Saturday, September 14, 2019

ड्रीमगर्ल



आयुषमानच्या सिनेमांचा आता एक सफल ढाचा बनला आहे, बिचारा नायक जो चेहर्यावरून निरागस वाटत असला तरिही काड्या करण्यात माहिर असतो. उत्तर भारतातलं एखादं शहर, रिअल लोकेशन्स आणि स्थानिक फ्लेवर , परिस्थितीत अडकत जाणारा नायक, फाॅर्म्युला हिट,  सिनेमा हिट.
ड्रीमगर्लही याच फाॅरम्युल्यामधे बांधलेला चटपटीत आणि चटोरा सिनेमा आहे.
करम (आयुषमान) लहानपणापासूनच एक अवली कला अंगी बाळगून आहे, तो हुबेहूब बायकांच्या आवाजात बोलू शकतो ( हे आपल्याला पटवून   देण्यात आलंय आणि आयुषमानप्रेमापोटी आपण ते पटवूनही घेतो 😜) त्याच्या या हुनरची चिड येणारा त्याचा बाप जगजीत सिंग (अनू कपूर) मयताचं  सामान विकण्याचा धंदा करत असतो. हिरोला हिरॅईन हवीच म्हणून मग एका सामान डिलिव्हरी दरम्यान त्याला माही (नुशरत) भेटते आणि कथेचा एक अध्याय संपतो.कथेचा दुसरा अध्याय करमच्या बेकारीला संपवून त्याच्या त्या अंगभूत कलेमुळे त्याला सेक्सचॅट करणार्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळण्यानं संपतो. तिसर्या अध्यायात करम पूजा बनून लोकांशी गप्पा मारत तिचा फॅनबेस तयार करताना दिसतो. सिनेमाचा हाच भाग प्रोमो आणि प्रसिध्दीत हायलाईट केलेला असल्यानं लोक पाॅपकाॅर्न घेऊन सरसावून बसतात मात्र प्रत्यक्षात  गरीब गालीबची शायरी,  पायरटेड रफीची गाणी आणि गरीब जस्टिन बिबरच्या बेबीसिटींगमधे पूजा हरवून जाते. इथून पुढे काय होणार आहे हे तुम्हाला कळतं, स्क्रिनप्लेवर होल्ड रहात नाही आणि तो ठेवण्याच्या प्रयत्नात प्रसंग आणखिन आणखिन चटकदार करण्याचे प्रयत्न सुरू होतात आणि समोर जे चाललंय ते ताणलं जात असल्याची भावना  मनात येते (निर्माती बालाजीवाल्या एकताची आहे) सुदैवानं रटाळ होण्याइतपत ताणलं न जाता कथा पुन्हा थोडी पटरी पकडते आणि  निरूपणाकडे प्रवास सुरू होतो. खरंतर सुरवातीपासूनच कोणताही विधीनिषेध न ठेवता, आव न आणता जो प्रवास सुरू असतो तो अचानकच लोकांचा एकाकीपणा, त्यातून अपरिचितांशी बोलण्याची गरज भासणं अशा प्रवचनाकडे सरकतो (जे अगदीच अनावश्यक वाटतं ) क्लायमॅक्सला राधे राधे राधे या सुंदर रासलिलेच्या गाण्याचा आधार दिलेला असतो, घागर्यातला आयुषमान आणि पंजाबी सूटमधली नुशरत मिठी बिठी मारून सिनेमा संपवतात आणि मेलं बाॅलिवुडच्या शास्त्राला अनुसरून एक दारूडं फंजाबी स्वांग ढणढण वाजायला लागतं. खरंतर आपण काही खुर्चीतच बसून रहाणार नसतो पण हे द्दारू, नश्शा, कुड्डी ऐकायला येऊ लागल्यानं जरा भरभर बाहेर जातो इतकंच.

थोडक्यात महत्वाचे-
 सिनेमा बघावा का?
-हो
सिनेमा हसवतो का?
-तुकड्या तुकड्यात
प्रोमोमधे वाटतो तसा चावट आहे का?
- नाही.

एक अॅडल्ट विषय लहानमुलांसहित बघणेबल मांडल्यानं खरंतर कौतुकच करायला पाहिजे. नाहीतर काही वर्षांपूर्वी विद्या बालन आणि इम्रानचा घनचक्करनं हा genre  किळसवाणा करून टाकला होता.
असो. विकेंडचा टाईमपास म्हणून हा सिनेमा चांगला आहे .
आयुषमाननं होमपिचवर धमाल केली आहेच पण विशेष उल्लेख करमच्या मित्राच्या भूमिकेतल्या मनजोत सिंगचा करावा लागेल. प्रेमात पडावं इतकं गोड पात्र आहे हे😃 बाकी नुशरत नमक स्वादानुसार रितीला धरून आहे.

#Cसिनेमाचा
#Dreamgirl

No comments: