Friday, May 7, 2021

त्रिभंग

 

#Tribhang #त्रिभंग 




एक छानशी कादंबरी वाचावी असा अनुभव हा सिनेमा देतो या वाक्यानं सुरवात झालेल्या रिव्ह्यूत चित्रपटपटाचं कौतुकच असणार हे ओघानंच आलं. 

मुळात मी रिव्ह्यू लिहीणार नाहीए. कारण सिनेमा बघितल्यावर बरंच काही विचार करायला लावतो हा सिनेमा. रूटिन रिव्ह्यू पलीकडचं खूप काही लिहावसं वाटतं हा चित्रपट बघून. हे या चित्रपटाचं नव्हे तर कथेचं यश आहे. चित्रपटाचं नव्हे या वाक्याचा अर्थ कथा उत्तम आणि सादरीकरण माती असा अजिबात नाही. मात्र सिनेमा हेही सिनेमॅटिक भाषेतली गोष्ट सांगणंच असतं. गोष्ट हा आत्मा असेल तर या सिनेमाचा आत्मा प्रेमात पडावा असा आहे. 

ही गोष्ट सिनेमा म्हणून पडद्यावर आणताना कसरत होती कारण अनेक जागा होत्या जिथे कथा पटकन सुटून भरकटण्याची पूर्ण शक्यता होती. सिनेमात दिग्दर्शक दिसतो तसा या सिनेमात "लेखक" दिसतो. एका लेखिकेची गोष्ट साकारली जाताना ही गोष्ट जिने लिहिली ती दिसत रहाते. सतत .आणि हे दिसणं खूप छान आहे. (म्हणूनच पोस्टला रेणुका असलेलं पोस्टर आवर्जून निवडलेलं आहे) हा सिनेमा बघताना दुपारच्या वेळेत वाचल्या जाणाऱ्या कादंबरीचा फील येतो. आता हा सिनेमा अनेकांना अजिबात का आवडला नाही याचं कारणही कळायला हरकत नाही. मुळात हा gener जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्हाला हा सिनेमा आवडणारच नाही हे अगदी नक्की. 

दुसरा आक्षेप, काजोलची लाऊड अॅक्टिंग. ती लाऊड आहे का? तर हो. तिचं पात्राशी एकरूप होणं कमी पडलंय का? तर हो. ती कथेत फिट नाही का? याचं उत्तर जरा संदिग्ध आहे. म्हणजे तुम्ही जर तब्बूचे फॅन असाल तर सतत वाटत रहातं यार, ही भूमिका तब्बूसाठीच लिहिली आहे. इतकी ती अनुच्या कॅरेक्टरमधे  दिसते. विशेषतः जो हायपाॅईंट आहे, जिथे अनुला नयनचा पश्चाताप कळतो त्या सिनमधे तर फार फार वाटतं की तब्बूनं हा सिन फार उच्च लेव्हलवर केला असता.  तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय? (विचित्र उदाहरण आहे, त्याबद्दल साॅरी. पण दुसरं चपखल आठवलं नाही) की चपलेला खिळा असतो तो सुरवातीला टोचून हैराण करतो नंतर नंतर त्याची सवय होते आणि काही वाटेनासं होतं. किंवा ड्रेसला जो प्राईस टॅग असतो त्याची ती नायलाॅनची दोरी चुकून रहाते मग मानेवर टोचत रहाते, अनईझी होत रहातं थोडावेळ पण मग दूर्लक्ष करता येतं ते टोचणं. तसं काहिसं झालंय हे अनु चं कास्टिंग. पण पूर्ण फसलेलं अगदी नक्की नाही. काजोलनं पूर्ण प्रयत्नानी पेलवलं आहे. फक्त तिच्यावरची दिग्दर्शकाचीच पकड मधेच ढिली झालेली जाणवते पण तितकंच. मात्र हे सगळं कुठेही रसभंग करत नाही कारण बाकी सगळं कास्टिंग इतकं पर्फेक्ट आहे की क्या केहेने! 

मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ही की, सिनेमाची कथा मराठी कुटुंबात घडते आणि "ओघात" मराठी संवाद येतात. हे ओघात येणं फार छान  जमलंय. इंग्लिश-हिंदी-मराठीची भेळ न होता ते ओघवतं वाटतंय आणि हे लिहिणं अजिबात सोपं नाहिए.

कथानक अजिबातच सांगणार नाही याचं कारण स्पाॅयलर्स नसून काही गोष्टी या सांगण्यापेक्षा अनुभवण्यात जास्त मजा असते. मात्र यातल्या व्यक्तीरेखांविषयी उल्लेख करण्याचा मोह टाळता येत नाही. 

मनस्वी असणं हे कितिही पोएटिक वाटत असलं तरिही त्याची किंमत मनस्वी व्यक्तीशिवाय बरेचण चुकवतात. खासकरून अगदी जवळची माणसं. हे त्या व्यक्तीच्या गावीही नसतं बहुतेकदा. 

आपण आपले निर्णय फार बोल्डपणे घेतले असं मानणारे  त्याचा परिणाम इतरांवर होऊ शकतो हे सोयिस्कर विसरतात. ज्यांचा या मनस्वीपणाशी संबंध नसतो ना या बोल्डनेसशी ती जवळची माणसं मात्र नाहक भरडली जातात.

त्रिभंग हे भरडलं जाणं फार अलवारपणे दाखवतो.


याचा क्लायमॅक्सही खूप हुशार फ्रेम्समधून केला आहे. मला कोणत्याही उणिवांशिवाय हा सिनेमा आवडलाय. 

महत्वाचं, वयवर्षं 17 सोबत बघितला आहे. शिव्या, सिगरेट,  दारू हे काहीही आड येत नाही. (तसंही फक ही अलिकडे शिवी राहिली नाहीए)  बिलिव्ह मी. कारण सिनेमा गोष्टीत गुंतवून ठेवण्याचं काम पर्फेक्ट करतो.


तुम्ही अगदीच पिटातले प्रेक्षक असाल तर नाद सोडा पण चांगली गोष्ट बघायला आवडत असेल तर नक्की बघा. एकदा बघावा असा नक्कीच आहे.


अवांतर- यातले काही अनुभव,  काही नाती कोणी अनुभवली असतील तर हा सिनेमा तुम्हाला नक्कीच बांधून ठेवेल.




No comments: