Friday, September 12, 2008

हा गलगल्या म्हणजे डोक्याला ताप आहे


केदार शिंदेचा गलगले निघाले पाहिला. म्हणजे एका बेसावध क्षणी डोक्यात दगड पडला आणि तिकिट काढून हा चित्रपट पाहिला. तीन तास गलगल्यानं इतकं पिडलं म्हणून सांगू. हा सिनेमा बघताना एकच विचार सतत मनात येत होता, केदार शिंदे नावाच्या गुणी मुलाला झालंय तरी काय? याच्याक्डे आम्ही किती अपेक्षेनं पहात होतो. यानं अगं बाई अरेच्चा नावाचा चित्रपट बनवून मराठी चित्रपटही बघायचे असतात असा विश्वास दिला, यंदा कर्तवय आहे हा चित्रपट बनवून हा विश्र्वास औट घटकेचा नाही हे दाखवलं आणि माझा नवरा तुझी बायको सारख्या चित्रपटापासून गडी जो उतारावर धावत चाललाय तो थांबायलाच तयार नाही. लंडनचा डबेवाला सहन करावा लागला. आणि आता गलगलेनं तर कळस केला. मुळात सही रे सही वरून एखादं पात्र सही उचलून चित्रपटात आणायचा अट्टाहास का? हेच समजलं नाही. ते ही इतक्या वर्शांनंतर? आता भरतचा गलगल्या इतक्यावेळा या ना त्या रूपात आलाय की त्याच्या त्या बावळट स्टाईलची ओकारी यायला लागलीय. उगाच खपतंय म्हणून किती खपवावं याला काही सीमा? भरतला साथ द्यायला किमान नायिका तरी बरी असावी की नाही?तेही नाही. नायिका म्हणून जरा फिगर बिगर असावी लागते तर इकडे सगळा आनंदी आनंदच आहे. त्यातून ही बाई तिरक्या ओठानं बोलत रहाते. कंबर की कमरा असली फिगर असणारी नायिका आम्ही पैसे खर्च करून का म्हणून पहायची? केदारच्या पहिल्या दोन नायिका छान होत्या. ही तिसरीच कुठून शोधून आणली यानं? मराठीत देखण्या चेहर्यांची कमतरता आता तरी नाही. सिनेमातली फ्रेम फ्रेम, पात्र न पात्र वैताग आहे नुसता. वात आणणारी पात्रं आणि त्यांचे कंटाळवाणे विनोद, संवाद हे पाहून केदारला आता जरा थंड बस बाबा, असं सांगावसं वाटतं. काही कोणी तुझ्यावर जबरदस्ती नाही करत सिनेमे काढ म्हणून. पण उगाच सले सिनेमे काढून वैताग देउ नको, आणि यापुढे भरतला नायक म्हणून अजिबात घेउ नको. या चित्रपटात नायक नायिका जरी दुसरे घेतले असते तरी जरा ताजेपणा आला असता. मात्र भरतलाच पुन्हा गलगले बनवून नाटकातलाच गलगल्या इथे आमच्या माथी मारून तू काय मिळवलंस रे बाबा केदू? काही प्रसंगात तर गलगले चक्क वेडा किंवा मनोरूग्ण वाटला माहितीय? झी सारखा मातब्बर मोहरा हाताशी असताना केदारसारख्या हुश्शार मुलानं इतका टुक्कार सिनेमा बनवावा याचा वैताग जास्त आला. कोणी लाखभर रूपये दिले तरी आई शप्पथ या गलगल्याच्या वाट्याला जाऊ नका. तो चाललाय नां? जाऊ द्या त्याला तसाच पुढे. उगाच अडवू नका. काय संमजले?

No comments: