नक्कीच बांधून ठेवेल.




साधा, निरागस नमकीन



काही काही सिनेमे कादंबरी वाचल्याचा फिल देतात. असाच छान अनुभव देणारा सिनेमा म्हणजे  १९८२ साली प्रदर्शित झालेला गुलजार दिग्दर्शित "नमकीन". 

चित्रपटात मुख्य भूमिकांत वहिदा रेहमान,  शर्मिला टागोर, शबाना आझमी, किरण वैराळे आणि संजीव कुमार आहेत.

गुलजार यांच्या शायरीमधे नेहमी "भेटणारं" , दूर कहीं टिमटिमाती रोशनी से खामोश पहाडी गांव या गोष्टीत मुख्य सहाय्यक भूमिकेत आहे.

यातली गोष्ट, यातली पात्रं आणि प्रसंग फिल्मी नाहीत. ती वास्तवात असूच शकतात म्हणून ही गोष्ट एक चूटपूट लावत मनात घर करते.

ही गोष्ट जिथे घडते ते एक छोटसं, शांत, निवांत पहाडी गाव आहे. इथले शेळ्या चरायला नेणारे लोक मनानं निरागस आहेत. डोक्यावर ओढणी असणाऱ्यां स्त्रिया असण्याचा  तो काळ.  आजच्यासारखा सहा पदरी हायवेंचा आधुनिक काळ नाही. तेंव्हा डोंगरातून नागमोडी वळणं घेत रस्ते गावं जोडत जात. अशाच एका रस्त्यावरचं हे गाव. रहदारीतला एक ट्रक आणि त्याचा ड्रायव्हर  गेरूलाल (संजीव कुमार). रहायला घर शोधत या गावात येतो. सिनेमाची सुरवातच या शोधातून होते. त्याला घर दाखवणारा धनीराम त्याला म्हणतो,"कौन सा तुम शादी के लिए घर देखने जा रहे हो, चार दीवार खड़ी कर उस पर छत डालो, हो गया मकान तैयार।" त्याच्या अशा सांगण्याला कारण आहे ज्या घरात गेरूलाल रहाणार आहे त्या कुटुंबाची परिस्थिती. या कुटुंबात चार स्त्रियाच रहातात. एका जुनाट जीर्ण घरात ज्योती अम्मा (वहिदा) आणि तिच्या तीन तरूण मुली, निमकी, मिठ्ठू, चिनकी रहातात. कोणे एके काळी ज्योती नर्तकी असते आणि सारंगीवादकासोबत लग्न करून तीन मुली पदरात घेऊन  या पहाडी गावात गरिबीत रहात असते. तीन तीन तरूण मुली असणारी आई जशी असू शकते तशीच ती आहे. सगळा गाव या चार स्त्रियांच्या कुटुंबाला चोच मारायला टपलेला असताना धनीसारखा सज्जन मात्र त्यांच्या पोटपाण्यासाठी एखादा चांगला भाडेकरू शोधत असतो. योगायोगानं गेरूलाल या घरात येतो आणि हळूहळू या कुटुंबात मिसळून जातो.  त्याचं निमकीवर (शर्मिला) प्रेम जडतं मात्र वयानं आणि अनुभवानं वडील असलेली निमकी गेरूलालला मिठ्ठूशी (शबाना) लग्न करायचा सल्ला देते. बहिणीचं आयुष्य मार्गी लागावं आणि तिला आवडणारा मुलगा तिला मिळावा हा उद्देश. मात्र गेरूलाल याला मान्यता देत नाही आणि या कुटुंबाच्या आयुष्यातून, त्या गावातून निघून जातो. पुढे काही वर्षांनंतर एका नाटक मंडळीत त्याला नाचणारी चिनकी भेटते. ती आता वडिलांसोबत नाचून पैसा कमवत असते. तिच्याकडून उरलेल्या तिघींबाबत अर्धंमुर्धं कळल्यानं गेरूलाल पुन्हा एकदा त्या गावी जातो. त्या आणखिनच पडक्या झालेल्या जुनाट घरात आता उरलेली असते एकाकी निमकी. 


काळ बदलला असेल, वरवर बघता बर्‍याच सुधारणाही झालेल्या असतील मात्र आजही तीन तरूण पोरींच्या आईचा जिवाचा घोर तोच आहे. आजही अशा वय वाढलेल्या अविवाहित मुली समाजाला चोचा मारायला आवडतात. 

माझ्या आजीला सात मुली त्यामुळे तिचा तो घोर मला ज्योतीच्या जवळचा वाटतो. पटकथा, संवाद, गीतं आणि दिग्दर्शन गुलजार यांचंच आहे आणि त्याकाळी हा काळाच्या पुढचा सिनेमा होता. यातल्या चारही वुमनिया मनानं कणखर आहेत, विचारानं स्वतंत्र आहेत. स्त्रीमुक्तीचे ढोल न वाजवताही आयुष्यानं दिलेल्या अनुभवातून शिकत आपापल्या मार्गांवरून जाणाऱ्या आहेत.


सहसा पोस्टला पोस्टर लावायचा रिवाज असला तरिही मला गाणं जोडण्याचा मोह आवरता येत नाहिए. याचं कारण यातली गाणी खूप सुंदर आहेत आणि दुसरं म्हणजे पोस्टसोबतचं जे गाणं आहे त्यातला निरागस, अस्सल ग्रामीण मूड मला फार आवडतो. तुम्हालाही नक्की आवडेल.

#namkeen #gulzar #shabana_aazmi #sanjeevkumar #ashabhosle



सिनेमातून गायब झालेल्या गोष्टी


आजची आणि थोडी कालची पिढी अनुराग, लव रंजन अशांचे सिनेमे बघत, नेटफ्लिक्स आणि तत्सम बागांत बागडत मोठी झालेली आहे. पण त्याआधीची पिढी जी लहानपणी बच्चननं गुच्ची हाणताना बॅकग्राऊंडला तोंडानं काढलेला भिफ्श्श्श आवाज ऐकत लहानाची मोठी झाली तिच्या सिनेमातल्या असंख्य गोष्टी आज गायब झालेल्या आहेत.  म्हणजे उदाहरणार्थ, पूर्वीचे नायक नायिका प्रणय करत तर ते किती सूचक पध्दतीनं यायचं. अचानक दोन फुलं एकमेकांच्या जवळ येत. यातही साधारण गुलाब लाडकं फूल. झेंडू, सूर्यफूल, घाणेरी, कोरांटी यांच्या नशिबात रोमान्सचा र ही नव्हता. बिचारी. तर ही फुलं जवळ आली की साधारण चारपाच रिळांनंतर ( मेमरी कार्डवाल्यांनो रिळांची मज्जा तुम्हाला कळायची नाही. सिनेमात सुरवातीलाच जे सेन्साॅर बोर्डाचं प्रमाणपत्र झळकायचं त्यात रीत संख्या वाचणं हे ही एक शास्त्र असे आणि मग सिनेमा किती मोठा यावर गंभीर टिपणीही) तर फुलांनंतर चारपाच रिळं झाली की हिरोईनला अचानक ऑक फिलिंग यायचं. मग तिला घरातली एखादी उलटा पल्लू बेदम झापडायची, कलमुंही , कलंकिनी,  खानदान की इज्जत असे शब्द ऐकताना तेंव्हा फार वाईट वाटायचं. (असूदे हो आज्जी. नका रागवू बिचारीला असं सांगायचो आम्ही पण ऐकायचं नाही कोणी) मग हिरोईन डोक्यावर केसाचा तंबू मिरवत,  हातानं पदराच्या टोकाचा कचाकुचीकै करत, फुटेज खात कश्शीबश्शी हिरोला म्हणे की, मै तुम्हारे बच्चे की... मै तुम्हारे बच्चे की ... (पदराचा बोळा तोंडात कोंबत भावनातिरेकाने) मां बननेवाली हूं ( हिरोची भयानक इमोशनल भावमुद्रा आणि बॅकग्राऊंडला आर्त संगीत). पुढे जी काय गोष्ट असेल तसं व्हायचं पण साधारण आपण (म्हणजे त्या वयातले आम्ही) ज्यांना काका काकू, मावशी मामा म्हणू शकलो असतो त्यांचा हा असा रोमान्स आम्हाला बघावा लागलेला. ती फुलं डुलताना आईवडिलांसोबत बघणंही फार असंस्कारी वाटून जायचं (च्यामारी). आता बघा, सरळच या तो बरबाद करदो या तो आबाद करदो... फुलं बिलं नाहीतच. त्या सगळ्या झेंडू कोरांट्यांचे सात्विक शाप भोवले गुलाबांना, बाकी काय नाही.

दुसरी गायब गोष्ट म्हणजे सिनातला "बाबू". शहरातून गावात आलेला हिरो आणि घागराचोलीतल्या हिरॉईनच्या  प्रेमात त्यानं पडणं. तर हा बाबू शब्द वापरणं आता संपलेलं आहे. मुळात अलिकडे बाबू लोकांनी गावाकडे जाणं सोडलं आहे. चला खेड्याकडे हे मनावर घेणं सोडलं आणि बाबू जमात नाहिशी झाली. हे असे शहरातले बाबू येऊन गावातली भारीपैकी चंचल शोख हसिना पटवत मग गावातले स्थानिक बाबू वैतागतच असणार नं? त्यांनी काय करावं? त्यांचे शाप भोवले असणारेत नक्की. त्या घागरेवाल्या नटखट मावशाही गायबच झाल्या आता.

शिलाई मशिनवरची पांढरी साडी निळे काठ, तिचा काॅलेज मे फर्स्ट  बेटा, तिचा तो कध्धीच फ्रेममधे न दिसलेला गाजर का हलवा हे सगळं गायब झालंय. कधीतरी चेंज म्हणून मां नं तोंडल्याची किंवा शेपूची भाजी करायला काय हरकत होती नं?

हे झाले मसालापट पण जरा वेगळे वगैरे सिनेमे असत त्यातल्या त्या संसारात घुसमट होणाऱ्या स्कर्टबाॅर्डर चायनासिल्क मावशाही गायब झालेल्या आहेत. त्यांचा तो मानेवरचा नीट चोपून बांधलेला बन, ओठांवरची वेलवेट रेड ग्लाॅसी लिपस्टिक, चिक्कार काजळयुक्त  डबडबलेले डोळे आणि एखाद्या वाक्यात सांगितलेली घुसमट पहाताना कासावीस व्हायचं. ती उच्चभ्रू आवडीची घरं, ते अर्धे भरलेले चैतन्यकाढ्याचे ग्लास आणि घरात मौन बाळगून फिरणारे ते दोघे... गेले कुठे?  

गच्च पैशेवाला डॅड्डी आपली कार्टी गरीब हिरोच्या प्रेमात पडली की कोरा चेक हिरोला द्यायचा. तसे दिलदार बापही आता दिसत नाहीत. पार्टीत आपली पार्टी परायी झालेली बघून आर्त गाणी भावी सवत्यासमोर गाणारे बॅगी हिरोही गायब झाले.

याशिवाय मोठाले अर्धगोल जिने ज्यावरून हिरोईन दुडूदुडू धावत येई ती घरं गायब झाली. 

हे सगळं गायब झालेलं पुन्हा एकत्र करून एक सिनेमा बनवायला पाहिजे राव. कल्पना करा, सलमान काॅलेजमधून पास होऊन धावत येतो, सोनाक्षी डोक्यावर केसांचा तंबू घेऊन त्याला बच्चे की मांचा डायलाॅग बोलतेय वगैरे. निरागसता गेली राव सिनेमातली.


#nostelgia #allaboutcinema #memories #oldhindimovies