Sunday, May 21, 2017

हॅपी हार्मोन्स : चिवचिसौका

अडीच तास डोकं घरात ठेवून थिएटरमधे गेला तर तुमच्या फेफड्यांत प्राणवायू ठुसठुसके भरायची खात्री देतो  , चि. व चि. सौ. का. पण अट एकच, ई ऽऽऽ ही माणसं अशी काय? हा प्रश्न मनात येऊ द्यायचा नाही. एक न एक पात्र सगळंच अती करतं  तरिही त्याची माती झालेली नाही हे महत्वाचं.
आम्ही तुम्हाला हसवणारच असं ठरवून बेतून शिवलेली पटकथा आहे आणि ती शिवण पक्की बसवणारे संवादही. प्रत्येक कलाकारानं लई भारी काम केलंय मात्र धमाल केलीय ती नायिकेच्या लहान भावानं (पुष्कर ).  त्याचा अगाऊपणा प्रत्येकवेळेस गदगदून हसवतो. त्याचे काही संवाद तर कहर आहेत. हे लिहितानाही मला त्याची पौगंडावस्था आणि हार्मोन्स आठवून हसायला येतंय 😂😂
संवादांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. खुसखुशीत आणि चटपटीत संवादांमुळे प्रासंगिक विनोद आणखी गुदगुल्या करतात.
ललीत  प्रभाकरच्याबाबतीत मी जरा बायस्ड असल्यानं तो चांगलाच आहे 😉 मृण्मयी खपून गेलीय पण मुळात ती सिनेमाची हिरोईन म्हणून पटतच नाही. (काही कलाकार मालिकेतच छान वाटतात )
एकूण , टाईमपास हवा असेल तर पहायला हरकत नाही मात्र ज्यांना हा लाऊडनेस फारसा रूचत नाही त्यांनी झी वरच्या प्रिमियरची वाट बघा.

* का कोणास ठाऊक सिनेमा बघताना सारखं वाटत होतं की, एका लग्नाची गोष्टची ही पुढची कडी आहे. खरं तर यावर धमाल मालिका बनवता आली असती.

* काल आयपीएल ची फायनल असूनही सिनेमाचे सगळे शो फूल होते. तिकिटं मिळणं मुश्किल झालं होतं

* याचा अर्थ मराठी माणसाला पुणे-मुंबई मॅचमधे काडीचा इंटरेस्ट नव्हता असा घ्यायचा की, सिनेमाची प्रसिध्दी इतकी करेक्ट झाली की त्यानं लोकांना आयपीएलच्या मोहमायेतून थिएटरकडे खेचून आणलं असा घ्यायचा?

* मराठी सिनेमाची तिकिटं बुक करताना " फिलिंग फास्ट" दिसलं आणि थिएटर गच्च भरलेलं पाहिलं की फार फार भारी वाटतं.
#chivchisouka

No comments: