Monday, January 23, 2017

अनुभव
कसं असतं नां की, श्रवणीय गाणं जमायला सूर लागावा लागतो, उत्तम पदार्थ बनण्यासाठी सगळे घटकपदार्थ अचूक पडावे लागतात आणि एक छान सिनेमा बनायला अभिनयापासून कथेपर्यंत सगळी भट्टी जमून यावी लागते. असाच मस्त जमलेला चित्रपट आहे बासुदांचा "अनुभव". बासुदांच्या तीन चित्रपटांच्या सेरीजमधला हा माझा सर्वात आवडता चित्रपट आहे. तो काळच सिनेमांचा सर्वोत्तम काळ होता. व्यावसायिक चित्रपटांच्या बरोबरीनं समांतर सिनेमे निघत होते.  कथा, अभिनय या निकषांवर अस्सल असणारे अनेक सिनेमे या काळात आले. यापैकीच बासुदांचे सिनेमे. मुख्यत: पती पत्नी संबंधांवर बेतलेले.  अनुभवही याच जातकुळीचा सिनेमा, लग्नानंतर काही वर्षांनी स्थिरावलेलं पती पत्नीचं नातं आणि त्यात काही कारणानं काही काळ उठणारे तरंग असा कथाविषय असाणारा हा चित्रपट. ब्लॅक- व्हाईट असुनही कमालिचा सुंदर किंबहुना ब्लॅक व्हाईटमुळेच जास्त सुंदर दिसणारा.
             हा चित्रपट बघताना आतून एक बेचैन बुलबुला सतत अस्वस्थपणे हलत असतो, याचं कारण, याची प्रत्येक फ्रेम चित्रपटाच्या कथेशी इमान राखून समोर येते. चित्रपट बघताना नक्की कसं वाटतं माहित आहे? भर दुपारी तुम्ही कधी एखाद्या निरव ठिकाणच्या डोहावर गेलाय? आजुबाजुला चिटपाखरू नसताना, कसलाही आवाज, हालचल नसताता तो गडद हिरवा खोल डोह कसा कंटाळवाणा चुपचाप पसरलेला असतो? आपल्याला ते पाहून खडा टाकून या चित्रात जरा जीवंतपणा आणावासा वाटतो......तसं काहिसं हा चित्रपट पहाताना जाणवत रहातं. लग्नानंतर काही वर्षांनी पतीपत्नीचं काहिसं एकसुरी होणारं नातं इतकं परफेक्ट समोर येतं की आपण या दोघांत तिसरे होउन फिरत रहातो. त्यांच्या त्या संथ डोहासारख्या आयुष्याचे साक्षिदार बनत जातो आणि मग अशाच एक वळणावर  गीता दत्तचं  मेरी जान मुझे जान न कहो गाणं चित्रपटात इतकं सहजपणानं येउन जातं की आपल्या  लक्षातही  येत नाही, कथेत हळूवार गाणं कसं गुंफ़ावं याचं हे गाणं म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.  आपण गाणं पाहिलं असं न वाटता अलगद ते कथे च्या ओघात येऊन जातं.  घरकाम करताना एखादी गृहिणी जसं गुणगुणत एका लयीत  काम आवरत असते तसं हे गाणं येतं आणि जातं.
                     हे गाणं  दोन येतं, पहिल्यांदा चित्रपटची नायिका - तनुजा , अंघोळ करताना सहज गुणगुणत असते आणि दुसर्‍यांदा नायक नायिका - संजीव कुमार आणि तनुजा खुप दिवसांनंतरचा जुना निवांतपणा अनुभवत असतात तेंव्हा. यातला दुसरा भाग जास्त तरल झाला आहे. अलिकडे एकमेकांसाठी रिकामा वेळच मिळत नाही अशी सल असणारं, तरूणपणाकडून प्रौढपणाकडे चाललेलं एक तरूण जोडपं, कार्यमग्न पती आणि कलाकार, रसिक पण रिकामपणानं घर सांभाळणारी ग्रुहिणी. सगळ निरस कंटाळवाणं चाललेलं आहे, एकमेकाविरूध्द तक्रार करण्याचंही आता रूटिन बनलं आहे, जे चाललंय त्यात आता काही बदल होणार नाही हे सत्य स्वीकारून एकमेकासोबत रहाणारे पती पत्नी आणि एक दिवस अचानकच तो चुकार निवांत दिवस या जोडप्याच्या आयुष्यात येतो.  ऊन्हाची तलखी पावसाच्या एका सरसरून आलेल्या सरीमुळं कशी धुवून जाते तसं होतं. सगळे शिकवे गिले दूर होतात, अगदी निवांत चाललेल्या या दिवसाची दुपार डोक्यावर येते आणि अचानक पाऊस बरसायला लागतो, बस्स! आणखी काय पाहिजे? बाहेर कोसळणार्या सरी, आणि खिडकीच्या तावदाना पलिकडून डोकावणारा निशिगंध, पाण्याचे टपोरे थोंब माळलेली निशिगंधाची ताजी फुलं आणि हे जोडपं.  केवळ केवळ आणि केवळ इतक्या भांडवलावर हे कमालिचं रोमॅंटिक गाणं येतं. तनुजाचे टाईट क्लोजअप फ्रेममधून आपली नजर हलूच देत नाहीत. गोड दिसणारी तनुजा या गाण्यात,"दो जुडवा होठों की बात कहो आंखो से...मेरी जान" असं म्हणताना आणखिनच खट्याळ गोड दिसलीय. गीता दत्तचा लडिवाळ आवाज, तनुजाचा तितकाच लाडिक अभिनय आणि संजीवकुमारचं कमालिचं रोमॅंटिक दिसणं या सगळ्यानं हे गाणं अजरामर झालंय. बॉलिवुडवाल्यांना रोमान्स करताना पाऊस अगदी हटकून लागतोच मात्र बरेचदा हा पाऊस अगदी ओढून ताणून आणल्यासारखा येतो. या गाण्यात मात्र तो अगदी सहज अलगद बरसलाय. बॉलीवुडच्या पावसातल्या रोमॅंटिक गाण्यात या गाण्याचा म्हणूनच अगदी वरचा नंबर लागतो.


No comments: