Thursday, July 1, 2021

 


लग्नामधे गाणी गाणारे वडील आणि त्यांची दोन मुलं. पैकी एकानं पाॅपसंगीत क्षेत्रात नाव  कमावलेलं आहे. तो अगदी हार्टथ्रोब वगैरे तर दुसरा तितकसं यश मिळवू न शकलेला आणि स्वतःचा बॅण्ड असलेला. या दोघांत भावंडातलं प्रेम वगैरे नाही असेलच तर कटुताच आहे. पण, वडिलांच्या मृत्यूमुळे अंत्यसंस्कारासाठी दोघांना एकत्र यावं लागतं. वडिलांची अंतीम इच्छा म्हणून एका लग्नात गाण्याच्या कार्यक्रमासाठी वडिलांच्याच जुन्या ऑलमोस्ट खटारा गाडीतून ते प्रवासाला निघतात.

त्या प्रवासाची गोष्ट म्हणजे कार्देशिम बेनीम (माय ब्रदर). 

कारा सेवदा नंतर आलेला बुराक ओझ्तीवितचा सिनेमा.  तुर्कीश आणि मराठीमधे हे साम्य आहे. यांची सिरियल इंडस्ट्री सिनेमापेक्षा जास्त प्रभावी आहे. इकडचे तिकडं म्हणजे सिरियलमधलेच सिनेमातही दिसण्याचं प्रमाण जास्त. बुराकनं कारा सेवदामधे भारी काम केलं होतं म्हणून याच्या सिनेमाची उत्सुकता होती. कार्देशिम बेनीम, 2016 ला प्रदर्शित झालेला हा सिनेमा त्यांच्याकडच्या सिरियलच्या एका एपिसोडचा जीव असलेला छोटा सिनेमा आहे. 

मात्र याची कथा मस्त आहे. रोड जर्नी जाॅनर मधे प्रवासाचं कारण तगडं लागतं ते इथे एका बापाची अंतीम इच्छा हे आहे. या विचित्र बापानं विचित्र पध्दतीनं मुलांसमोर सादर केलेलं मृत्युपत्र आहे. हा भाग मला सगळ्यात जास्त आवडला.

दोघा भावंडांचा प्रवास जसजसा पुढे सरकतो तसं या मृत्यूपत्राचं कारण लक्षात येऊ लागतं. प्रवासाच्या शेवटी जो धक्का आहे तो अनपेक्षित असाच आहे. फक्त

ओढूनताणून प्रेमकथेचा ट्रॅक नसता तरी काही बिघडलं नसतं असं वाटतं. 

यांचे सिनेमेच मुळात छोटेखानी असतात तसाच हाही आहे. लाॅकडाऊन मधे थोडावेळ बरा जावा वाटत असेल आणि अत्युच्च अपेक्षा नसतील तर हा सिनेमा चांगला आहे. माझा स्वतःचा हा अत्यंत लाडका जाॅनर् आहे त्यामुळे मी याप्रकारचे सिनेमे जे समोर येतील ते बघू शकते. इथे तर बुराकचं तगडं कारण होतं.

#loveforturkushmovies

#kardesimbeni.

#burak

No comments: