Sunday, September 14, 2008

रसदार अंगूर

एखाद्याच मूड अत्यंत खराब असेल तर त्याला संजीव कुमार आणि देवेन वर्माचा "अंगूर" दाखवावा. त्याचा मूड परत येणार याची दोन हजार टक्के हमी आहे. मी हा चित्रपट आजवर कितीवेळा पाहिला असेल याची गणतीच नाही. या चित्रपटात संजीव कुमार आणि देवेन वर्मा या दोघांचेही डबल रोल आहेत. संजीव कुमारचं विनोदाचं टायमिंग पहायचं असेल तर या चित्रपटाला पर्याय नाही.
थोडक्यात कथा,(ज्या करंट्या लोकांनी हा चित्रपट अजुनही पाहिलेला नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांनी माझ्यासारखाच वेड लागल्यासारखा पाहिला आहे त्यांच्यासाठीही रीकॆप म्हणून कथा)

श्री. राजतिलक आणि सौ> राजतिलक यांना जुळे मुलगे होतात, त्यांना ते अशोक म्हणून संबोधायला लागतात. त्यानंतर ते आणखी एक जुळ्या मुलांची जोडी दत्तक घेतात त्यांची नावं ते बहादूर ठेवतात आणि दुर्दैवानं या चारांची पांगापांग होते. चारजणांच्या दोन जोड्या बनतात. हे सगळे मोठे होतात आणि संजीव कुमार (मालक-अशोक)-देवेन वर्मा (नोकर-बहादूर) अशा जोड्या बनतात.

संजीवकुमार नं.१ (अशोक)आणि देवेन वर्मा नं.१ (बहादूर)रेल्वेतून एका गावाला जमिनिचा व्यवहार करण्यासाठी चाललेले असतात. त्यांच्याजवळ एक लाख रूपये रोकड असते. संजीव कुमारला डिटेक्टिव्ह कथा वाचण्याची आणि त्याप्र्माणे विचार करण्याची हौस असते याचा नोकर असणारा देवेन वर्मा हा भांग चढविणारा जरा चापलूस नोकर असतो. हे दोघे योगा योगानं संजीव कुमार नं२ (अशोक) आणि देवेन वर्मा नं.२ (बहादूर)रहात असलेल्या गावातच येतात. ही जोडगोळी अद्याप अविवाहीत असते. या दोन नंबरच्या जोडीतला संजीव कुमार गावातला प्रतिष्ठित सरकारी अधिकारी आहे आणि त्याचा नोकर झालेला देवेन वर्मा बिचारा भोळा आहे. संजीव कुमारचं लग्न त्याला लहानाचं मोठं केलेल्याच्या मुलिशी म्हणजे मौसमी (सुधा)चटर्जिशी होतं आणि तो त्याची मेहुणी, म्ह्णजे तनू (दिप्ती नवल) देवेन वर्मा त्याची बायको प्रेमा (अरूणा इराणी)यांच्यासोबत रहात आहे. मौसमी याच्याकडे हिर्याच्या हाराची मागणी करते त्यापायी या दोघांचं जोरदार भांडण होतं, हार आणल्याशिवाय घरी येणार नाही असा पण करून तो घरातून निघतो. इकडे दुसर्या जोडगोळीचं आगमन होतं. आता शहरात दोन अशोक आणि दोन बहादूर होतात. हे सगळे उलट सुलट पध्दतिनं एकमेकासमोर येत रहातात. म्हणजे बाजारात अशोक नं.१ आणि बहादूर नं.२ भेटतात, त्यावेळेस अशोक त्याला विचारतो की तू हॊटेल सोडून इथे का आलास? बहादूरला वाटतं की नवरा बायकोतलं भांडण इतकं विकोपाला गेलंय की आपले साहेब घर सोडून हॊटेलवर रहायला गेले. घरी येउन तो हे सुधा आणि तनुला सांगतो आणि वर साब पगला गये म्हणून शेरा मारतो. इकडे अशोक नं.१ हॊटेलवर परततो आणि बहादूर नं.१ ला फैलावर घेतो की हॊटेल सोडून माझ्यामागोमाग का आलास? बहादूर परोपरीनं सांगतो की मी इथेच आहे मात्र डिटेक्टिव्ह अशोकची शंका दूर होत नाही. सगळा दिवस हा लपंडाव ज्या पध्दतीनं होत रहातो तो पाहून हसून हसून मुरकुंडी वळते. अखेरीस तर लग्न झालेले अशोक आणि बहादूर घराबाहेर आणि ब्रह्मचारी घरात असा मामला होतो. या दोघांना वाटतं की आपल्याकडे असणार्या एक लाखांमुळे चोरांची मोठी गॆंग आपल्याला फसवतेय तर या दोघांशी संबंधित लोकांना यांचं वागणं एकाएकी का बदललं हेच समजत नाही. या चौघांच्या गोंधळात भर घालण्यासाठी ज्वेलर, पोलिस इन्स्पेक्ट,टॆक्सी ड्रायव्हर हजर आहेत. सगळा सावळा गोंधळ अखेरीस अर्थातच उलगडतो आणि ही सगळी भावंडं असल्याचंही समजतं.


हा सगळा गुंता ज्या क्र्मानं कळस गाठत जातो त्याला तोडच नाही. सगळी पात्रं आणि त्यांचा गोंधळ हसवून पुरेवाट करतो. अखेरचा बहादूर फाशी लावून घेण्यासाठी दोर विकत घ्यायला जातो तो प्रसं ग असो की पोलिस चौकितला हाराच्या बेपत्ता होण्याचा प्रसंग असो, सगळी भट्टी परफेक्ट जमली आहे.


गुलझारचा हा चित्रपट म्हणजे विनोदी चित्रपट कसा असावा याचा आदर्श नमुना आहे, याच कथेवर गुलझार यांनीच याधिही एक चित्रपट बनविला होता मात्र दुद्रैवानं तो जमला नाही. मात्र गुलझारला या कथानकाबद्दल इतका जबरी विश्वास होता की त्यांनी पुन्हा नव्यानं टिम जमवली आणि यावेळेस पूर्ण ताकदीनिशी कोणतिही उणिव न राखता चित्रपट काढला. यावेळेस मात्र त्यांचा अंदाज अचूक ठरला आणि चित्रपट झकास जमला. मूळ कथानक शेक्सपियरच्या "कॊमेडी ऒफ एरर्स"वर बेतलेलं आहे. आणि ते मूळ कथानकाइतकच अस्सल वठलं आहे. हा चित्रपट १९८२ साली प्रदर्शित झाला आणि आजही तितकाच ताजा आहे. यातलं "प्रितम आन मिलो" हे गाणं म्हणजे तर धमाल आहे. ज्यांनी हा चित्रपट अजुनही पाहिलेला नाही, त्यांना शिनू आवर्जून सांगेल की एकदा तरी बघाच.

2 comments:

आनंद पत्रे said...

खरंच मस्त सिनेमा आहे हा...पाहुन बरेच दिवस झाले..परत पहातो कुठे बघायला मिळतो का ते?

शिनु said...

@ आनंद

:) मला तर संधी मिळेल तेंव्हा मी हा सिनेमा बघते.