Showing posts with label माझे लाडके शिनुमे. Show all posts
Showing posts with label माझे लाडके शिनुमे. Show all posts

Monday, January 16, 2017



सुईंया सुईंया....






काही काही सिनेमा का आवडतात? याचं काही लॉजिक नसतं. पडेल कॅटेगरीत जमा झालेले हे सिनेमे कधी कधी सिरियस मनोरंजन करतात. हे सिनेमे पाहिले की असं वाटतं अरेच्चा,आधी का बरं आपण हा सिनेमा पाहिला नाही? बरेचदा सिनेमाची पब्लिसिटी नीट झालेली नसते, कधी प्रस्थापित कलाकार नसतात तर कधी मोठ्या चित्रपटांच्या हवेत हे विरून जातात बिचारे.


परवा काय झालं की मॉर्निंग वॉकला जाताना रेडिओवर एक कायच्या काय शब्द असलेलं मात्र कमालिची गोड चाल असलेलं गाणं लागलं. दिल मर्द जात है बदमाश बात है...तन में सुईंया सुईंया...असं काहीतरी. चेहर्‍यावर हसू आलं आणि नंतर विसरायलाही झालं. पुन्हा एक दोन दिवसांनी हेच गाणं लागलं. मग मात्र लक्ष देऊन ऐकलं आणि गंमतच वाटली. मागून उत्सुकताही की हे गाणं आहे कोणत्या सिनेमातलं? एरवी त्याच त्या गाण्याचा अहोरात्र रतीब घालणार्‍या एफ़एमनं हे जरा वेगळं गाणं लावलं म्हणून बरंही वाटलं. पण हे गाणं कोणत्या सिनेमातलं? हा किडा काही स्वस्थ बसू देईना. बरं घरी आल्यावर शब्द विसरायला होत होते, फ़क्त सुईंया सुईंया काहीतरी आहे इतकंच लक्षात राहिलं होतं. मग काय गुगलबाबाला शरण गेले. सुईंया सुईंया चा सर्च टाकला तर भलतंच जपानी काहीतरी दाखवायला लागला. दोन तीन दिवस फ़ारच त्रास दिला या गाण्यानं आणि एरवी एक दिवसाआड लागणारं अचानकच बंद झालं पुढे चार पाच दिवस लागलंच नाही आणि अखेर एक दिवस त्याच्या नेहमीच्या वेळेत लागलं. ताबडतोब वॉक थांबवून गुगलच्या बॉक्समधे शब्द टाईप करून सर्च केलं आणि इतकं बरं वाटलं .... कारण यावेळेस बरोबर काम झालं होतं. या सुईंया सुईंयाची सगळी कुंडली समोर आली होती. गुड्डू रंगीला या भन्नाट नावाच्या सिनेमातलं हे गाणं आहे. पोस्टरवर अर्शद वारसी दिसला आणि मेमरी कार्डमधे खळबळ झाली. मग आठवलं की मागच्या वर्षी असा एक पडेल सिनेमा आला होता. त्यातलं माता का ईमेल आया है हे गाणं सारखं प्रोमोमधे लागत होतं. ते गाणं बघताना अगं आई गं कसले कसले सिनेमे बनतात आणि कसली कसली गाणी असतात असं म्हणत थेट रिजेक्शन स्टॅम्प मारला होता. आज त्याच रिजेक्टेड फ़ाईलला उत्सुकतेनं उघडून बघितल्यावर प्रकरण फारच पडेल नसावं असं वाटलं. मग हा सिनेमा बघितला पाहिजे असंही वाटायला लागलं. युट्युबला शरण जाऊनही उपयोग झाला नाही कारण नळीवर हा सिनेमाच नाही. पुन्हा एकदोन दिवस वैतागात गेले. एकूण हा सिनेमा डोक्याला ताप झाला होता. आधी गाणं मग सिनेमा मिळेना. आता ठरवलंच की बेट्या माझ्यापेक्षा जास्त हुशार आहेस काय? फ़ारफ़ार सर्च करून कष्टानं लिंक मिळवली आणि हॉटस्टारवर अख्खा सिनेमा सापडला. 
वाटलं होतं तितका पडेल अर्थातच नव्हता. म्हणजे दबंग सारखा सिनेमा जर मनोरंजक असेल तर गुड्डू त्याहून दहापट जास्त मनोरंजन नक्कीच करतो आणि राम रतन धन पायोच्या तुलनेत तर सुपरहिट मनोरंजन करतो (उप्स...नेमकी दोन्ही उदाहरणं भाईच्याच सिनेमांची झाली की पण ठीकच आहे म्हणा. शंभरकोटीच्या पायंड्याचं पेटंटही त्याच्याच खिशात आहेच की).
प्रामाणिकपणानं सांगायचं तर सिनेमा नव्वद टक्के जमलाय आणि दहा टक्के गडबडलाय आणि तो इतका गडबडलाय की फ़्लॉपचा शिक्काच बसला. तरिही नव्वद टक्के चांगला असणं हे चांगलंच नाही का?
याचं कथानक फ़िरतं गुड्डू आणि रंगिला या दोन भावांभोवती. माता का जगराता करणं हा मुख्य धंदा आणि या जगरात्याच्या निमित्तानं श्रीमंत घरांची रेकी करून दरोडेखोरांना माहिती देणं हा जोडधंदा ही दोघं करतात. एक कोर्टकेस चालली आहे आणि त्यासाठी दोघे कष्टानं पै पै जोडत आहेत. याचवेळेस एक पंटर यांना किडनॅपिंगची सुपारी देतो. काम सोपं असतं आणि पैसे भरपूर म्हणून गरजेपोटी दोघं तयार होतात. जिला किडनॅप करायचं ती मुकी बहिरी असते. दोघं मोहिम फ़त्ते करतात आणि मुलिला घेऊन थेट शिमला गाठतात. इथे आल्यावर सुरू होता एकाहूनएक जबरदस्त ट्वीस्ट. या मुलिला किडनॅप करून हे दोघे एका सापळ्यात अडकत जातात, त्यातून ते कसे बाहेर पडतात याची गोष्ट म्हणजे गुड्डू रंगीला.
मुख्य भूमिका आहेत अर्शद वारसी, अमित सध, आदिती राव हैदरी आणि रोनित रॉय यांच्या.

चित्रपटाचं रंग रूप रॉ आहे. म्हणजे यात एक रांगडेपणा आहे. नाव अतरंगी आहेच पण सिनेमाही तितकंच अतरंगी मनोरंजन करतो विश्र्वास ठेवा.

ते सुईंया सुईंया बघायचंय? 
इथे बघा   -    https://www.youtube.com/watch?v=6XHsuANpOGU



Sunday, June 12, 2016

स्टोरी टेलर इम्तियाज



इम्तीयाजच्या सिनेमांतली मला सगळ्यात आवडणारी गोष्ट काय माहितीय? तो कधीच कसला आव आणून गोष्ट सांगत नाही. त्यातलं साधं सोपं आणि हळवं जे असतं ते अगदी अलगद मनाला भिडतं. मग सो़चा था ना मधला मिस्टर कन्फ़्युज असो की जब वी मधली गीत. त्यांचं प्रेमातलं भांबावणं, रस्ता चुकणं मग चुकत माकत पुन्हा पटरीवर येणं असू दे की हायवेमधली वीराचं घरापासून भरकटणं असो. अगदी रॉकस्टारमधली आणि तमाशातली न जमलेली भट्टीही कंटाळवाणी वाटत असली तरिही बघाविशी वाटते. 
गोष्ट सांगायची प्रत्येक दिग्दर्शकाची आपली एक स्टाईल असते इम्तियाज गोष्ट कशी सांगतो, तर छान फ़ुलवत...बारकावे टिप...कधी कथेपासून भरकटत.. कधी तिचं बोट घट्ट पकडून ठेवत तो समोरच्याला कथेत गुंगवून ठेवतो. त्याच्या कथेतले
नायक नायिला कमी बोलतात (अपवाद गीतचा) त्यांचे चेहरे जास्त बोलतात. म्हणूनच एरवी बत्तमिझ दिल करत नाचणारा रणबीर रॉक स्टार आणि तमाशात अगदी वेगळा वाटतो. एरवी मटकणारी बेबो गीत म्हणून जास्त गोड वाटते. तिचं पूर्वार्धातलं बडबड करत समोरच्याला वैताग आणणं आणि नंतर एकदमच गप्प होऊन मिटून जाणं मनाला भिडतं. तमाशातली तारा एकाचवेळेस कॉर्पोरेट वुमन म्हणूनही कन्व्हिन्सिंग वाटते तशीच ती वेदच्या प्रेमात पडलेली आणि त्याच्या अनोळखी चेहर्‍यामुळं भांबावलेली साधी मुलगी म्हणूनही भावते. इतकंच काय पण आयेशा टाकियासारखी बरी हिरोईनही सोचा ना था मधे खूप छान वाटते.
कथेतला साधेपणा अगदी सहजपणानं तो समोरच्याला मान्य करायला लावतो म्हणूनच करोडपती विराचं ट्र्क ड्रायव्हरच्या प्रेमात पडणं जितकं सहजशक्य वाटतं तसाच वेद्ला आलेला न्युनगंडही विचित्र वाटत नाही. एकिकडे वास्तवाच्या नावाखाली पडद्यावर अवतरलेला शिवराळ अर्वाच्यपणा तर दुसरीकडे अगदी परग्रहावरचा वाटावा असा संस्कारी ओव्हरडोस, रोमॅंटिक हळवेपणा यात इम्तियाजचे चित्रपट जास्त खरे वाटतात. 

Sunday, September 14, 2008

रसदार अंगूर

एखाद्याच मूड अत्यंत खराब असेल तर त्याला संजीव कुमार आणि देवेन वर्माचा "अंगूर" दाखवावा. त्याचा मूड परत येणार याची दोन हजार टक्के हमी आहे. मी हा चित्रपट आजवर कितीवेळा पाहिला असेल याची गणतीच नाही. या चित्रपटात संजीव कुमार आणि देवेन वर्मा या दोघांचेही डबल रोल आहेत. संजीव कुमारचं विनोदाचं टायमिंग पहायचं असेल तर या चित्रपटाला पर्याय नाही.
थोडक्यात कथा,(ज्या करंट्या लोकांनी हा चित्रपट अजुनही पाहिलेला नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांनी माझ्यासारखाच वेड लागल्यासारखा पाहिला आहे त्यांच्यासाठीही रीकॆप म्हणून कथा)

श्री. राजतिलक आणि सौ> राजतिलक यांना जुळे मुलगे होतात, त्यांना ते अशोक म्हणून संबोधायला लागतात. त्यानंतर ते आणखी एक जुळ्या मुलांची जोडी दत्तक घेतात त्यांची नावं ते बहादूर ठेवतात आणि दुर्दैवानं या चारांची पांगापांग होते. चारजणांच्या दोन जोड्या बनतात. हे सगळे मोठे होतात आणि संजीव कुमार (मालक-अशोक)-देवेन वर्मा (नोकर-बहादूर) अशा जोड्या बनतात.

संजीवकुमार नं.१ (अशोक)आणि देवेन वर्मा नं.१ (बहादूर)रेल्वेतून एका गावाला जमिनिचा व्यवहार करण्यासाठी चाललेले असतात. त्यांच्याजवळ एक लाख रूपये रोकड असते. संजीव कुमारला डिटेक्टिव्ह कथा वाचण्याची आणि त्याप्र्माणे विचार करण्याची हौस असते याचा नोकर असणारा देवेन वर्मा हा भांग चढविणारा जरा चापलूस नोकर असतो. हे दोघे योगा योगानं संजीव कुमार नं२ (अशोक) आणि देवेन वर्मा नं.२ (बहादूर)रहात असलेल्या गावातच येतात. ही जोडगोळी अद्याप अविवाहीत असते. या दोन नंबरच्या जोडीतला संजीव कुमार गावातला प्रतिष्ठित सरकारी अधिकारी आहे आणि त्याचा नोकर झालेला देवेन वर्मा बिचारा भोळा आहे. संजीव कुमारचं लग्न त्याला लहानाचं मोठं केलेल्याच्या मुलिशी म्हणजे मौसमी (सुधा)चटर्जिशी होतं आणि तो त्याची मेहुणी, म्ह्णजे तनू (दिप्ती नवल) देवेन वर्मा त्याची बायको प्रेमा (अरूणा इराणी)यांच्यासोबत रहात आहे. मौसमी याच्याकडे हिर्याच्या हाराची मागणी करते त्यापायी या दोघांचं जोरदार भांडण होतं, हार आणल्याशिवाय घरी येणार नाही असा पण करून तो घरातून निघतो. इकडे दुसर्या जोडगोळीचं आगमन होतं. आता शहरात दोन अशोक आणि दोन बहादूर होतात. हे सगळे उलट सुलट पध्दतिनं एकमेकासमोर येत रहातात. म्हणजे बाजारात अशोक नं.१ आणि बहादूर नं.२ भेटतात, त्यावेळेस अशोक त्याला विचारतो की तू हॊटेल सोडून इथे का आलास? बहादूरला वाटतं की नवरा बायकोतलं भांडण इतकं विकोपाला गेलंय की आपले साहेब घर सोडून हॊटेलवर रहायला गेले. घरी येउन तो हे सुधा आणि तनुला सांगतो आणि वर साब पगला गये म्हणून शेरा मारतो. इकडे अशोक नं.१ हॊटेलवर परततो आणि बहादूर नं.१ ला फैलावर घेतो की हॊटेल सोडून माझ्यामागोमाग का आलास? बहादूर परोपरीनं सांगतो की मी इथेच आहे मात्र डिटेक्टिव्ह अशोकची शंका दूर होत नाही. सगळा दिवस हा लपंडाव ज्या पध्दतीनं होत रहातो तो पाहून हसून हसून मुरकुंडी वळते. अखेरीस तर लग्न झालेले अशोक आणि बहादूर घराबाहेर आणि ब्रह्मचारी घरात असा मामला होतो. या दोघांना वाटतं की आपल्याकडे असणार्या एक लाखांमुळे चोरांची मोठी गॆंग आपल्याला फसवतेय तर या दोघांशी संबंधित लोकांना यांचं वागणं एकाएकी का बदललं हेच समजत नाही. या चौघांच्या गोंधळात भर घालण्यासाठी ज्वेलर, पोलिस इन्स्पेक्ट,टॆक्सी ड्रायव्हर हजर आहेत. सगळा सावळा गोंधळ अखेरीस अर्थातच उलगडतो आणि ही सगळी भावंडं असल्याचंही समजतं.


हा सगळा गुंता ज्या क्र्मानं कळस गाठत जातो त्याला तोडच नाही. सगळी पात्रं आणि त्यांचा गोंधळ हसवून पुरेवाट करतो. अखेरचा बहादूर फाशी लावून घेण्यासाठी दोर विकत घ्यायला जातो तो प्रसं ग असो की पोलिस चौकितला हाराच्या बेपत्ता होण्याचा प्रसंग असो, सगळी भट्टी परफेक्ट जमली आहे.


गुलझारचा हा चित्रपट म्हणजे विनोदी चित्रपट कसा असावा याचा आदर्श नमुना आहे, याच कथेवर गुलझार यांनीच याधिही एक चित्रपट बनविला होता मात्र दुद्रैवानं तो जमला नाही. मात्र गुलझारला या कथानकाबद्दल इतका जबरी विश्वास होता की त्यांनी पुन्हा नव्यानं टिम जमवली आणि यावेळेस पूर्ण ताकदीनिशी कोणतिही उणिव न राखता चित्रपट काढला. यावेळेस मात्र त्यांचा अंदाज अचूक ठरला आणि चित्रपट झकास जमला. मूळ कथानक शेक्सपियरच्या "कॊमेडी ऒफ एरर्स"वर बेतलेलं आहे. आणि ते मूळ कथानकाइतकच अस्सल वठलं आहे. हा चित्रपट १९८२ साली प्रदर्शित झाला आणि आजही तितकाच ताजा आहे. यातलं "प्रितम आन मिलो" हे गाणं म्हणजे तर धमाल आहे. ज्यांनी हा चित्रपट अजुनही पाहिलेला नाही, त्यांना शिनू आवर्जून सांगेल की एकदा तरी बघाच.