Thursday, January 19, 2017

वेगळे आणि दमदार

सिनेमा म्हणलं की हिरो आला आणि हिरो म्हणलं की , देखणा, ढिशुंम ढिशुम फ़ायटिंग करणारा, बागेत गाणं म्हणणारा, डॉयलॉगबाजी करणारा आणि चिकना चुपडा नरपुंगव अशीच काहिशी व्याख्या बॉलिवुडच्या मसाला पटांनी केलीय. या सगळ्यात न बसणारे वेगळे आणि भारी हिरोही अधून मधून बॉलिवुड मसाल्यात आपलं वेगळेपण दाखवतात. भलेही यांचे सिनेमे कोटिच्या बाता करत नाहीत पण ते जिंदगी के करिब असतात, त्यांचं वागणं, बोलणं, दिसणं सगळंच खूप रिअल असतं आणि म्हणूनच हिरोगिरी न करताही ही मंडळी भाव खाऊन जातात.
हे सगळ असं सांगायला लागलं की सर्वात पहिलं नाव येतं इरफ़ान खान चं. पूर्वी ही जागा मनोज वाजपेयीला मी अनेक वर्षं प्रेमानं देऊ केली होती मात्र पठ्या त्याच त्या चाकोरीतून हलायलाच तयार नाही. त्यामुळे त्याचं स्थान किंचित हललं आणि मग तिथे इरफ़ान आला. इरफ़ान अत्यंत वाईट दिसतो, त्याचे डोळे बाहेर आल्यासारखे आहेत आणि असंच बरंच काही अनेकांना वाटतं तरिही इरफ़ान खानचं हे वेगळं असणंच मला खूप आवडतं. हा शांतपणानं अस्वाद घेत घेत तो स्टोरी पुढे नेतो. उगाच घाई गडबड करत अभिनय तोंडावर फ़ेकत गोष्टीचा हिरो बनणं त्याला अमान्य आहे. त्याचा कोणताही सिनेमा घ्या, त्याला एक मध्यम लय आहे. सगळ्यात मस्त सिनेमा म्हणजे लंच बॉक्स किंवा पिकू...किंवा पिकू आधी आणि मग लंच बॉक्स...किंवा दोन्ही दाटीवाटीनं एकाच स्थानावर. गंमत म्हणजे दोन्ही पात्रं एकदम विरोधी स्वभावाची . त्यांच्या देहबोलीपासून सगळंच वेगळं तरिही पडदाभर व्यापून रहातो इरफ़ान. लंचबॉक्समधला नायक ज्येष्ठ म्हणावा अशा वयोगटातला, एकलकोंडा, अंतर्मुख, जगापासून दूर एकांतात रहाणारा, एकसुरी आयुष्य जगणारा, सीधा साधा. हे पात्र कमालिचं कंटाळवाणं होण्याच्या शक्यता होत्या मात्र एकसुरीपणातल्या ज्या छटा इरफ़ान दाखवतो त्यानं पात्राला बिल्ट अप मिळतो. रूढार्थानं बॉय मिटस अ गर्ल, सिनेमा नाहीच शिवाय अजिबातच मसाला नाही तरिही सिनेमाची गोष्ट खिळवून ठेवते त्याला कारण ही तीन पात्रं. मदारी या अगदी अलिकडच्या सिनेमातही त्यानं लाजवाब काम केलंय.  त्याचं सर्वात महत्वाचं आहे दिसणं. अत्यंत सामान्य दिसतो म्हणूनच तो कन्ह्विसिंगही वाटतो. पिकूमधे म्हणूनच अमिताभ नावाचं गारूड आणि दिपिकाच्या ग्लॅमरमधेही तो मस्त भाव खातो. त्याच्या सिनेमाला कथा असते आणि यात त्यानं सातत्य ठेवलंय. याचमुळे इरफ़ान लाडक्या यादीत वर आलाय.



नवाझुद्दिन सिद्दकी कहानी दोन पर्यंत कोणाला माहितीही नव्हता. या सिनेमात भकाभका सिगरेटी पिणार्‍या पोलिस अधिकार्‍याची भूमिका ही मी पाहिलेली भूमिका.  गॅंग ऒफ़ चा एकही भाग मी पाहिला नसल्यानं यातल्या त्याच्या भूमिकेचं कौतुक फ़क्त मी ऐकून आहे. त्यानंतर तो एकदम पक्का लक्षात बसला ते तलाश मधल्या लंगड्या तैमूरच्या भूमिकेमुळं. या भूमिकेत तो इतका खरा खुरा दिसलाय की वाटतच नाही हा अभिनय करतोय. देहबोलीसहित त्याचं तैमूर असणं निव्वख लाजवाब. खरं तर ही अगदीच साईडची भूमिका पण नवाझुद्दीननं ती अशा उंचीवर ठेवलीय की त्याच्या जागी इतर कोणी अशी कल्पनाही करवत नाही. तीनमधेही त्याची महत्वाची भूमिका होती मात्र स्क्रिनप्लेमधेच विसविशीतपणा आल्यानं त्याची भूमिका पकड घेता घेताच थांबते. तरिही जो काही भाग त्याच्या वाट्याला आला आहे त्यात त्यानं अगदी जान ओतत नवाझुद्दीन छाप सोडला आहे. आत्ताशी त्याची सुरवात झाली आहे आणि अजून बराच मोठा पल्ला तो गाठेल यात शंकाच नको.





मनोज वाजपेयीनं छोट्या पडद्यावरच्या मोठ्या मालिकेत काम करून त्याकाळात प्रचंड ग्लॅमर कमावलं, कौतुक कमावलं. याचं कारण कदाचित ती भट कॅम्पची मालिका होती हे ही असावं. त्यावेळेस छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर आलेल्यापैंकी एक शाहरूख आणि दुसरा मनोज हे दोघेच दमदार यश मिळवू शकले. पहिलाच सिनेमा रामगोपाल वर्माचा आणि चित्रपटाची नायिका त्या काळातली टॉपची, उर्मिला. मनोजचा भिकू म्हात्रे. खरं तर मनोज त्या अर्थानं या कथानकाचा नायक नव्हताच पण त्याच्या भिकूनं सत्याला कायच्या काय बनवून टाकला. मुख्य हिरो त्या सिनेमातही झाकोळला गेला आणि नंतरही फ़ारसा आलाच नाही. मनोजच्या करियरची गाडी मात्र निकल पडी. ओमशिव पुरीनंतर मनोज मला त्या गटातला वाटातो. सर्वच प्रकारच्या भूमिका तितक्याच गांभिर्यानं करत छाप पाडणारा. स्पेशन छब्बीसमधे कलाकारांची फ़ौज असतानाही मध्यतरांच्या आसपास आलेल्या त्याच्या भूमिकेत म्हणूनच तो लक्षात रहातो.



या तिकडीनंतरचं नाव आहे, जिमी शेरगील. एकदम चिकना चुपडा आणि चॉकलेट हिरो मटेरियल. आला गुलझारच्या माचिसमधून आणि मग रूळला यश चोप्रांच्या सिनेमामधून, पण तिथे त्याला सूर सापडलाच नाही. ऑफ़बीट सिनेमांमधून आजूबाजूच्या भूमिकांमधे मात्र हा भाव खाऊन जातो. तन्नू वेडस मन्नू मधल्या दोनही भागात हा एकटाच आहे ज्यानं त्याच्या भूमिकेचं बेअरींग जराही सोडलेलं नाही. कंगना पहिल्या भागात जितकी नैसर्गिक वाटलीय तितकीच दुसर्‍या भागात "मैं हिरोईन हूं" अविर्भाव बाळगणारी. माधवन पहिल्या भागात जितका नैसर्गिक बावळट वाटलाय तितकाच दुसर्‍या भागात ओढून ताणून बावळट. पण जिम्मी पहिल्या भागात जसा आहे तसाच दुसर्‍या भागात वाटातो खर सांगायचं तर दुसर्‍या भागातून त्याचं पात्र काढलं असतं तर सिनामीतली जान गेली असती इतका भक्कम आधार त्याच्या भूमिकेचा आहे. स्पेशन छब्बीस, वेन्स्डे, यकिन, मदारी अशा एकाहून एक सिनेमांमधून छोट्या मोठ्या भूमिका त्यानं केलेल्या असल्या तरिही त्याची प्रत्येक भूमिका लक्शात रहाते. खरं तर जीमी याहून जास्त मोठं यश डिझर्व्ह करतो. पूर्ण लांबीची नायिकाची भूमिका डिझर्व्ह करतो पण आपल्या इंडस्ट्रीत शिक्के मारायची फ़ार घाई असते आणि जिमी हाही शिक्क्याला बळी पडलेला गुणी अभिनेता आहे. त्याचा मुहब्बते किंवा मेरे यार की शादी है ते तनू वेडस मनू हा प्रवास थक्क करणारा आहे. सुरवातीच्या काळात साबणासारखा मख्ख चेहरा असणारा हा कधी आयुष्यात अभिनयही करेल यावर विश्र्वास बसणं कठीण होतं.



ही यादी खरं तर इथेच संपत नाही. असे अनेक चेहरे आहेत इंडस्ट्रीत जे रूढार्थानं हिरो मटेरियल नाहीत पण त्यांचं असणं खूप महत्वाचं आहे. कारण मसाला मारके फ़िल्ममधे झटका आणण्याचं काम ही मंडळी करतात.

No comments: