Friday, May 7, 2021

हिंदी गाण्यांवर आकाशवाणीची बंदी

 

हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या काळातच ऑल इंडिया रेडिओवर हिंदी चित्रपट संगीत प्रसारीत करण्यावर बंदी होती. ही बंदी थोडी थोडकी नाही तर तब्बल दहा वर्षं चालली. या बंदीचा फ़ायदा करून घेत रेडिओ सिलोननं एक अनोखा कार्यक्रम श्रोत्यांसाठी आणला ज्यानं रेडिओ जगतात इतिहास रचला.



तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे की जो कालखंड हिंदी चित्रपटांचा, हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ म्हणून नोंदवला गेला आहे त्याच काळात ऑल इंडिया रेडिओवर हिंदी चित्रपट संगीतावर चक्क बंदी घातली होती आणि या बंदीमागचं कारणही तितकंच धक्कादायक होतं. हिंदी चित्रपट संगीतातील गाण्याचे शब्द अश्लिल असतात, पाश्चिमात्य संगीत, वाद्यं या गाण्यात वापरली जातात आणि हे भारतीय अभिजात संगीतासाच्या भविष्यासाठी धोक्याचं असल्याचं कारण या बंदीमागे दिलं गेलं.

त्यावेळचे माहिती आणि प्रसारण मंत्री बी. व्ही. केसकर यांनी हि बंदी घातली होती. मात्र पूर्ण बंदी आधी कोटा पध्दत चालू करण्यात आली. या पध्दतीनुसार कोणती गाणी प्रसारीत करायची याची आधी चाळणी लावलि जायची आणि यातून पार होणारी गाणिच वाजवली जात.  प्रोड्युसर्स गिल्डनं याचा विरोध केला. अखेर केसकरना जे हवं होतं ते आपसूक घडलं कारण वैतागलेल्या निर्मात्यांनी आकाशवाणीला गाणी देणं बंद केलं. अखेर ऑल इंडिया रेडिओवरून हिंदी चित्रपट संगीत गायब झालं.

आकाशवाणीचा मार्ग बंद झालेला असला तरिही दुसरा मार्ग खुला झाला होता. रेडिओ सिलोन हे त्या काळातल्या सिलोन अर्थात श्रीलंकेतलं रेडिओ स्टेशन होतं. सिलोननं ही संधी हेरली आणि हिंदी चित्रपट संगीतासाठी आपली दारं मोकळी केली. आता श्रोते सिलोनवर रमू लागले. याच काळात सिलोननं एक अभिनव कार्यक्रम सादर करण्याचा निर्णय घेतला. हिंदी गाण्यांच्या काऊंटडाऊनचा हा कार्यक्रम मूळ इंग्लिश कार्यक्रमाची हिंदी आवृत्ती होती. अमिन सायानी या स्टार अनाउन्सरचा उदय या कार्यक्रमामुळे झाला. (याच अमिन सायानीनी अमिताभला आकाशवाणीच्या नोकरीच्या इंटरवह्यु मधे रेडिओसाठी आवाज योग्य नाही हे कारण सांगून रिजेक्ट केलं होतं). बिनाका गीतमाला हे त्या कार्यक्रमाचं नाव. सर्व लेटेस्ट चित्रपटातीलग णी लोकप्रियतेच्या क्रमवारीनुसार या कार्यक्रमात वाजवली जात. पुढे अनेक वर्ष हा कार्यक्रम चालला. सर्वात जास्त प्रसारण झालेला असा हा कार्यक्रम आहे. पायदान, बहेनो और भाईयो हे शब्द अमिन सायानींच्या आवाजात आयकॉनिक बनले. हा कार्यक्रम बनविणं मात्र खूप कठीण होतं कारण अगदी प्रामाणिकपणे संशोधन करत हा कार्यक्रम बनविला जात असे. अगदी लेटेस्ट क्रमवारी मिळावी म्हणून खूप आधी कार्यक्रम रेकॉर्ड केला जायचा नाही. याची विश्वासार्हता इतकी होती की एखादं गाणं टॉपला आहे याचाच अर्थ ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहे हे लोकांनाही मान्य असायचं. पहिल्या गाण्यासाथी बिगूल वाजवला जायचा. बिनाला गीतमाला क्रमवारीत पहिल्या तिनात येणं फ़ार प्रतिष्ठेचं मानलं जात होतं. रामायण आणी महाभारताच्या काळात ज्याप्रमाणे रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नसे त्याचप्रमाणे दर बुधवारी रात्री आठ वाजता लोक जिथल्या तिथे थांबत असत कारण त्यांना गीतमालाचा भाग चुकवायचा नसे.

 हा कार्यक्रम अक्षरश: लोकांनी डोक्यावर उचलुन धरला. या कार्यक्रमाच्या ऑडिओ कॅसेटसी निघाल्या. आजही सारेगम कारवावर गीतमालाचे एपिसोड उपलब्ध आहेत. यथावकाश ऑल इंडिया रेडिओनं ही बंदी उठवली आणि हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करायला सुरवात केली तरिही हा कार्यक्रम तितकाच लोकप्रिय राहिला. १९८९ पर्यंत सिलोनवरच हा कार्यक्रम प्रसारीत केला जात असे त्यानंतर मात्र तो आकाशवाणीनं घेतला. बिनाका गीतमालामुळे आकाशवाणीला एखाद्या कार्यक्रमाचं व्यावसायिक मूल्य काय असतं हे लक्षात आलं. उत्पन्नाचा मार्ग जाहिरातींमुळे सोपा होतो हे या कार्यक्रमामुळे कळलं. केसकर यांच्या भूमिकेला विरोध करनारे जसे होते तसेच त्याचं समर्थन करणारेही होते.

या बाबतीतला एक किस्सा असा सांगितला जातो की, १९५१ साली आलेल्या बाजी या चित्रपटात गीता दत्तच्या आवाजातलं तदबीर असे बिगदी हुई हे गाणंही केसकराम्नी नाकारलं होतं. याचं कारण हे गाणं मूळ एक गझल होती आणि सचिनदानी गिटारचा वापर करून त्या गझलला पाश्चिमात्य रूप दिलं होतं. केसकर हे पाश्चिमात्य वाद्यांचे कट्टर विरोध्क मानले जात. त्याऐवजी गाण्यात बासरी, तबला अशी भारतीय वाद्यं वापरावीत असा त्यांचा आग्रह होता. सुरवातीला सिलोनवरून प्रसारीत होणार्‍या हिंदी गाण्यांकडे कोणी फ़ारसं लक्ष दिलं नाही मात्र जसजशी सिलोनची लोकप्रियता भारतात वाढू लागली आणि ती वाढतच चालली तसे डोळे उघडणं भाग होतं आणि केसकरांवर ही बंदी उठवण्यासाठी दबाव येऊ लागला. अखेरीस केकर यांना नमतं घेत ही बंदी उठवावी लागली.


Inmarathi पूर्वप्रकाशित 


#binakageetmala #AIR # aminsayani


No comments: