Thursday, April 22, 2010

कतरा कतरा जीने दो....


काही गोष्टी या अगदी मेड फ़ॉर इच आदर असतात. सिनेमाच्या बाबतीत बोलायचं तर आरडी आणि गुलझार, खय्याम आणि गझल-आशा, रेखा आणि आशा.....कधी विचार केलायत की उमरावजान मध्ये रेखा नसती तर? सिनेमात जानच आली नसती. उमराव जान म्हणजेच रेखा हे इतकं फ़िट्ट बसलं होतं की नव्या उमरावजानमध्ये ऐश्वर्या (कमालिची सुंदर दिसूनसुध्दा) आपल्याला तरी बुवा फ़ारशी आवडली नाही. रेखाच्या उमरावजामधली तिची ठाव घेणारी नजर, घायाळ कटाक्ष, कमालिची सुंदरता (ऍण्ड व्हॉट अ ग्रेस)....हे सगळं अजरामर झालंय अगदी मोनालिसाच्या चित्रासारखं. तिच्यासारखी तीच.
आजचा विषय उमरावजान नाही तर "इजाजत" आहे. एकीकडे अदावाली उमराव आहे आणि दुसरीकडे इजाजतमधली शालिन, स्वाभिमानी सुधा आहे. रेखा का आवडावी? याचं उत्तर या जबरी रेंजमध्ये आहे. आवडत्या चित्रपटांच्या यादीत आणि झोपेतून उठवून बघ हा सिनेमा असं सांगितलं तरी जो बघायला आवडतो तो इजाजत. गुलझार, आरडी, रेखा, नासिरूद्दीन, आशा भोसले हे इतके इनग्रिडियन्टस असताना आणखी वेगळी मेजवानी काय पाहिजे? प्रत्येक चित्रपटाला एक लय असते. ती दिसत नाही तर जाणवते. इजाजतची लय ही शांत समंजसपणाची आहे. मायाचा वेडेपणा टिपिकल पती पत्नी और वो वाला वाटत नाही आणि सुधावर होणारा अन्यान चैन पडू देत नाही. वास्तवात जर असं घडलं तर काय होईल तेच सिनेमातही होतं. म्हणजे आपल्या पतिच्या आयुष्यातल्या प्रेयसीसाठी आणि दोघांच्यातल्या न संपणार्‍या ओढीसाठी पत्नी फ़ारकत हेऊन वेगळी होते, नवं आयुष्य निवडते. पझलचे तुकडे फ़िट्ट बसतात तरिही "कुछ मिसिंग है बॉस" वाटत रहातं. मला या सिनेमातलं काय आवडतं तर याची कथा मांडण्याची पध्दत. निवांत तब्येतीत कथा साकारत जाते. कुठेही घाई नाही, उरकण्याची वृत्ती नाही. सगळं कसं एका लयीत पण शांतपणानं साकारत जातं. मेलोड्रामा करायला वाव असतानाही तो मोह टाळून एक समंजस कथा गुलझार ज्या पध्द्तिनं मांडतात...मान गये बॉस! एखादी कादंबरी वाचल्याचा फ़ील हा सिनेमा देतो. पान पान उलटवत कथा उलगडत जाते. कथेत गाणी येत नाहीत तर भेटत जातात. पहिल्याच बारिशो कें पासून सिनेमाचा मूड पक्का पकडून ठेवला जातो. मग मेरा कुछ सामान, खाली हाथ शाम आई है, कतरा कतरा जिने दो....सगळा प्रवास कथेचं बोट धरून होतो. संवादाचं काम गाणं साधतं आणि मुड आणखी बनत जातो.
ज्या प्रश्नांची उत्तरं सिनेमाभर आपण कधी मायाच्या नजरेतून कधी सुधाच्या तर कधी महिन्दर (महेंद्र नव्हे)च्या नजरियातून शोधत रहातो त्याचं कोणतंही उत्तर न मिळता एक चुटपुट लावून चित्रपट संपतो.

3 comments:

आनंद पत्रे said...

सुंदर लिहिले आहे...

shinu said...

@ आनंद
धन्यवाद

Indli said...

Your blog is cool. To gain more visitors to your blog submit your posts at hi.indli.com