Wednesday, March 23, 2022

ओरिजिनल ड्रीमगर्ल- देविका राणी

 

 भारतीय चित्रपट रसिकांसाठी ड्रीम गर्ल म्हणलं की हेमा मालिनी हे समिकरण आज जरी रुळलं असलं तरिही या किताबाची पहिली मानकरी आहे देविका राणी. सौंदर्य आणि अभिनय यांचा अनोखा मिलाप म्हणजे देविका राणी होत्या. आज अनेकांना देविका राणी हे नाव माहितही नाही मात्र एकेकाळी चित्रपट सृष्टीवर राज्य केलेली ही अभिनेत्री त्याकाळातली अत्यंत बोल्ड ॲण्ड ब्युटीफ़ूल अभिनेत्री म्हणून ओळखली जात असे.

देविका राणी यांचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी विशाखापट्टण येथे झाल्या.  गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांची त्या नात होत. देविकाचे वडील कर्नल एम एन चौधरी हे मद्रासचे पहिले सर्जन जनरल होते. लहानपणापासूनच देविका अत्यंत मोकळ्या वातावरणात वाढली. त्यांनी लंडनमधून थिएटरचे शिक्षण घेतले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिला तिच्या अभिनयासाठी कौतुक लाभलं. दहा वर्षांची कारकीर्द असणार्‍या देविकानं अवघ्या पंधरा चित्रपटांत भूमिका साकारल्या मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या चित्रपटात भूमिका साकारुनही हिंदी चित्रपट इतिहासात अजरामर झालेलं नाव म्हणजे, देविका राणी.

देविका राणी यांनी १९३३ साली कर्मा या चित्रपटातून पदार्पण केलं. हा पहिलाच इंग्रजी भाषेतील चित्रपट मानला जातो जो भारतीयानं बनविला होता आणि या आपल्या पहिल्याच चित्रपटात त्यांनी तब्बल चार मिनिटं लांबीचं चुंबन दृष्य दिलं. ज्या काळात स्त्रिया पडदा पध्दतीतून बाहेर आल्या नव्हत्या, पतीचा हातही चारचौघात धरणं जिथे शिष्टाचाराला धरून मानलं जात नव्हतं तिथे देविका राणीनं चुंबदृश्य देऊन खळबळ माजवली. यापूर्वी अशा प्रकारे चुंबनदृश्य चित्रीत केलं नव्हतं. अपवाद मूकपट  सीता देवी आणि चारू रॉय यांच्यावर चित्रीत झालेल्या मूकपटातील चुंबनदृश्य. मात्र या चुंबनाची जितकी चर्चा झाली नाही तितकी चर्चा देविका राणी आणि हिमांशु रॉय यांच्या पडद्यावरील चार मिनिटं लांबीच्या चुंबनमुळे झाली. भारतीय चित्रपट इतिहासातील हे आजवरचे सर्वात दीर्घ चुंबनदृष्य मानले जाते. मात्र वास्तविक पहाता पडद्यावर हा प्रसंग जसा घडतो ते पहाता हे रुढार्थानं चुंबन नव्हते. या चित्रपटातील हिमांशु जे पात्र साकारत होते त्या पात्राला साप चावला असता त्याला शुध्दीवर आणण्यासाठी देविका राणींचं पात्र चुंबनांचा वर्षाव करतं. हे करत असतानाच ओठांचं चुंबनही घेतलं जातं. हे दृश्य त्या काळात पडद्यावर बघून प्रेक्षकांचे श्र्वास थांबले होते. या दृश्यावर टिकाही भरपूर झाली कारण त्या काळात खुलेआम अशा प्रकारचा प्रणय दाखविणं समाजमान्य नव्हतं.

देविका राणींच्या खात्यात आणखिन एका गोष्टीचं श्रेय जातं आणि ते म्हणजे त्यांनी भारतीय चित्रपसृष्ट्रीचा ट्रॅजेडी किंग, दिलिप कुमार अर्थात युसुफ़ खान शोधला आणि या हिर्‍याला कोंदणात बंदिस्त केलं. दिलिप कुमारना चित्रपटात आणण्याचं श्रेय देविका राणींना जातं. युसुफ़ खानचा दिलिप कुमारही देविका राणीनीच केला.

१९२८ साली देविका आणि हिमांशू यांची भेट झाली आणि त्याच वर्षी त्यांचा विवाहही झाला. यानंतर या जोडप्यानं बॉम्बे टॉकिज नावाच्या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करुन अनेक गुणी कलाकारांना प्रेक्षकांसमोर आणलं. बोल्डॲण्ड ब्युटीफ़ूल या उक्तीला जर मानवी चेहरा दिला तर तो देविका राणी असे. आपल्या कारकीर्दीत आणि नंतरही निर्माती म्हणून देविका राणींनी खबळळ उडवून दिली होती.

[लेख पूर्वप्रसिध्दी inmarathi]

#devikarani#dreamgirl#achutkanya#janmbhoomi#blackwhitecinema#saraswatidevi#ashokkumar#oldsongs

  




No comments: