Wednesday, March 2, 2011
घो मला असला हवा गं बाई

काही सिनेमे नावावरून फ़ुटकळ वाटत असले तरिही ते मस्त असतात. मागे एका रविवारी झी टॉकीजवर "घो मला असला हवा गं बाई" या तद्दन साधारण नावाचा धमाल सिनेमा पाहिला. यावर लिहावं असं मनापासून वाटत होतं, त्याची कारणं दोन.
-एकतर सिनेमा खरोखरच मस्त जमलाय
-जाहिरात तंत्र न जमल्यानं आणि इतर काही कारणानं हा चित्रपट प्रेक्शकांपासून लांब राहिला.
-चित्रपटात कोकणातलं जे छायाचित्रण आहे हे इतकं गोड जमलंय त्यापुढे यश चोप्राचं स्वित्झरलंड फ़िकं पडेल.
-चित्रपटातली नायिका चिकण्या गटात मोडणारी आहे (मराठी नायिकांना ग्लॅमरचा झोत का नाही.) सोनाक्षी सिन्हाला अजून बांधेसूद केलं आणि उंची कमी केली तर जशी दिसेल तशी ही दिसते. मी तरी तिला पहिल्यांदा पाहिलं मला जाम आवडली (फ़क्त याच सिनेमात ती दिसली इतर कुठेच कशी नाही?)
चित्रपटाचं कथानक घडतं कोकणातल्या एका टुमदार आणि अत्यंत सुंदर रेखिव गावात. या गावात एका सधन म्हणजे कोकणातल्या साधारण गावात जितका सधनपणा दिसेल त्याप्रमाणे सधन असलेल्या घरात आपली नायिका (राधिका आपटे) रहाते. कामसू, सुंदर, स्पष्टवक्ती, रोखठोक (अगावू नाही) आणि साधी अशी नायिका वडिलांची (रविंद्र मंकणी)लाडकी आहे. हिचं जवळच्याच गावातल्या एका घरातल्या मुलाशी (निखिल रत्नपारखी), जो मुंबईत नोकरी करतो, लग्न ठरलेलं आहे. हिला नवरा कसा डॅशिंग हवा असतो शिवाय लग्न होण्यापूर्वी त्याला बघायचं असतं आणि स्वत:च्या पसंतिनं लग्न करायचं असतं. वडील अर्थातच याला तयार नसतात आणि तिदेखिल त्यांच्या शब्दाबाहेर नाही. एक दिवस मुंबईकर नवरदेव नावेतून गावातल्या धक्क्यावर उतरतात आणि ते ध्यान बघून नायिका हिरमुसली होते. मुंबईकर नवरदेव मुलिला बघितल्याशिवाय लग्न करणार नाही असा हट्ट करतात शिवाय तिला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. मध्यस्थाकरवी मुलिच्या घरी निरोप जातो की मुलाला मुलिला भेटायचं आहे. जागा आणि वेळ निश्चित होते. नवरदेव खुष होतात. प्रत्यक्षात मुलगी एकटी येत नाही तर जवळपास निम्मा गाव तिच्यासोबत असतो. (हा प्रसंग अगदी लव्हली जमलाय). नवरदेवाच्या रोमॅंटिक भेटिच्या स्वप्नाचा अगदी चुराडा होतो. हिच भेट पुढे लग्नाच्या "व्यावहारिक बोलण्यात" रूपांतरीत होते. नवरदेवाची आई (रिमा लागु) टिपिकल सासू आहे. ठोकून ठोकून मागण्या तर करतेच शिवाय मुलगी मुंबईला जाणार नाही तर शेतीभातीच्या कामात मदत करायला गावातच राहिल असंही ठणकावून सांगते. मुलिच्या घरचे वैतागतात पण करतात काय लग्नाचा बोभाटा आधिच झालेला असतो. शिवाय लग्नकार्य म्हणजे असं कमी जास्त असणारच हे समजून पुढच्या तयारीला लागतात. मुलगी मात्र मनातून नाराज होते. याच गावात साऊंडसिस्टिम पुरवण्याचं काम करणारा एक मुलगा असतो (ओमकार गोवर्धन) त्याच्याशी हिची आंखमिचोली सुरू होते. तो आधिपासूनच हिच्यावर लट्टू असतोच. हिच्या लग्नाचं लाईटिंग करण्याचं आणि साऊंडसिस्टिम लावण्याचं कंत्राटही यालाच मिळतं. ही पठ्ठी त्याला सरळच विचारते "करशिल का माझ्याशी लग्न"? तोही तयारिचा आहे. तो तिला सरळ सांगतो "तुझा बाप लावून द्यायला तयार असेल तर करतो की". ही नानाप्र्कारानं त्याला तयार करायला बघते. मात्र तो त्याच्या मर्यादा जाणून तिला प्रतिसाद देत नाही. हिची आज्जी मात्र तिच्या कानात सांगते की मनात असेल त्याच्याशिच लग्न कर काही झालं आणि काही करावं लागलं तरी. झालं, हिला ग्रीन सिग्नलच मिळतो. मात्र या सगळ्या गोंधळात तिचं लग्न लागतंही. सासरी येते आणि माप ओलांडायच्या आतच अंगात "बाहेरचं वारं" शिरल्यासारखं करायला लागते. सासू, नवरा सगळे घाबरतात. गुरूजी सांगतात अशा स्थितीत "गर्भाधान विधी" करू नका. तिला बरी होण्यासाठी माहेरी पाठवतात. माहेरचे काळजीत आणि ही खुष. पुढेही अशाच युक्त्या ती योजत रहाते. अखेरीस एक "गळ" असा लागतो की त्या एकाच गळात हिची नवरा, खाष्ट सासू यांच्यापासून सुटका होते आणि तिला हवा असलेला "घो" एकदाचा तिला सगळ्यांच्या संमतिनं मिळतो. हे सगळं राजीखुषीनं घडतं कोणाला संशयही येत नाही की हिचा सगळा कारभार आहे. मात्र हे सगळं घडून येण्यासाठी ती जे करते ते चित्रपटातच पहायला मजा आहे. असं नुसतं वाचून त्यातली गंमत अनुभवता येणार नाही.
सिनेमा चांगला असण्यासाठी जे जे लागतं ते सगळं यात आहे. सुंदर नायिका, देखणा नायक (त्यांनी भुमिकेचं घेतलेलं बेअरिंग), इतर सगळे कलाकार,(रविंद्र मंकणी, नीना कुलकर्णी, रिमा लागू, ज्योती सुभाष, डॊ. मोहन आगाशे, श्रीराम रानडे, शर्वरी लोहकरे) इतके मस्त भुमिकेत आहेत की ती प्रामाणिकपणानं गाववाले वाटतात.
सिनेमाचं संगीतही फ़ुल टू आहे. कोकणदर्शन हे सिनेमातलं एक महत्वाचं पात्र असल्याप्र्माणे आहे. चित्रिकरण तर केवळ अप्रतिम. दुसरा शब्द नाही. बांधिव कथा-पटकथा आहे. मांडणी सुबक आहे उगाच फ़ाफ़टपसारा नाही.
Monday, June 14, 2010
मस्त मस्त मुंबई-पुणे-मुंबई

फ़ेसबुकवरून सतीश राजवाडेंनी मुंबई-पुणे-मुंबईचं प्रमोशन सुरू केलं त्याचवेळेस हा सिनेमा सोडायचा नाही असं ठरवलं होतं. कारण सतीश राजवाडेंची स्टाईल मला खुपच आवडते. त्यातून मुंबईकर-पुणेकर हा वाद आवडता टाईमपास असल्यानं याकडे बघण्याचा त्यांचा सिनेमॅटिक दृश्टिकोन कसा असेल याची उत्सुकता होतीच. सेंट पर्सेंट धमाल असा हा चित्रपट लांबीला तसा कमी (तोकडा नव्हे) वाटतो. तसं पहायला गेलं तर अलिकडचे सगळेच माराठी सिनेमे बघताना असंच वाटत रहातं. सिनेमाच्या सुरवातिलाच यात पुढे काय असणार आहे याचा अंदाज येऊनही उठून जावसं वाटत नाही हे सिनेमाचं यश आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी ही कचकचीत नवीकोरी जोडी अख्खा सिनेमा चार खांद्यावर (दोघांचे दोन मिळून चार या अर्थानं अन्यथा या चार खांद्यांचा "त्या" चार खांद्यांशी तसा संबंध नाही) पेलून अलगद पुढे नेते. त्यातल्या त्यात डावं उजवं करायचंच तर कानातल्या बिकबाळीसहित स्वप्निल "लाजवाब". पुणेरी पोट्ट्याचं बेअरींग या मुंबईकरांनं तब्येतीत राखलंय. अखंड सिनेमाभर त्याची पुणेरी बडबड हशा पिकवत रहाते. या सिनेमाभर दोघंही एक जोडी कपड्यांवर वावरले आहेत (अपवाद स्वप्निलचं स्वप्नातलं गाणं) असलं लो बजेट काम हाय बजेट मनोरंजन आरामात करून गेलंय. एक छोटीशी कथा सतिश राजवाडेंनी ज्या अफ़लातून फ़ुलवलीय त्याला तोड नाही. ज्यांनी हा सिनेमा अजून पाहिलेला नाही त्यांनी डोळे झाकून तिकीट काढून डोळे उघडे ठेवून बघायला हरकत नाही.
जाता जाता- एका प्रसंगात (स्वप्निल आणि मुग्धा सीसीडीत बसलेले असताना) स्वप्निल ग्रील सॅंडवीचची ऑर्डर देताना ते कसं असायला हवं याची फ़ुटभर लांब सूचना देतो आणि प्रत्यक्षात खाताना मात्र साधं व्हेज सॅंडवीच खातो. हे कसं काय बुवा?
-मुंबई पुणे फ़ॅशनवरून वाद चाललेला असताना मुग्धा अचानकच स्वप्निलला "तू व्हर्जिन आहेस का?" हा प्रश्न का विचारते?
-सिंहगडावर हिंडताना मुग्धा हाय हिल्स (पेन्सिल हिल्स) घालून रॅम्पवर चालल्यासारखी कशी काय चालते?
-गल्लीत क्रीकेट खेळायला म्हणून घरातल्या अवतारात बाहेर पडलेला स्वप्निल खिशात डेबीट कार्ड का बाळगून असतो?
हे असे बारीक प्रश्न सिनेमा बघताना पडण्याची शक्यता आहे मात्र या सगळ्या बारीक शंकासहितही हा चित्रपट उत्तम आहे याबद्दल मात्र खात्री बाळगा.
Thursday, April 22, 2010
कतरा कतरा जीने दो....

काही गोष्टी या अगदी मेड फ़ॉर इच आदर असतात. सिनेमाच्या बाबतीत बोलायचं तर आरडी आणि गुलझार, खय्याम आणि गझल-आशा, रेखा आणि आशा.....कधी विचार केलायत की उमरावजान मध्ये रेखा नसती तर? सिनेमात जानच आली नसती. उमराव जान म्हणजेच रेखा हे इतकं फ़िट्ट बसलं होतं की नव्या उमरावजानमध्ये ऐश्वर्या (कमालिची सुंदर दिसूनसुध्दा) आपल्याला तरी बुवा फ़ारशी आवडली नाही. रेखाच्या उमरावजामधली तिची ठाव घेणारी नजर, घायाळ कटाक्ष, कमालिची सुंदरता (ऍण्ड व्हॉट अ ग्रेस)....हे सगळं अजरामर झालंय अगदी मोनालिसाच्या चित्रासारखं. तिच्यासारखी तीच.
आजचा विषय उमरावजान नाही तर "इजाजत" आहे. एकीकडे अदावाली उमराव आहे आणि दुसरीकडे इजाजतमधली शालिन, स्वाभिमानी सुधा आहे. रेखा का आवडावी? याचं उत्तर या जबरी रेंजमध्ये आहे. आवडत्या चित्रपटांच्या यादीत आणि झोपेतून उठवून बघ हा सिनेमा असं सांगितलं तरी जो बघायला आवडतो तो इजाजत. गुलझार, आरडी, रेखा, नासिरूद्दीन, आशा भोसले हे इतके इनग्रिडियन्टस असताना आणखी वेगळी मेजवानी काय पाहिजे? प्रत्येक चित्रपटाला एक लय असते. ती दिसत नाही तर जाणवते. इजाजतची लय ही शांत समंजसपणाची आहे. मायाचा वेडेपणा टिपिकल पती पत्नी और वो वाला वाटत नाही आणि सुधावर होणारा अन्यान चैन पडू देत नाही. वास्तवात जर असं घडलं तर काय होईल तेच सिनेमातही होतं. म्हणजे आपल्या पतिच्या आयुष्यातल्या प्रेयसीसाठी आणि दोघांच्यातल्या न संपणार्या ओढीसाठी पत्नी फ़ारकत हेऊन वेगळी होते, नवं आयुष्य निवडते. पझलचे तुकडे फ़िट्ट बसतात तरिही "कुछ मिसिंग है बॉस" वाटत रहातं. मला या सिनेमातलं काय आवडतं तर याची कथा मांडण्याची पध्दत. निवांत तब्येतीत कथा साकारत जाते. कुठेही घाई नाही, उरकण्याची वृत्ती नाही. सगळं कसं एका लयीत पण शांतपणानं साकारत जातं. मेलोड्रामा करायला वाव असतानाही तो मोह टाळून एक समंजस कथा गुलझार ज्या पध्द्तिनं मांडतात...मान गये बॉस! एखादी कादंबरी वाचल्याचा फ़ील हा सिनेमा देतो. पान पान उलटवत कथा उलगडत जाते. कथेत गाणी येत नाहीत तर भेटत जातात. पहिल्याच बारिशो कें पासून सिनेमाचा मूड पक्का पकडून ठेवला जातो. मग मेरा कुछ सामान, खाली हाथ शाम आई है, कतरा कतरा जिने दो....सगळा प्रवास कथेचं बोट धरून होतो. संवादाचं काम गाणं साधतं आणि मुड आणखी बनत जातो.
ज्या प्रश्नांची उत्तरं सिनेमाभर आपण कधी मायाच्या नजरेतून कधी सुधाच्या तर कधी महिन्दर (महेंद्र नव्हे)च्या नजरियातून शोधत रहातो त्याचं कोणतंही उत्तर न मिळता एक चुटपुट लावून चित्रपट संपतो.
मुझे जा ना कहो...

सुंदर गाणं जमायला सूर लागावा लागतो, उत्तम पदार्थ बनण्यासाठी सगळे घटकपदार्थ अचूक पडावे लागतात आणि छान सिनेमा बनायला अभिनयापासून कथेपर्यंत सगळी भट्टी जमून यावी लागते. असा मस्त जमलेला चित्रपट आहे बासुदांचा "अनुभव". बासुदांच्या तीन चित्रपटांच्या सेरीजमधला हा माझा सर्वात आवडता चित्रपट आहे. लग्नानंतर काही वर्षांनी स्थिरावलेलं पती पत्नीचं नातं आणि त्यात काही कारणानं काही काळ उठणारे तरंग असा कथाविषय असाणारा हा चित्रपट. ब्लॆक व्हाईट असुनही कमालिचा सुंदर बनल आहे. हा चित्रपट बघताना आतून एक बेचैन बुलबुला सतत अस्वस्थपणे हलत असतो, याचं कारण याची प्रत्येक फ्रेम चित्रपटाच्या कथेशी इमान राखून समोर येते. चित्रपट बघताना नक्की कसं वाटतं माहित आहे? भर दुपारी तुम्ही कधी एखाद्या निरव ठिकाणच्या डोहावर गेलाय? आजुबाजुला चिटपाखरू नसताना, कसलाही आवाज, हालचल नसताता तो गडद हिरवा खोल डोह कसा कंटाळवाणा चुपचाप पसरलेला असतो? आपल्याला ते पाहून खडा टाकून या चित्रात जरा जीवंतपणा आणावासा वाटतो. तसं हा चित्रपट पहाताना जाणवत रहातं. लग्नानंतर काही वर्षांनी पतीपत्नीचं काहिसं एकसुरी होणारं नातं अगदीं परफेक्ट समोर येतं की आपण या दोघांत तिसरे होउन फिरत रहातो. यातलं गीता दत्तचं वर सांगितलेलं गाणं चित्रपटात इतकं सहजपणानं येउन जातं की आपल्या लक्शातही येत नाही, आपण गाणं पाहिलं. घरकाम करताना एखादी ग्रुहिणी जसं गुणगुणत एका लयीत काम आवरत असते तसं हे गाणं येतं आणि जातं.
गाणं दोन भागात आहे, चित्रपटची एकदा नायिका ,म्हणजे तनुजा अंघोळ करताना गुणगुणत असते आणि दुसर्यांदा नायक
नायिका म्हणजे संजीव कुमार आणि तनुजा खुप दिवसांनंतरचा जुना निवांतपणा अनुभवत असतात तेंव्हा. यातला दुसरा भाग जास्त तरल झाला आहे. अलिकडे एकमेकांसाठी रिकामा वेळच मिळत नाही अशी सल असणारं, तरूणपणाकडून प्रौढपणाकडे चाललेलं एक तरूण जोडपं, कार्यमग्न पती आणि कलाकार, रसिक पण रिकामपणानं घर सांभाळणारी ग्रुहिणी. सगळ निरस कंटाळवाणं चाललेलं आहे, एकमेकाविरूध्द तक्रार करण्याचंही आता रूटिन बनलं आहे, जे चाललंय त्यात आता काही बदल होणार नाही हे सत्य स्वीकारून एकमेकासोबत रहाणारे पती पत्नी आणि एक दिवस अचानकच तो चुकार निवांत दिवस या जोडप्याच्या आयुष्यात येतो. ऊन्हाची तलखी पावसाच्या एका सरसरून आलेल्या सरीमुळं कशी धुवून जाते तसं होतं. सगळे शिकवे गिले दूर होतात, अगदी निवांत चाललेल्या या दिवसाची दुपार डोक्यावर येते आणि अचानक पाऊस बरसायला लागतो, बस्स! आणखी काय पाहिजे? बाहेर कोसळणार्या सरी, आणि खिडकीच्या तावदाना पलिकडून डोकावणारा निशिगंध, पाण्याचे टपोरे थोंब माळलेली निशिगंधाची ताजी फुलं आणि हे जोडपं. केवळ केवळ आणि केवळ इतक्या भांडवलावर हे कमालिचं रोमॆंटिक गाणं येतं. तनुजाचे टाईट क्लोजअप फ्रेममधून हलूच देत नाहीत. गोड दिसणारी तनुजा या गाण्यात,"दो जुडवा होठों की बात कहो आंखो से...मेरी जान" असं म्हणताना आणखिनच खट्याळ गोड दिसलीय.
Thursday, October 23, 2008
रेनकोट

माझ्या आवडत्या चित्रपटातला हा एक. ऐश्वर्या आणि अजय देवगणचा ’रेनकोट’. रीपरीप पावसाचा रुतू. अशाच पावसाळ्यातला एक कंटाळवाणा शेवाळलेला दिवस आणि एकेकाळच्या प्रेयसीच्या घराचा पत्ता शोधत आलेला नायक. त्याला तिचं घर सापडतं तो आत येतो आणि दोघांच्या गप्पा भुतकाळाचा धागा पकडून चालू होतात. ती त्याला सांगते की नवर्यासोबत तिचा संसार सुखानं चाललेला आहे. मोठेपणाच्या गोष्टी सांगत रहाते आणि तो जळतोय का याचा अंदाज घेत असतानाचा त्याची परिस्थिती अजमावत रहाते. एककेकाळी तिच्यावर फ़क्त प्रेम करणारा आणि सुखी संसाराची स्वप्नं बघणारा तो तिला पटवून देतोय की तो देखिल आता "बडा आदमी" बनला आहे. दोघे एकमेकाचा अंदाज घेत असताना प्रेक्षक म्हणून आपणही पडद्यावर घडणार्या प्रसंगांचा अंदाज लावत असतो. कंटाळवाणेपणा जसा सिनेमातल्या दिवसावर पसरलेला आहे तसाच तो नायिकेच्या देहबोलीवर, नायकाच्या बोलण्यात आणि तिथून झिरपत तो आपल्याही पर्यंत आलेला आहे. अगदी कंटाळवाणं असुनही आपण त्या कथेत गुंतत जात रहातो. मोठ्या घरात अवाढव्य फ़र्निचर सांभाळत राहिलेली नायिका तिच्या साध्या रहाण्यामागचं कारण देत रहाते. सततच्या बंद दारांमागचं कारण देत रहाते. नायकाला खटकणार्या गोष्टी आपल्याही पल्ले पडत नाहीत. अशाच वाक्यांतून दोघांची कथा पुढे सरकत असतानाच गतकाळातले काही तुकडे येत रहातात. नायिका त्याला जेवणाचं विचारते तो सांगतो की त्याची सेक्रेतरी जेवणासाठी वाट बघत असेल. ती एक क्षण मत्सरानं कशीनुशी होते आणि पुढच्याक्षणी त्याला हक्कानं जेवायला सांगते. डाएटिशियननं जास्त जेवायला बंदी आणल्यामुळे घरात स्वयंपाक केलेला नाही या सबबीखाली बाहेरून जेवण आणायला जाते आणि पावसापासून वाचण्यासाठी नायकाचा रेनकोट घेऊन जाते. ती बाहेर गेल्यावर नायक सगळ्या खिडक्या उघडतो आणि एक आगंतुक घरात येतो. हा आगंतूक म्हणजे खरं तर नायिकेच्या घराचा मालक असतो आणि थकलेलं भाडं वसूल करण्यासाठी नायिकेच्या घराबाहेर उभा असतो. त्याला टाळण्यासाठी नायिका दारं बंद करून बसत असते. मोठेपणाचा सगळा आव असतो. प्रत्यक्षात खायची मारामार असते. आज नायकानं दार उघडल्यामुळे किमान त्याला घरात प्रवेश तरी मिळालेला असतो. या दोघांच्या संवादातून आधिच्या संवादांचा अर्थ उलगडत जातो.नायक आणि नायिकेच्या कथेमागची कथा समोर येत रहाते. नवर्याच्या श्रीमंतिचा बडेजाव करणारी नायिका जशी भिकेकंगाल असते तसाच नायकही फाटका असतो. धंदापाण्यासाठी मित्रांकडून उधार उसनवारी करायला आलेला नायक मित्रांकडे राहून त्यांच्याकडूनच जमलेले सगळे पैसे नायिकेच्या घराच्या थकलेल्या भाड्यापोटी मालकाला देतो आणि काही महिने तरी तिला घरातून बाहेर न काढण्याची विनंती करतो. नायिका आल्यावर जेवण करून तो निघून जातो. घरी पोहोचल्यावर तिच्या आठवणिनं आणि तिच्यावरच्या परिस्थितीनं व्याकूळ होत रहातो. मित्राची बायको रेनकोट वाळत घालायला जाते त्यावेलेस तिला खिशात काही तरी सापडतं म्हणून ती नायकाला द्यायला येते. तो पहातो तर नायिकेनं त्याच्यासाठी काही पैसे आणि एक चिठ्ठी लिहिलेली असते. रेनकोटच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून त्याच्या परिस्थितीची कल्पना तिला आलेली असते. त्याला काही मदत करावी म्हणून तिनं पैसे गुपचुप त्याच्या खिशात टाकलेले असतात. मात्र पैसे देतानाही ती आपला बडेजाव मिरवायला विसरत नाही. चिठ्ठीत तिनं लिहिलेलं असतं की, घाईघाईत नवरा चेकबुक ठेवून जायचा विसरल्यानं हातातल्या बांगड्या गहाण टाकून पैसे आणले आहेत आणि नवरा आल्यावर आणखी काही मदत ती त्याला करेल. रात्र आणखी गडद शेवाळी होते निराश झालेला दु:खी नायक छताकडे नजर लावून बसलेला असतो तर त्या काळोखात कोणालाही पत्ता न लागू देता नायिका सामान सुमान घेऊन घर बदलत असते.
ऐश्वर्या आणि अजय ही दोनच पात्रं सबंध चित्रपटभर दिसतात. अन्नू कपूर घरमालकाच्या भुमिकेत आगंतूकासारखा हजेरी लावून जातो. या दोघांचा सहज अभिनय आणि रुतु पर्णोचं दिग्दर्शन यामुळे चित्रपट एक खास छाप सोडतो यात शंकाच नाही. यातली प्रत्येक फ़्रेम बोलकी आहे. पार्श्वभुमीवर पावसाची सततची रीपरीप मनावर साठत जाते. चित्रपट संपवताना तो अगदी रीतसर "दी एंड" असा न करता तो सहज विरघळून गेल्यासारखा आणि टॊचणी लावत, विषयाचा चिमटा तसाच घट्ट रूतवून चित्रपट संपतो.
Sunday, September 14, 2008
रसदार अंगूर
एखाद्याच मूड अत्यंत खराब असेल तर त्याला संजीव कुमार आणि देवेन वर्माचा "अंगूर" दाखवावा. त्याचा मूड परत येणार याची दोन हजार टक्के हमी आहे. मी हा चित्रपट आजवर कितीवेळा पाहिला असेल याची गणतीच नाही. या चित्रपटात संजीव कुमार आणि देवेन वर्मा या दोघांचेही डबल रोल आहेत. संजीव कुमारचं विनोदाचं टायमिंग पहायचं असेल तर या चित्रपटाला पर्याय नाही.
थोडक्यात कथा,(ज्या करंट्या लोकांनी हा चित्रपट अजुनही पाहिलेला नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांनी माझ्यासारखाच वेड लागल्यासारखा पाहिला आहे त्यांच्यासाठीही रीकॆप म्हणून कथा)
श्री. राजतिलक आणि सौ> राजतिलक यांना जुळे मुलगे होतात, त्यांना ते अशोक म्हणून संबोधायला लागतात. त्यानंतर ते आणखी एक जुळ्या मुलांची जोडी दत्तक घेतात त्यांची नावं ते बहादूर ठेवतात आणि दुर्दैवानं या चारांची पांगापांग होते. चारजणांच्या दोन जोड्या बनतात. हे सगळे मोठे होतात आणि संजीव कुमार (मालक-अशोक)-देवेन वर्मा (नोकर-बहादूर) अशा जोड्या बनतात.
संजीवकुमार नं.१ (अशोक)आणि देवेन वर्मा नं.१ (बहादूर)रेल्वेतून एका गावाला जमिनिचा व्यवहार करण्यासाठी चाललेले असतात. त्यांच्याजवळ एक लाख रूपये रोकड असते. संजीव कुमारला डिटेक्टिव्ह कथा वाचण्याची आणि त्याप्र्माणे विचार करण्याची हौस असते याचा नोकर असणारा देवेन वर्मा हा भांग चढविणारा जरा चापलूस नोकर असतो. हे दोघे योगा योगानं संजीव कुमार नं२ (अशोक) आणि देवेन वर्मा नं.२ (बहादूर)रहात असलेल्या गावातच येतात. ही जोडगोळी अद्याप अविवाहीत असते. या दोन नंबरच्या जोडीतला संजीव कुमार गावातला प्रतिष्ठित सरकारी अधिकारी आहे आणि त्याचा नोकर झालेला देवेन वर्मा बिचारा भोळा आहे. संजीव कुमारचं लग्न त्याला लहानाचं मोठं केलेल्याच्या मुलिशी म्हणजे मौसमी (सुधा)चटर्जिशी होतं आणि तो त्याची मेहुणी, म्ह्णजे तनू (दिप्ती नवल) देवेन वर्मा त्याची बायको प्रेमा (अरूणा इराणी)यांच्यासोबत रहात आहे. मौसमी याच्याकडे हिर्याच्या हाराची मागणी करते त्यापायी या दोघांचं जोरदार भांडण होतं, हार आणल्याशिवाय घरी येणार नाही असा पण करून तो घरातून निघतो. इकडे दुसर्या जोडगोळीचं आगमन होतं. आता शहरात दोन अशोक आणि दोन बहादूर होतात. हे सगळे उलट सुलट पध्दतिनं एकमेकासमोर येत रहातात. म्हणजे बाजारात अशोक नं.१ आणि बहादूर नं.२ भेटतात, त्यावेळेस अशोक त्याला विचारतो की तू हॊटेल सोडून इथे का आलास? बहादूरला वाटतं की नवरा बायकोतलं भांडण इतकं विकोपाला गेलंय की आपले साहेब घर सोडून हॊटेलवर रहायला गेले. घरी येउन तो हे सुधा आणि तनुला सांगतो आणि वर साब पगला गये म्हणून शेरा मारतो. इकडे अशोक नं.१ हॊटेलवर परततो आणि बहादूर नं.१ ला फैलावर घेतो की हॊटेल सोडून माझ्यामागोमाग का आलास? बहादूर परोपरीनं सांगतो की मी इथेच आहे मात्र डिटेक्टिव्ह अशोकची शंका दूर होत नाही. सगळा दिवस हा लपंडाव ज्या पध्दतीनं होत रहातो तो पाहून हसून हसून मुरकुंडी वळते. अखेरीस तर लग्न झालेले अशोक आणि बहादूर घराबाहेर आणि ब्रह्मचारी घरात असा मामला होतो. या दोघांना वाटतं की आपल्याकडे असणार्या एक लाखांमुळे चोरांची मोठी गॆंग आपल्याला फसवतेय तर या दोघांशी संबंधित लोकांना यांचं वागणं एकाएकी का बदललं हेच समजत नाही. या चौघांच्या गोंधळात भर घालण्यासाठी ज्वेलर, पोलिस इन्स्पेक्ट,टॆक्सी ड्रायव्हर हजर आहेत. सगळा सावळा गोंधळ अखेरीस अर्थातच उलगडतो आणि ही सगळी भावंडं असल्याचंही समजतं.
हा सगळा गुंता ज्या क्र्मानं कळस गाठत जातो त्याला तोडच नाही. सगळी पात्रं आणि त्यांचा गोंधळ हसवून पुरेवाट करतो. अखेरचा बहादूर फाशी लावून घेण्यासाठी दोर विकत घ्यायला जातो तो प्रसं ग असो की पोलिस चौकितला हाराच्या बेपत्ता होण्याचा प्रसंग असो, सगळी भट्टी परफेक्ट जमली आहे.
गुलझारचा हा चित्रपट म्हणजे विनोदी चित्रपट कसा असावा याचा आदर्श नमुना आहे, याच कथेवर गुलझार यांनीच याधिही एक चित्रपट बनविला होता मात्र दुद्रैवानं तो जमला नाही. मात्र गुलझारला या कथानकाबद्दल इतका जबरी विश्वास होता की त्यांनी पुन्हा नव्यानं टिम जमवली आणि यावेळेस पूर्ण ताकदीनिशी कोणतिही उणिव न राखता चित्रपट काढला. यावेळेस मात्र त्यांचा अंदाज अचूक ठरला आणि चित्रपट झकास जमला. मूळ कथानक शेक्सपियरच्या "कॊमेडी ऒफ एरर्स"वर बेतलेलं आहे. आणि ते मूळ कथानकाइतकच अस्सल वठलं आहे. हा चित्रपट १९८२ साली प्रदर्शित झाला आणि आजही तितकाच ताजा आहे. यातलं "प्रितम आन मिलो" हे गाणं म्हणजे तर धमाल आहे. ज्यांनी हा चित्रपट अजुनही पाहिलेला नाही, त्यांना शिनू आवर्जून सांगेल की एकदा तरी बघाच.

Subscribe to:
Posts (Atom)