Tuesday, November 26, 2019

सत्तेचा खेळ - वजीर





मराठीमधे राजकीय पार्श्वभूमीवर आधारीत अनेकोत्तम चित्रपटांची निर्मिती झालेली आहे. सध्या महाराष्ट्रात जो सत्तेचा खेळ चालला आहे त्यावरून नव्वदच्या दशकात (1994) आलेल्या, 'वजीर' चित्रपटाची प्रकर्षानं आठवण आली.
सचिनछाप सिनेमांमधे भंकस करणार्या अशोक सराफची यात जबरदस्त भूमिका आहे. पांचकट विनोदात हरवलेला अशोक सराफ यात बघताना फार भारी वाटतं. त्यांच्या अनेक आवडत्या भूमिकांपैकी ही मला आवडणारी भूमिका आहे. लोटपोट हसवणारा हाच का तो अशोक सराफ? हा प्रश्न पडावा इतकी दुसर्या टोकाची करडी भूमिका आहे. खुर्चीसाठी, सत्तेसाठी वाट्टेल त्या थराला जाणार्या मुख्यमंत्र्याची , राजकारण्याची भूमिका बघून त्याचा खराखरा राग येतो आंणि अंगावर काटाही.
विक्रम गोखलेंचा पुरुषोत्तम कांबळे हा सल्लागार राजकारणाचे पदर उलगडतो.
एकूणच निवडणुकांचे राजकारण, सत्ता मिळविण्याचं राजकारण, त्यातली गणितं, या गणितांपायी बदलत जाणारे नातेसंबंध, माणसांचा वापर करून घेणं हे सगळं हा चित्रपट उलगडून समोर ठेवतो. काही वास्तव घटनांचा आधार या कथानकाला असल्याचीही त्यावेळेस  चर्चा होती. उज्ज्वल ठेंगडी लिखित याच नावाच्या नाटकावर आधारीत हा चित्रपट होता.

सध्या चाललेल्या खुर्चीखेळावरही भविष्यात एखादा चित्रपट बनेल आणि आज असलेल्या काही प्रश्नचिन्हांची उकल होईल अशी आशा करायला हरकत नाही.
अशोक सराफ, विक्रम गोखले, कुलदीप पवार, चंद्रकांत गोखले, आशुतोष गोवारीकर, ईला भाटे, अश्विनी भावे यांच्या अभिनयासाठी आणि हो, सांज ये गोकुळी गाण्यासाठीही अद्याप पाहिला नसेल तर जरूर पहा - वजीर
#vazir_marathi_movie

तळ टीप- युट्यूबवर हा चित्रपट उपलब्ध आहे.

https://youtu.be/fdEoK-EXkd0



No comments: