Thursday, October 23, 2008

रेनकोट


माझ्या आवडत्या चित्रपटातला हा एक. ऐश्वर्या आणि अजय देवगणचा ’रेनकोट’. रीपरीप पावसाचा रुतू. अशाच पावसाळ्यातला एक कंटाळवाणा शेवाळलेला दिवस आणि एकेकाळच्या प्रेयसीच्या घराचा पत्ता शोधत आलेला नायक. त्याला तिचं घर सापडतं तो आत येतो आणि दोघांच्या गप्पा भुतकाळाचा धागा पकडून चालू होतात. ती त्याला सांगते की नवर्यासोबत तिचा संसार सुखानं चाललेला आहे. मोठेपणाच्या गोष्टी सांगत रहाते आणि तो जळतोय का याचा अंदाज घेत असतानाचा त्याची परिस्थिती अजमावत रहाते. एककेकाळी तिच्यावर फ़क्त प्रेम करणारा आणि सुखी संसाराची स्वप्नं बघणारा तो तिला पटवून देतोय की तो देखिल आता "बडा आदमी" बनला आहे. दोघे एकमेकाचा अंदाज घेत असताना प्रेक्षक म्हणून आपणही पडद्यावर घडणार्या प्रसंगांचा अंदाज लावत असतो. कंटाळवाणेपणा जसा सिनेमातल्या दिवसावर पसरलेला आहे तसाच तो नायिकेच्या देहबोलीवर, नायकाच्या बोलण्यात आणि तिथून झिरपत तो आपल्याही पर्यंत आलेला आहे. अगदी कंटाळवाणं असुनही आपण त्या कथेत गुंतत जात रहातो. मोठ्या घरात अवाढव्य फ़र्निचर सांभाळत राहिलेली नायिका तिच्या साध्या रहाण्यामागचं कारण देत रहाते. सततच्या बंद दारांमागचं कारण देत रहाते. नायकाला खटकणार्या गोष्टी आपल्याही पल्ले पडत नाहीत. अशाच वाक्यांतून दोघांची कथा पुढे सरकत असतानाच गतकाळातले काही तुकडे येत रहातात. नायिका त्याला जेवणाचं विचारते तो सांगतो की त्याची सेक्रेतरी जेवणासाठी वाट बघत असेल. ती एक क्षण मत्सरानं कशीनुशी होते आणि पुढच्याक्षणी त्याला हक्कानं जेवायला सांगते. डाएटिशियननं जास्त जेवायला बंदी आणल्यामुळे घरात स्वयंपाक केलेला नाही या सबबीखाली बाहेरून जेवण आणायला जाते आणि पावसापासून वाचण्यासाठी नायकाचा रेनकोट घेऊन जाते. ती बाहेर गेल्यावर नायक सगळ्या खिडक्या उघडतो आणि एक आगंतुक घरात येतो. हा आगंतूक म्हणजे खरं तर नायिकेच्या घराचा मालक असतो आणि थकलेलं भाडं वसूल करण्यासाठी नायिकेच्या घराबाहेर उभा असतो. त्याला टाळण्यासाठी नायिका दारं बंद करून बसत असते. मोठेपणाचा सगळा आव असतो. प्रत्यक्षात खायची मारामार असते. आज नायकानं दार उघडल्यामुळे किमान त्याला घरात प्रवेश तरी मिळालेला असतो. या दोघांच्या संवादातून आधिच्या संवादांचा अर्थ उलगडत जातो.नायक आणि नायिकेच्या कथेमागची कथा समोर येत रहाते. नवर्याच्या श्रीमंतिचा बडेजाव करणारी नायिका जशी भिकेकंगाल असते तसाच नायकही फाटका असतो. धंदापाण्यासाठी मित्रांकडून उधार उसनवारी करायला आलेला नायक मित्रांकडे राहून त्यांच्याकडूनच जमलेले सगळे पैसे नायिकेच्या घराच्या थकलेल्या भाड्यापोटी मालकाला देतो आणि काही महिने तरी तिला घरातून बाहेर न काढण्याची विनंती करतो. नायिका आल्यावर जेवण करून तो निघून जातो. घरी पोहोचल्यावर तिच्या आठवणिनं आणि तिच्यावरच्या परिस्थितीनं व्याकूळ होत रहातो. मित्राची बायको रेनकोट वाळत घालायला जाते त्यावेलेस तिला खिशात काही तरी सापडतं म्हणून ती नायकाला द्यायला येते. तो पहातो तर नायिकेनं त्याच्यासाठी काही पैसे आणि एक चिठ्ठी लिहिलेली असते. रेनकोटच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून त्याच्या परिस्थितीची कल्पना तिला आलेली असते. त्याला काही मदत करावी म्हणून तिनं पैसे गुपचुप त्याच्या खिशात टाकलेले असतात. मात्र पैसे देतानाही ती आपला बडेजाव मिरवायला विसरत नाही. चिठ्ठीत तिनं लिहिलेलं असतं की, घाईघाईत नवरा चेकबुक ठेवून जायचा विसरल्यानं हातातल्या बांगड्या गहाण टाकून पैसे आणले आहेत आणि नवरा आल्यावर आणखी काही मदत ती त्याला करेल. रात्र आणखी गडद शेवाळी होते निराश झालेला दु:खी नायक छताकडे नजर लावून बसलेला असतो तर त्या काळोखात कोणालाही पत्ता न लागू देता नायिका सामान सुमान घेऊन घर बदलत असते.

ऐश्वर्या आणि अजय ही दोनच पात्रं सबंध चित्रपटभर दिसतात. अन्नू कपूर घरमालकाच्या भुमिकेत आगंतूकासारखा हजेरी लावून जातो. या दोघांचा सहज अभिनय आणि रुतु पर्णोचं दिग्दर्शन यामुळे चित्रपट एक खास छाप सोडतो यात शंकाच नाही. यातली प्रत्येक फ़्रेम बोलकी आहे. पार्श्वभुमीवर पावसाची सततची रीपरीप मनावर साठत जाते. चित्रपट संपवताना तो अगदी रीतसर "दी एंड" असा न करता तो सहज विरघळून गेल्यासारखा आणि टॊचणी लावत, विषयाचा चिमटा तसाच घट्ट रूतवून चित्रपट संपतो.

2 comments:

कांचन कराई said...

हा चित्रपट पहायचा राहूनच गेला होता. धन्यवाद!

shinu said...

@ कंचन
ब्लॉगवर स्वागत आणि वेगळं बघायची आवड असेल तर नक्की बघ. :)