Thursday, April 20, 2017

तापसीचा शबानानाम शबाना. ट्रेलरवरून जसा वाटला होता तसाच आहे. निरजचे सिनेमे सहसा फसत नाहीत आणि शबानाही त्याला अपवाद नाही. बेबीचा प्रिक्वल म्हणून याची जाहिरात झाली असली तरिही हा तसा स्वतंत्र सिनेमा आहे. पात्रं सोडली तर बाकी कोणताच धागा काॅमन नाही. बेबीमधे तापसी मधेच येते आणि काम आटपून जाते. ती होती म्हणून फार ग्रेट काही नव्हतं आणि नसती तरी फार फरक पडला नसता. अगदी तसंच शबानामधे अक्षयचं आहे. तो येतो आणि काम करून निघून जातो. पूर्ण कथानक शबानाभोवती फिरत रहातं आणि तापसीनं शबानाला दोनशे टक्के न्याय दिलेला आहे. सुरवातीपासून शेवटपर्यंत कोरडा चेहरा ठेवून वावरणारी शबाना क्वचित हसली आहे. तिचा टफनेस तापसीनं खूप कन्व्हिन्सिंगली व्यक्त केलाय. हरवलेली नजर, कोरडा चेहरा आणि अॅथलिट बिल्ट यामुळे ती 100% "शबाना" वाटतेच. एकूणंच या सिनेमाचं "दिसणं" खूप वास्तव झालंय. शबाना रहाते तो मुहल्ला, तिथली टिपिकल गर्दी, गजबजलेलं मार्केट हे रियल लोकेशनवरचं आहे. या बॅकड्राॅमुळे सिनेमाला एक चेहरा मिळाला आहे. अगदी शबाना जाते ते ईराणी हाॅटेलही या सगळ्यात खटकन बसतं.
चित्रपटाच्या सुरवातीलाच एक पंटर शबाना धक्का मारतो आणि ती त्याला रितसर धुवून काढते. पुढे हाच पंटर टॅक्सी ड्रायव्हर म्हणून गाठ पडतो आणि सेकंदात शबाना  ओळखते की हा एजन्सीचा माणूस आहे. तो विचारतो कहां जाना है मॅडम ? त्यावर निर्विकारपणानं ती घर ही छोड दो भैय्या म्हणते. हा सिन का कोणास ठाऊक लक्षात रहातो. एका सेकंदासाठीही तापसीनं भूमिकेचं बेअरिंग सोडलेलं नाही. निरजच्या कथेनं तिला तसं करूही दिलेलं नाही.
 दिवसेंदिवस तापसीच्या प्रेमात पडावं अशा भूमिका ती साकारतेय. शबाना तापसीसाठी महत्वाचा टप्पा आहे. ही नाॅनग्लॅमरस भूमिका तिनं सहज साकारली आहे, थोडक्यात शबाना पूर्णपणे तापसीचा सिनेमा आहे आणि तथाकथित सुपरस्टारव्हॅल्यू नसणार्या तापसीनं एकहाती किल्ला लढून जिंकला आहे. कथानकात काही बिळं भोकं आहेत पण निरजच्या कथानकाला एक वेग असतो ज्यामुळे जे पटत नाही तिथे फार रेंगाळायला होत नाही.

तापसी शिवाय जर आणखी कोणी लक्षात रहात असेल तर तो म्हणजे पृथ्वी. अय्यामधे दिसलेला आणि शबानात असलेला पृथ्वी यात जमिन अस्मानाचं अंतर आहे.  बाकी अक्षय, अनुपम, डॅनी आणि मनोज हा यशस्वी फौजफाटा आहेच. मात्र तरिही लक्षात रहाते तापसीच

No comments: