Friday, May 7, 2021

सिनेमातून गायब झालेल्या गोष्टी


आजची आणि थोडी कालची पिढी अनुराग, लव रंजन अशांचे सिनेमे बघत, नेटफ्लिक्स आणि तत्सम बागांत बागडत मोठी झालेली आहे. पण त्याआधीची पिढी जी लहानपणी बच्चननं गुच्ची हाणताना बॅकग्राऊंडला तोंडानं काढलेला भिफ्श्श्श आवाज ऐकत लहानाची मोठी झाली तिच्या सिनेमातल्या असंख्य गोष्टी आज गायब झालेल्या आहेत.  म्हणजे उदाहरणार्थ, पूर्वीचे नायक नायिका प्रणय करत तर ते किती सूचक पध्दतीनं यायचं. अचानक दोन फुलं एकमेकांच्या जवळ येत. यातही साधारण गुलाब लाडकं फूल. झेंडू, सूर्यफूल, घाणेरी, कोरांटी यांच्या नशिबात रोमान्सचा र ही नव्हता. बिचारी. तर ही फुलं जवळ आली की साधारण चारपाच रिळांनंतर ( मेमरी कार्डवाल्यांनो रिळांची मज्जा तुम्हाला कळायची नाही. सिनेमात सुरवातीलाच जे सेन्साॅर बोर्डाचं प्रमाणपत्र झळकायचं त्यात रीत संख्या वाचणं हे ही एक शास्त्र असे आणि मग सिनेमा किती मोठा यावर गंभीर टिपणीही) तर फुलांनंतर चारपाच रिळं झाली की हिरोईनला अचानक ऑक फिलिंग यायचं. मग तिला घरातली एखादी उलटा पल्लू बेदम झापडायची, कलमुंही , कलंकिनी,  खानदान की इज्जत असे शब्द ऐकताना तेंव्हा फार वाईट वाटायचं. (असूदे हो आज्जी. नका रागवू बिचारीला असं सांगायचो आम्ही पण ऐकायचं नाही कोणी) मग हिरोईन डोक्यावर केसाचा तंबू मिरवत,  हातानं पदराच्या टोकाचा कचाकुचीकै करत, फुटेज खात कश्शीबश्शी हिरोला म्हणे की, मै तुम्हारे बच्चे की... मै तुम्हारे बच्चे की ... (पदराचा बोळा तोंडात कोंबत भावनातिरेकाने) मां बननेवाली हूं ( हिरोची भयानक इमोशनल भावमुद्रा आणि बॅकग्राऊंडला आर्त संगीत). पुढे जी काय गोष्ट असेल तसं व्हायचं पण साधारण आपण (म्हणजे त्या वयातले आम्ही) ज्यांना काका काकू, मावशी मामा म्हणू शकलो असतो त्यांचा हा असा रोमान्स आम्हाला बघावा लागलेला. ती फुलं डुलताना आईवडिलांसोबत बघणंही फार असंस्कारी वाटून जायचं (च्यामारी). आता बघा, सरळच या तो बरबाद करदो या तो आबाद करदो... फुलं बिलं नाहीतच. त्या सगळ्या झेंडू कोरांट्यांचे सात्विक शाप भोवले गुलाबांना, बाकी काय नाही.

दुसरी गायब गोष्ट म्हणजे सिनातला "बाबू". शहरातून गावात आलेला हिरो आणि घागराचोलीतल्या हिरॉईनच्या  प्रेमात त्यानं पडणं. तर हा बाबू शब्द वापरणं आता संपलेलं आहे. मुळात अलिकडे बाबू लोकांनी गावाकडे जाणं सोडलं आहे. चला खेड्याकडे हे मनावर घेणं सोडलं आणि बाबू जमात नाहिशी झाली. हे असे शहरातले बाबू येऊन गावातली भारीपैकी चंचल शोख हसिना पटवत मग गावातले स्थानिक बाबू वैतागतच असणार नं? त्यांनी काय करावं? त्यांचे शाप भोवले असणारेत नक्की. त्या घागरेवाल्या नटखट मावशाही गायबच झाल्या आता.

शिलाई मशिनवरची पांढरी साडी निळे काठ, तिचा काॅलेज मे फर्स्ट  बेटा, तिचा तो कध्धीच फ्रेममधे न दिसलेला गाजर का हलवा हे सगळं गायब झालंय. कधीतरी चेंज म्हणून मां नं तोंडल्याची किंवा शेपूची भाजी करायला काय हरकत होती नं?

हे झाले मसालापट पण जरा वेगळे वगैरे सिनेमे असत त्यातल्या त्या संसारात घुसमट होणाऱ्या स्कर्टबाॅर्डर चायनासिल्क मावशाही गायब झालेल्या आहेत. त्यांचा तो मानेवरचा नीट चोपून बांधलेला बन, ओठांवरची वेलवेट रेड ग्लाॅसी लिपस्टिक, चिक्कार काजळयुक्त  डबडबलेले डोळे आणि एखाद्या वाक्यात सांगितलेली घुसमट पहाताना कासावीस व्हायचं. ती उच्चभ्रू आवडीची घरं, ते अर्धे भरलेले चैतन्यकाढ्याचे ग्लास आणि घरात मौन बाळगून फिरणारे ते दोघे... गेले कुठे?  

गच्च पैशेवाला डॅड्डी आपली कार्टी गरीब हिरोच्या प्रेमात पडली की कोरा चेक हिरोला द्यायचा. तसे दिलदार बापही आता दिसत नाहीत. पार्टीत आपली पार्टी परायी झालेली बघून आर्त गाणी भावी सवत्यासमोर गाणारे बॅगी हिरोही गायब झाले.

याशिवाय मोठाले अर्धगोल जिने ज्यावरून हिरोईन दुडूदुडू धावत येई ती घरं गायब झाली. 

हे सगळं गायब झालेलं पुन्हा एकत्र करून एक सिनेमा बनवायला पाहिजे राव. कल्पना करा, सलमान काॅलेजमधून पास होऊन धावत येतो, सोनाक्षी डोक्यावर केसांचा तंबू घेऊन त्याला बच्चे की मांचा डायलाॅग बोलतेय वगैरे. निरागसता गेली राव सिनेमातली.


#nostelgia #allaboutcinema #memories #oldhindimovies

No comments: