Monday, January 16, 2017सुईंया सुईंया....


काही काही सिनेमा का आवडतात? याचं काही लॉजिक नसतं. पडेल कॅटेगरीत जमा झालेले हे सिनेमे कधी कधी सिरियस मनोरंजन करतात. हे सिनेमे पाहिले की असं वाटतं अरेच्चा का बरं आपण आधी हा सिनेमा पाहिला नाही? बरेचदा सिनेमाची पब्लिसिटी नीट झालेली नसते, कधी प्रस्थापित कलाकार नसतात तर कधी मोठ्या चित्रपटांच्या हवेत हे विरून जातात बिचारे.


परवा काय झालं की मॉर्निंग वॉकला जाताना रेडिओवर एक कायच्या काय शब्द असलेलं मात्र कमालिची गोड चाल असलेलं गाणं लागलं. दिल मर्द जात है बदमाश बात है...तन में सुईंया सुईंया...अस काहीतरी. चेहर्‍यावर हसू आलं आणि नंतर विसरायलाही झालं. पुन्हा एक दोन दिवसांनी हेच गाणं लागलं मग मात्र लक्श देऊन ऐकलं आणि गंमतच वाटली. मागून उत्सुकताही की हे गाणं आहे कोणत्या सिनेमातलं? एरवी त्याच त्या गाण्याचा अहोरात्र रतीब घालणार्‍या एफ़एमनं हे जरा वेगळं गाणं लावलं म्हणून बरंही वाटलं. पण हे गाणं कोणत्या सिनेमातलं? हा किडा काही स्वस्थ बसू देईना. बरं घरी आल्यावर शब्द विसरायला होत होते, फ़क्त सुईंया सुईंया काहीतरी आहे इतकंच लक्षात राहिलं होतं. मग काय गुगलबाबाला शरण गेले. सुईंया सुईंया चा सर्च टाकला तर भलतंच जपानी काहीतरी दाखवायला लागला. दोन तीन दिवस फ़ारच त्रास दिला या गाण्यानं, आणि एरवी एक दिवसाआड लागणारं अचानकच बंद झालं पुढे चार पाच दिवस लागलंच नाही आणि अखेर एक दिवस त्याच्या नेहमीच्या वेळेत लागलं. ताबडतोब वॉक थांबवून गुगलच्या बॉक्समधे शब्द टाईप करून सर्च केलं आणि इतकं बरं वाटलं .... कारण यावेळेस बरोबर काम झालं होतं. या सुईंया सुईंयाची सगळी कुंडली समोर आली होती. गुड्डू रंगीला या भन्नाट नावाच्या सिनेमातलं हे गाणं आहे. पोस्टरवर अर्शदवारसी दिसला आणि मेमरी कार्डमधे खळबळ झाली. मग आठवलं की मागच्या वर्षी असा एक पडेल सिनेमा आला होता. त्यातलं माता का ईमेल आया है हे गाणं सारखं प्रोमोमधे लागत होतं. ते गाणं बघताना अगं आई गं कसले कसले सिनेमे बनतात आणि कसली कसली गाणी असतात असं म्हणत थेट रिजेक्शन स्टॅम्प मारला होता. आज त्याच रिजेक्टेड फ़ाईलला उत्सुकतेनं उघडून बघितल्यावर फ़ारच पडेल नसावं असं वाटलं. मग हा सिनेमा बघितला पाहिजे असं वाटायला लागलं. युट्युबला शरण जाऊनही उपयोग झाला नाही कारण नळीवर हा सिनेमाच नाही. पुन्हा एकदोन दिवस वैतागात गेले. एकूण हा सिनेमा डोक्याला ताप झाला होता. आधी गाणं मग सिनेमा मिळेना. आता ठरवलंच की बेट्या माझ्यापेक्षा जास्त हुशार आहेस काय? फ़ारफ़ार सर्च करून कष्टानं लिंक मिळवली आणि हॉटस्टारवर अख्खा सिनेमा सापडला. 
वाटलं होतं तितका पडेल अर्नथातच नव्हता. म्हणजे दबंग सारखा सिनेमा जर मनोरंजक असेल तर गुड्डू त्याहून दहापट जास्त मनोरंजन नक्कीच करतो आणि राम रतन धन पायोच्या तुलनेत तर सुपरहिट मनोरंजन करतो (उप्स...नेमकी दोन्ही उदाहरणं भाईच्याच सिनेमांची झाली की पण ठीकच आहे म्हणा. शंभरकोटीच्या पायंड्याचं पेटंटही त्याच्याच खिशात आहेच की).
प्रामाणिकपणानं सांगायचं तर सिनेमा नव्वद टक्के जमलाय आणि दहा टक्के गडबडलाय आणि तो इतका गडबडलाय की फ़्लॉपचा शिक्काच बसला. तरिही नव्वद टक्के चांगला असणं हे चांगलंच नाही का?
याचं कथानक फ़िरतं गुड्डू आणि रंगिला या दोन भावांभोवती. माता का जगराता करणं हा मुख्य धंदा आणि या जगरात्याच्या निमित्तानं श्रीमंत घरांची रेकी करून दरोडेखोरांना माहिती देणं हा जोडधंदा ही दोघं करतात. एक कोर्टकेस चालली आहे आणि त्यासाठी दोघे कष्टानं पै पै जोडत आहेत. याचवेळेस एक पंटर यांना किडनॅपिंगची सुपारी देतो. काम सोपं असतं आणि पैसे भरपूर म्हणून गरजेपोटी दोघं तयार होतात. जिला किडनॅप करायचं ती मुकी बहिरी असते. दोघं मोहिम फ़त्ते करतात आणि मुलिला घेऊन थेट शिमला गाठतात. इथे आल्यावर सुरू होता एकाहूनएक जबरदस्त ट्वीस्ट. या मुलिला किडनॅप करून हे दोघे एका सापळ्यात अडकत जातात, त्यातून ते कसे बाहेर पडतात याची गोष्ट म्हणजे गुड्डू रंगीला.
मुख्य भूमिका आहेत अर्शद वारसी, अमित सध, आदिती राव हैदरी आणि रोनित रॉय यांच्या.

चित्रपटाचं रंग रूप रॉ आहे. म्हणजे यात एक रांगडेपणा आहे. नाव अतरंगी आहेच पण सिनेमाही तितकंच अतरंगी मनोरंजन करतो विश्र्वास ठेवा.

ते सुईंया सुईंया बघायचंय? 
इथे बघा   -    https://www.youtube.com/watch?v=6XHsuANpOGUNo comments: