Sunday, June 12, 2016

स्टोरी टेलर इम्तियाज



इम्तीयाजच्या सिनेमांतली मला सगळ्यात आवडणारी गोष्ट काय माहितीय? तो कधीच कसला आव आणून गोष्ट सांगत नाही. त्यातलं साधं सोपं आणि हळवं जे असतं ते अगदी अलगद मनाला भिडतं. मग सो़चा था ना मधला मिस्टर कन्फ़्युज असो की जब वी मधली गीत. त्यांचं प्रेमातलं भांबावणं, रस्ता चुकणं मग चुकत माकत पुन्हा पटरीवर येणं असू दे की हायवेमधली वीराचं घरापासून भरकटणं असो. अगदी रॉकस्टारमधली आणि तमाशातली न जमलेली भट्टीही कंटाळवाणी वाटत असली तरिही बघाविशी वाटते. 
गोष्ट सांगायची प्रत्येक दिग्दर्शकाची आपली एक स्टाईल असते इम्तियाज गोष्ट कशी सांगतो, तर छान फ़ुलवत...बारकावे टिप...कधी कथेपासून भरकटत.. कधी तिचं बोट घट्ट पकडून ठेवत तो समोरच्याला कथेत गुंगवून ठेवतो. त्याच्या कथेतले
नायक नायिला कमी बोलतात (अपवाद गीतचा) त्यांचे चेहरे जास्त बोलतात. म्हणूनच एरवी बत्तमिझ दिल करत नाचणारा रणबीर रॉक स्टार आणि तमाशात अगदी वेगळा वाटतो. एरवी मटकणारी बेबो गीत म्हणून जास्त गोड वाटते. तिचं पूर्वार्धातलं बडबड करत समोरच्याला वैताग आणणं आणि नंतर एकदमच गप्प होऊन मिटून जाणं मनाला भिडतं. तमाशातली तारा एकाचवेळेस कॉर्पोरेट वुमन म्हणूनही कन्व्हिन्सिंग वाटते तशीच ती वेदच्या प्रेमात पडलेली आणि त्याच्या अनोळखी चेहर्‍यामुळं भांबावलेली साधी मुलगी म्हणूनही भावते. इतकंच काय पण आयेशा टाकियासारखी बरी हिरोईनही सोचा ना था मधे खूप छान वाटते.
कथेतला साधेपणा अगदी सहजपणानं तो समोरच्याला मान्य करायला लावतो म्हणूनच करोडपती विराचं ट्र्क ड्रायव्हरच्या प्रेमात पडणं जितकं सहजशक्य वाटतं तसाच वेद्ला आलेला न्युनगंडही विचित्र वाटत नाही. एकिकडे वास्तवाच्या नावाखाली पडद्यावर अवतरलेला शिवराळ अर्वाच्यपणा तर दुसरीकडे अगदी परग्रहावरचा वाटावा असा संस्कारी ओव्हरडोस, रोमॅंटिक हळवेपणा यात इम्तियाजचे चित्रपट जास्त खरे वाटतात. 

सैराट झालं जी

हा सिनेमा कसा आहे कसा नाही आणि बरंच काही....सगळं अगदी नको इतकं बोलून झालंय. अनेकांनी सैराट दहा वेळा पंचवीसवेळाही पाहिलाय. मला त्यांच्या सहनशक्तीबद्दल आदरच आहे तरिही मी अनेक आठवडे हा चित्रपट पाहिलाच नव्हता त्यामुळे माझ्याकडे मात्र काय विचित्र आहेस असं बघायचे सगळे. परवा एकदाचा पाहिला. आणि खरं अगदी मनापासून सांगायचं तर मला हा सिनेमा ठीक ठीक वाटला. म्हणजे मराठी चित्रपटांच्या तुलनेत उजवा आणि हिंदीच्या तुलनेत आणखि एक प्रेमकथा इतका बरा. सैराटची सोशलमिडिया झिंग बघता मी असं काही म्हणणं धाडस किंवा वेडेपणा होणार हे माहित आहे तरिही मला तरी मनापासून असंच वाटलं. म्हणजे यातले विनोद असोत की संवेदनशिल प्रसंग सोशल मिडियावर मला सगळंच जरा ओव्हररेटेड वाटलं. एकूणच जरा बटबटीतपणाकडे कललेलं. टिपिकल दक्षिणी छापाचे सिनेमे असतात नां तसं. इमोशन्स, नायिकेचं उफ़ाड्याचं दिसणं असो की नाच गाणी सगळंच जरा जास्तच.
कथा आणि मांडणी हा पूर्णपणे लेखक- दिग्दर्शकाचा निर्णय असतो त्यामुळे हे असं का ? तसं का नाही? वगैरेला काही अर्थ नाही. तरिही वास्तवाच्या जवळ जायच्या मोहापायी कथा वळणं घेत असतानाही त्यात तद्दन फ़िल्मीपणा डोकावत रहातोच. कदाचित हा इतका विचार या सिनेमासाठी केलाही नसता पण एकूण भारावल्या गेलेल्या जनतेमुळे इतका विचार करावासा वाटला. आपल्याला हा का भिडला नाही. अगदी आलाय मोठा साबण लावून वर बाकीचे आडवे तिडवे हसत असताना आपल्या चेहर्‍यावर फ़क्त एक हसू येऊन गेलं. हे असं का झालं असावं याचा विचार करता करता मनात आलं ते या ब्लॉगमधे लिहिलंय त्यामुळे हे अर्थातच वैयक्तिक मत आहे.
सगळ्यात महत्वाचं मला जाणवलं ते म्हणजे यातलं प्रेम हे शाररिक आकर्षणातून (नायक नायिकेचं वय गृहित धरून) सुरू होतं. थेटपणानं नाही दाखवलं तरी ते सूचवल्यासारखं अनेक ठिकाणी वाटतं. या चित्रपटानं संवेदनशिल विषय हुशारीनं हाताळलाय वगैरे आरती ओवाळलेल्यांनी ओलेत्या अर्चीकडं दूर्लक्ष केलंय. विहिरीत परशा उडी मारून वर जाताना अर्चीला ज्या ऎन्गलनं कॅमेरा न्याहळतो ती परशाची नजर समजायची का? म्हणून ती हुशारी वगैरे इथं व्यावसायिकच ठरतं. दुसरं महत्वाचं म्हणजे चित्रपटाची चर्चा होत राहिल अशा पध्दतीनं केलेलं मार्केटिंग.
जाता जाता यानिमित्तानं आठवलं म्हणून अवांतर- जर्नलिझमच्या दुसर्‍या वर्षाला असताना एफ़टीआयची एक कार्यशाळा झाली होती . विषय होता- एक्सप्लोयटेशन ऑफ़ वुमेन इन इंडियन सिनेमा. यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली होती पैकी एक होता चित्रपटातल्या गाण्यांचे शब्द आणि गाणी चित्रीत करताना लावले जाणारे कॅमेरा ऍन्गल. ओलेत्या अर्चीला पाहून त्या चर्चेची आठवण आली.  असो.
बाकी अजय अतुल चं संगित हे या चित्रपटाचं इंजिन आहे. त्याची झिंग चित्रपटापेक्षा किंचित जास्तच आहे. आणि अजय अतुल त्यांचं काम नेहमीच चोख करतात. असो. तर कोणाला काहीही वाटो मला हा एक बरा चित्रपट वाटला. म्हणजे मराठी चित्रपटांच्या इतिहासात माहेरच्या साडीचा जसा सर्वात जास्त कमाई करणारा असा उल्लेख आहे तसा आणि तितपतच उल्लेख करता यावा असा. बाकी आशय विषय मांडणी आणखि दहा वर्षांनी इतकी भिडेल का ही शंकाच आहे. जसा सिंहासन असो की उंबरठा आजही हे चित्रपट खिळवून ठेवतात. त्यांचं मराठी सिनेमांच्या प्रवासात उल्लेखनिय स्थान आहे अगदी त्यांनी कोटीच्या कोटी कमावले नसले तरिही. त्या तुलनेत सैराट हे एक मार्केटिंगच्या कौशल्यानं खपवलेलं उत्तम उत्पादन आहे. 

Saturday, June 11, 2016

Te3n

Te3n चं कसं झालंय नां, तरिही राही काही उणे. म्हणजे अमिताभ त्याच्या भूमिकेत फ़िट आहे, नवाझुद्दीन भाव खातो आणि विद्या तिला मिळालेल्या फ़ुटेजमधेही लक्षात राहिल असं काम करते. आता हे सगळं हे तिघेही मंझे हुए कलाकार त्यांच्या सगळ्याच चित्रपटांत करतात त्यामुळे त्यात वेगळं उल्लेख करावं असं काही नाही. आता कथा. तर खूप वेगळी म्हणावी तर तसंही नाही. एका पॉईंट्वर चतुर प्रेक्षक समजून जातो कथानक काय वळण घेणार हे.

अमिताभ नावाचं गारूड दिवसें दिवस जास्तच पक्कं होत चाललंय. पिकू मधला खव़चट, कुजकट म्हातारा असो की Te3n मधला खांदे पाडून चालणारा जॉन. या वयातही त्याला साजेशा भूमिका लिहिल्या जात आहेत आणि त्या प्रत्येक भूमिकेत तो भाव खाऊन जातोय हे सगळं अमिताभचा पंखा   म्हणून माझ्यासाठी तरी खूप भारी आहे. तरिही या नव्या चित्रपटात मात्र पटकथेनं असे काही चार दोन गोते खाल्लेत की एकूण परिणामाचा विचार केला तर तो कोमट होतो. सुरवातीला या चित्रपटाच्या जातकुळीला साजेशी वातावरण निर्मिती करतो, कथानक त्याच्या गतीनं पुढे सरकत रहातं, काही धागे सुटल्यासारखे वाटायला लागतात, पकड ढिली होतेय असं वाटतानाच मध्यंतरापर्यंतचा प्रवास झालेला असतो.
रहस्य त्यातही मर्डर मिस्टरी असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांनी खुनी कोण असावं याचे सतत अंदाज लावणं आणि कथानकानं चकवा देणं. ही भट्टी जमली तरच अनपेक्षित शेवट परिणामकारक ठरतो. या बाबतीत हा चित्रपट अपयशी ठरतो कारण शक के दायरे में इतकी कमी पात्रं आहेत की मध्यंतरानंतर काही मिनिटातच चतुर प्रेक्षक अंदाज लावून मोकळा होतो. खरं तर अपरिचित आणि बिनचेहर्‍याचा खुनी अपेक्षित दहशतही निर्माण करतो मात्र नंतर ती दहशत म्हणावी तशी मान करकचून धरत नाही. इथे चित्रपट घसरायला सुरवात होते याचं कारण याचवेळेस जॉननं (अमिताभ) त्याचा पुरावे गोळा करण्याचा प्रवास संपवत आणलेला असतो. हा प्रवास आणखि फ़ुलता तर परिणाम जास्त चांगला झाला असता.
आता इतकं सगळं असूनही समोर घडणार्‍या घटनांत प्रेक्षक गुंतून रहातो. माहित असलेल्या शेवटाकडे चित्रपट नेमका कसा जातो हे पहावसं वाटतं ही या चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू.
खरं तर चित्रपटाची जातकुळी शांत आहे आणि तो तसाच आहे. थंड डोक्यानं गुन्हा केल्यासारखा. पण का कोण जाणे मधेच घाई घाईत काही प्रसंग "आटपल्या"मुळे परिणामाला बाधा आली आहे. विद्या काही करेल करेल असं वाटत असतानाच तिची भूमिका संपूनही जाते. तिच्याजागी इतर कोणी असल्यानं काहीच फ़रक पडला नसता असं नंतर वाटतं. त्या अर्थानं तिला कथानकानं वाया घालवलंय.
नवाझुद्दीन मिस्टरी गडद करण्यात हातभार लावतो. त्याच्याकडे बघून इसके दिमाग में क्या चल रहा है? हे फ़िलिंग सतत येत रहातं.
अमिताभच्या खांद्यावर अर्थातच सर्वात जास्त जबाबदारी आहे आणि त्याचा खांदे पाडून चालणारा जॉन ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो. शेवटचं "हक है मुझे" गाणं आणि अमिताभचे त्यातले भाव तर केवळ अप्रतिम आहेत.
या सगळ्याच्या बरोबरीनं आणखि एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे "कोलकता". या शहराचं नाव घेतलं तरी एक विशिष्ट प्रतिमाच डोळ्यासमोर तरळते आणि ते जुनं (जुनाट म्हणण्याचा मोह आवरतेय कारण तो जुनाटपणा पडद्यावर इतका खुलला आहे की कथानक वजा हे कोलकता परिणाम आणखी कमी होईल). कहानी चित्रपटातही दुर्गा पूजेचा माहोल आणि टिपिकल कोलकता आपल्याला दिसतं. कथानकासोबत ते पुढे जातं तसंच याही चित्रपटात या कोलकता दर्शनाचा महत्वाचा भाग आहे.
हे सगळं जरी असलं तरी मधेच कथानकाचा पाय घसरतो. तो सावरायला जात असतानाच प्रेक्षकांना दीड एण्डचा अंदाज येतो.  असा घसरत पुन्हा सावरत शेवटाकडे जात मनात काही प्रश्न ठेवत चित्रपट संपतो.

Tuesday, April 14, 2015

फ़्लॅशबॅक : पिंजर


सिनेमाच्या यच्चयावत ब्लॉग्जवर सगळेजण नव्या सिनेमांबाबत लिहित असताना मी हा जुना सिनेम का बरं काढून बसले?(त्यात पुन्हा इतक्या मोठ्या विश्रांतीनंतर लिहित असताना). सांगायला कारण  काहीच नाही. पण काही काही कलाकृती मनात असतात, त्या त्या वेळेस काही कारणानं त्यावर लिहिणं होत नाही. मग पुन्हा काहीतरी निमित्त होतं आणि मनातलं उतरवावसं वाटू लागतं. मुळात हा ब्लॉग चित्रपट समिक्षणाचा वगैरे नाहीच आहे, सिनेमाच्या प्रचंड प्रेमापोटी या विषयावर मला जे जे लिहावासं वाटतं त्यासाठी आहे.
सिनेमाचा अभ्यास करत होते तेंव्हाच्या काळात प्रबंधाचा विषय होता, "कादंबरी आणि त्यावर आधारीत चित्रपट"....मुळात अभ्यास करत होते म्हणून नव्हे तर त्याही आधीपासून कागदावरची कथा पडद्यावर उतरते ती प्रक्रिया मला जाम आवडायची. अरे पुस्तकात हे असं लिहिलं होतं आणि पडद्यावर हे असं दिसतंय अशी तुलना मनात अजाणता होत रहायची. या विषयावर केलेल्या प्रबंधानं इतकंच झालं की, या सगळ्या प्रक्रियेकडे आता तंत्रशुध्द पध्दतीने बघता येण्याची नजर मिळाली. साहित्यकृतींवर आधारीत असे अनेक चित्रपट इतक्या वर्षांत पाहिले. काहिंच्या नोंदी झाल्या, काही नाही. काही नोंदी पुन्हा पुन्हा चित्रपट पहात गेल्यावर बदलल्या. पहिल्यांदा पहाताना झालेल्या नोंदीमध्ये आणि नंतरच्या नोंदीत बदल होत गेले. कसं असतं नं, आपण एखाद्या नवीन गावाला पहिल्यांदाच जात असतो त्यावेळेस पहिल्यांदा प्रवास करत असताना आपण मागे धावणारी झाडं, आजूबाजूचा परिसर पहात जातो, नंतरच्या दोन तीन प्रवासांत पहिल्यावेळेसच्या बघण्यात तपशिलवार निरीक्षणं जोडली जातात, तसंच हे आहे.
खूप वर्षांनी परवा झी क्लासिकवर पिंजर बघतानाही असंच झालं. बरंच काही असं होतं जे नव्यानं उमगत होतं. सिनेमा नवा नवा आला होता तेंव्हा अर्थातच त्याची चर्चा खूप होती. एका अत्यंत रसरशीत, जीवंत साहित्यकृतीवर आधारीत चित्रपट आणि उर्मिला मातोंडकरसाखी तद्दन व्यावसायिक चित्रपटांतील अभिनेत्री सोबत छोट्या पडद्यावरून आलेला गुणी मनोज वाजपेयी चंद्रप्रकाश व्दिवेदींसारखा दिग्दर्शक या सगळ्याचीच चर्चा जास्त होती. अर्थातच पहिल्यांदा चित्रपट बघताना किमान माझं तरी असं झालं की मी उर्मिलाचंच प्रगती पुस्तक उघडून बसले. तिला एकूण हे सगळं कितपत पेलतंय हे पहाणंच मला जास्त महत्वाचं वाटलं असणार, शिवाय या कथेला असणारा हिंदू-मुस्लिम धर्माचा, हिंदूस्थान-पाकिस्तान फ़ाळणीचा करकरीत काठ जरा बोचरा होताच. मग झाला नां गोंधळ.  बाकीचे तपशिल अनावधानानं फ़िकुटले. ते सारे तपशिल यावेळेस बघताना अधोरेखित होत समोर आले.
खरी गोष्ट पुरो आणि रशिद यांची असली तरिही कथेचा कॅनव्हास इतका जबरी की त्यात अपरिहार्यपणे पुरोचे जमिनदार  वडील, तिचा भावी पती रामचंद, जो जमिनदार असूनही पुढारलेल्या विचारांचा आहे, आगतिक आई, बहिणीवर माया करणारा भाऊ आणि त्याची अल्लड बायको हे सगळे महत्वाच्या भूमिका बजावतात. पुरो आणि रशिदची गोष्ट जास्त परिणामकारक होते ती या सगळ्यांमुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुरो हिंदू आणि रशिद मुस्लिम असल्यानं या सगळ्याला वेगळी धार लाभते. गोष्ट फ़ाळणीपूर्व हिंदूस्थानात सुरू होते आणि फ़ाळणीनंतरच्या भळभळीत काळात संपते. या गोष्टीतली मला सगळ्यात जास्त आवडलेली बाब म्हणजे एका वळणानंतर इथे हिंदू किंव मुस्लिम हे महत्वाचं न रहाता माणूसपण अधोरेखित होत जातं. माणूसपण म्हणजे अर्थातच माणुसकी नव्हे. मनुष्य हा देखिल प्राणी आहे आणि प्राणी हे जंगलीही असतात. प्राण्यांना जात नसते, धर्म तर अजिबातच नसतो. म्हणूनच फ़ाळणीची हिंदू-मुस्लिम पार्श्वभूमी या कथेत प्रवेशल्यानंतर हिंदू पुरो आणि मुस्लिम रशिद ही माणसं बनतात आणि बाकी सगळं धर्माचे मुखवटे घेऊन जंगल बनतं. या कथेत कोणते धर्मिक जास्त हिंस्त्र बनले याच्या तपशिलात न जाता पुरो आणि रशिदच्या गोष्टीचा धागा अत्यंत चिकाटीनं हातात ठेवण्याची कसरत जशी लेखिकेनं कागदावरच्या गोष्टीत यशस्वीरित्या पेलली आहे तशीच ती रूपेरी पडद्यावर दिग्दर्शकानंही पेलंली आहे. (नाहीतर पिंजरचा गदर होण काही फ़ार कठीण नव्हतं :)) फ़ाळणीची जखमच अशी आहे की ती उघडी होते तेंव्हा भळभळा वाहू लागते. अजूनही एक पिढी अशी आहे की तिच्या या आठवणीच्या जखमा ताज्या आहेत. हे होणं अर्थात सहाजिकच आहे.  तरिही या तपशिलांत जाण्याचा मोह आवरत ज्या आटोपशिरपणानं कथा या सगळ्या पार्श्वभूमीला बगलेत घेत पुढे जाते ते इतकं सहज घडलं आहे की वाचताना वाचक आणि पहाताना प्रेक्षकही या सगळ्यात अडकून पडत नाही. पुरो आणि रशिदच्या या पिंजरचा हा मला सगळ्यात मोठा गुण वाटतो.
फ़ाळणी जशी पार्श्वभूमीवर ठेवत हा चित्रपट पुढे सरकतो तसंच आणखी एक अगदी नोंद घेण्याजोगं परिवर्तन म्हणजे पुरोचं हळूहळू हमिदा बनणं. त्या काळाचा विचार करता पुरोनं रशिदला कबुल है म्हटल्यानंतरच ओघानंच तिचा धर्म बदलणं सहाजिक होतं. तरिही एकदम धप्पकन अंगावर आल्यागत तिचा धर्म बदलत नाही. सर्वात आधी तिचं दिसणं बदलतं मग नातेवाईकांच्या आग्रहाखातर रशिदचं तिच्या मनगटावर हमिदा गोंदविणं (जे त्या काळात सर्रास केलं जात असे) घडतं आणि पुरोची हमिदा बनून जाते. तरिही रशिदसमोर ती पुरो म्हणूनच उभी असते. ही आतली बाहेरची घालमेल आहे ती उर्मिलानं अचूक पोहचविली आहे. जे पहिल्यांदा चित्रपट बघताना (२००३) नोंदविण्याचं निसटून गेलं होतं, ते या वेळेस असं लख्खकन दिसलं. मुलगी ते पोक्त बाई आणि हिंदू मुलगी ते मुस्लिम गृहिणी हा प्रवास काही मिनिटात स्वीच ऑन, स्वीच ऑफ़ सारखा झाला हे जाणवू न देता अलगद समोर आणणं हे चित्रपटात कसरतीचं. कारण काही मिनिटांपूर्वीची रशिदचा व्देष करणारी पुरो रशिदसोबत संसार करू लागली, तिनं बंड केलं नाही की स्वत:ला संपविण्याचा फ़िल्मी नाटकीपणा केला नाही तरिही तिची चीड न येता रशिद तिला ज्या सहजतेनं स्वीकारतो त्याच सहजतेनं प्रेक्षकही स्वीकारतो. ही कसरत पेलणं कठीण काम होतं. तिचं बदलणं खड्यासारखं दातात न येता पुढे सरकतं आणि पात्रं महत्वाची न होता कथा महत्वाची ठरते.
पुढे लज्जोला-पुरोची वहिनी- वाचविताना तिच्या मदतीला हे मनगटावर गोंदलेलं हमिदा धावून येतं त्यातही अभिनिवेश नाहीच. एकाच कुटुंबातील दोन मुलींसोबत घडलेली घटना सारखीच मात्र लज्जोला कुटुंबानं स्वीकारणं आणि पुरोला नाकारलेलं असणं हेदेखिल पुरो समंजसपणानं स्वीकारते. फ़ाळणीनंतर काळ बदलला आहे आता मुस्लिमांनी पळवून नेलेल्या हिंदू मुली पुन्हा कुटुंबात परतत आहेत आणि कुटुंबियही त्यांना आपलसं करत आहेत हे समाज परिवर्तन अलगद उलगडत जातं. काही वर्षांपूर्वीच पुरोला मात्र कुटुंबियांनी नाकारलेलं असतं. आता संधी आहे आणि पुरोदेखिल परतू शकते. तिच्या परतण्याला रशिदची हरकत नाही तसंच तिला स्विकारण्यात तिच्या कुटुंबियांबरोबरच रामंदचीही (जो अद्याप अविवाहीत आहे)हरकत नाही. आता पुरोला मनाचा कौल घ्यायचा आहे. मनाच्या एका कोपऱ्यात रामचंदची पत्नीच असण्याची इच्छा बाळगून जगलेली पुरो, रशिदशी नाईलाजानं बांधलं गेल्याचं दु:ख घेऊ जगणारी पुरो अखेर रशिदच्या माणुसकीपुढे हार मानते. त्यानं केलेल्या गुन्ह्याला माफ़ करून टाकते आणि हिंदूस्थानात जाणाऱ्या नातेवाईकांना रशिदसोबत निरोप देते.  कथेचा शेवट काहीसा अपेक्षीतच असला तरिही पुरोच्या त्या निर्णयाची आपण वाट बघतो. अखेरच्या पानावरचा शेवट आणि अखेरच्या रीळातला शेवट तितकाच परिणामकारक असणं हे दोन्ही कलाकृतींचं यश आहे.
अर्थातच कादंबरी आणि चित्रपट अशी तुलना होते तेंव्हा माझा स्वत:चा कौल थोडा कादंबरीच्या बाजूनं झुकलेला असतो कारण कथा वाचताना तिच्यातली पात्रं आपण आपल्या मनात उभी केलेली असतात. त्यांच्या दिसण्यापासून वागण्या बोलण्यापर्यंतचे तपशिल आपण मनाशी चितारलेले असतात. पडद्यावर ही कथा उतरत असताना दिग्दर्शकाच्या मनातली पात्रं उभी रहातात आणि बऱ्याचदा त्यांच्या आणि आपल्या प्रतिमेत तफ़ावत दिसते मग समोर कितिही छान गोष्ट उभी रहात असली तरिही मनातल्या मनात तुलना होत समोरचं दिसणं फ़टकारलं, नाकारलं जात असतं (शाळा आणि दुनियादारीच्यावेळेस हा अनुभव अगदी प्रकर्षानं आला. स्वतंत्र कलाकृती म्हणून विचार केला तर दोनही चित्रपट सरस आहेत यात शंकाच नाही मात्र ज्यांनी पुस्तकरूपी कथा वाचल्या आहेत त्यांना चित्रपट तितका भिडला नाही हे देखिल वास्तव. असो.) पिंजरच्याबाबतीत मात्र हे तितकं होत नाही ही सुदैवाची गोष्ट म्हटली पाहिजे. त्या काळातलं लोकांचं दिसणं असो, गाव असो की कपड्यांचे आणि एकूणच फ़िल्मच्या रंगाचा पोत असो, मूळ कथेच्या जवळपास रहात पडद्यावर कथा साकारत जाते. ज्या प्रकारचा अभिनय या कथेत आवश्यक आहे तो सगळीचपात्रं साकारतात विशेषत: उर्मिला साकारते ही आणखी एक जमेची बाजू. पहिली काही मिनिटं ती रामूच्या, डेव्हिड धवनच्या चित्रपटातली उर्मिलाच वाटते, तेच एक्सप्रेशन्स, तेच भेदरलेले डोळे आणि वावर मात्र रशिद तिला पळवून नेतो त्या प्रसंगानंतर तिला भूमिकेचा सूर सापडल्यासारखी वाटते. हे बेअरींग अखेरच्या रीळापर्यंत कायम राहिलेलं आहे हे महत्वाचं. रशिद अर्थात मनोज वाजपेयी तर बाप माणूस आहे. एका क्षणात त्याची चीड यावी तर दुसऱ्याच क्षणात त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी हे अभिनयातून सहजगत्या केवळ तोच पोहचवू शकतो. इथेही त्याचा रशिद कव्हिसिंग होण्यात त्याच्या अभिनयाचा वाटाच महत्वाचा ठरला आहे. आपण केले कृतीचा पश्चाताप मनात घेऊन वावरणारा र्शिद, पुरोवर मनापासून प्रेम करणारा रशिद, काही काळापुरता बेभान झालेला आणि नंतर संयमी, समंजस झालेला रशिद, पुरोला मदत करणारा, तिला समजून घेणारा रशिद त्यानं अत्यंत बारकाव्यांसहित साकारला आहे.
या चित्रपटापूर्वीही खलनायकालाच नायक बनविण्याचा प्रयत्न करणारे तद्दन फ़ालतू तरिही गल्ला जमा केलेले अनेक चित्रपट येऊन गेले असले तरिही खलनायकाचा नायक सहजगत्या बनविणं, दर्शकांना यासाठी कन्व्हिन्स करणं काय असतं याचा धडा घ्यायचा असेल तर या सगळ्या हिरोंनी मनोजचा पिंजरमधला अभिनय पहावाच.

Wednesday, March 2, 2011

Marathi Song - Gho Mala Asla Hava .mp4

घो मला असला हवा गं बाई


काही सिनेमे नावावरून फ़ुटकळ वाटत असले तरिही ते मस्त असतात. मागे एका रविवारी झी टॉकीजवर "घो मला असला हवा गं बाई" या तद्दन साधारण नावाचा धमाल सिनेमा पाहिला. यावर लिहावं असं मनापासून वाटत होतं, त्याची कारणं दोन.
-एकतर सिनेमा खरोखरच मस्त जमलाय
-जाहिरात तंत्र न जमल्यानं आणि इतर काही कारणानं हा चित्रपट प्रेक्शकांपासून लांब राहिला.
-चित्रपटात कोकणातलं जे छायाचित्रण आहे हे इतकं गोड जमलंय त्यापुढे यश चोप्राचं स्वित्झरलंड फ़िकं पडेल.
-चित्रपटातली नायिका चिकण्या गटात मोडणारी आहे (मराठी नायिकांना ग्लॅमरचा झोत का नाही.) सोनाक्षी सिन्हाला अजून बांधेसूद केलं आणि उंची कमी केली तर जशी दिसेल तशी ही दिसते. मी तरी तिला पहिल्यांदा पाहिलं मला जाम आवडली (फ़क्त याच सिनेमात ती दिसली इतर कुठेच कशी नाही?)

चित्रपटाचं कथानक घडतं कोकणातल्या एका टुमदार आणि अत्यंत सुंदर रेखिव गावात. या गावात एका सधन म्हणजे कोकणातल्या साधारण गावात जितका सधनपणा दिसेल त्याप्रमाणे सधन असलेल्या घरात आपली नायिका (राधिका आपटे) रहाते. कामसू, सुंदर, स्पष्टवक्ती, रोखठोक (अगावू नाही) आणि साधी अशी नायिका वडिलांची (रविंद्र मंकणी)लाडकी आहे. हिचं जवळच्याच गावातल्या एका घरातल्या मुलाशी (निखिल रत्नपारखी), जो मुंबईत नोकरी करतो, लग्न ठरलेलं आहे. हिला नवरा कसा डॅशिंग हवा असतो शिवाय लग्न होण्यापूर्वी त्याला बघायचं असतं आणि स्वत:च्या पसंतिनं लग्न करायचं असतं. वडील अर्थातच याला तयार नसतात आणि तिदेखिल त्यांच्या शब्दाबाहेर नाही. एक दिवस मुंबईकर नवरदेव नावेतून गावातल्या धक्क्यावर उतरतात आणि ते ध्यान बघून नायिका हिरमुसली होते. मुंबईकर नवरदेव मुलिला बघितल्याशिवाय लग्न करणार नाही असा हट्ट करतात शिवाय तिला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. मध्यस्थाकरवी मुलिच्या घरी निरोप जातो की मुलाला मुलिला भेटायचं आहे. जागा आणि वेळ निश्चित होते. नवरदेव खुष होतात. प्रत्यक्षात मुलगी एकटी येत नाही तर जवळपास निम्मा गाव तिच्यासोबत असतो. (हा प्रसंग अगदी लव्हली जमलाय). नवरदेवाच्या रोमॅंटिक भेटिच्या स्वप्नाचा अगदी चुराडा होतो. हिच भेट पुढे लग्नाच्या "व्यावहारिक बोलण्यात" रूपांतरीत होते. नवरदेवाची आई (रिमा लागु) टिपिकल सासू आहे. ठोकून ठोकून मागण्या तर करतेच शिवाय मुलगी मुंबईला जाणार नाही तर शेतीभातीच्या कामात मदत करायला गावातच राहिल असंही ठणकावून सांगते. मुलिच्या घरचे वैतागतात पण करतात काय लग्नाचा बोभाटा आधिच झालेला असतो. शिवाय लग्नकार्य म्हणजे असं कमी जास्त असणारच हे समजून पुढच्या तयारीला लागतात. मुलगी मात्र मनातून नाराज होते. याच गावात साऊंडसिस्टिम पुरवण्याचं काम करणारा एक मुलगा असतो (ओमकार गोवर्धन) त्याच्याशी हिची आंखमिचोली सुरू होते. तो आधिपासूनच हिच्यावर लट्टू असतोच. हिच्या लग्नाचं लाईटिंग करण्याचं आणि साऊंडसिस्टिम लावण्याचं कंत्राटही यालाच मिळतं. ही पठ्ठी त्याला सरळच विचारते "करशिल का माझ्याशी लग्न"? तोही तयारिचा आहे. तो तिला सरळ सांगतो "तुझा बाप लावून द्यायला तयार असेल तर करतो की". ही नानाप्र्कारानं त्याला तयार करायला बघते. मात्र तो त्याच्या मर्यादा जाणून तिला प्रतिसाद देत नाही. हिची आज्जी मात्र तिच्या कानात सांगते की मनात असेल त्याच्याशिच लग्न कर काही झालं आणि काही करावं लागलं तरी. झालं, हिला ग्रीन सिग्नलच मिळतो. मात्र या सगळ्या गोंधळात तिचं लग्न लागतंही. सासरी येते आणि माप ओलांडायच्या आतच अंगात "बाहेरचं वारं" शिरल्यासारखं करायला लागते. सासू, नवरा सगळे घाबरतात. गुरूजी सांगतात अशा स्थितीत "गर्भाधान विधी" करू नका. तिला बरी होण्यासाठी माहेरी पाठवतात. माहेरचे काळजीत आणि ही खुष. पुढेही अशाच युक्त्या ती योजत रहाते. अखेरीस एक "गळ" असा लागतो की त्या एकाच गळात हिची नवरा, खाष्ट सासू यांच्यापासून सुटका होते आणि तिला हवा असलेला "घो" एकदाचा तिला सगळ्यांच्या संमतिनं मिळतो. हे सगळं राजीखुषीनं घडतं कोणाला संशयही येत नाही की हिचा सगळा कारभार आहे. मात्र हे सगळं घडून येण्यासाठी ती जे करते ते चित्रपटातच पहायला मजा आहे. असं नुसतं वाचून त्यातली गंमत अनुभवता येणार नाही.

सिनेमा चांगला असण्यासाठी जे जे लागतं ते सगळं यात आहे. सुंदर नायिका, देखणा नायक (त्यांनी भुमिकेचं घेतलेलं बेअरिंग), इतर सगळे कलाकार,(रविंद्र मंकणी, नीना कुलकर्णी, रिमा लागू, ज्योती सुभाष, डॊ. मोहन आगाशे, श्रीराम रानडे, शर्वरी लोहकरे) इतके मस्त भुमिकेत आहेत की ती प्रामाणिकपणानं गाववाले वाटतात.
सिनेमाचं संगीतही फ़ुल टू आहे. कोकणदर्शन हे सिनेमातलं एक महत्वाचं पात्र असल्याप्र्माणे आहे. चित्रिकरण तर केवळ अप्रतिम. दुसरा शब्द नाही. बांधिव कथा-पटकथा आहे. मांडणी सुबक आहे उगाच फ़ाफ़टपसारा नाही.

Monday, June 14, 2010

मस्त मस्त मुंबई-पुणे-मुंबई


फ़ेसबुकवरून सतीश राजवाडेंनी मुंबई-पुणे-मुंबईचं प्रमोशन सुरू केलं त्याचवेळेस हा सिनेमा सोडायचा नाही असं ठरवलं होतं. कारण सतीश राजवाडेंची स्टाईल मला खुपच आवडते. त्यातून मुंबईकर-पुणेकर हा वाद आवडता टाईमपास असल्यानं याकडे बघण्याचा त्यांचा सिनेमॅटिक दृश्टिकोन कसा असेल याची उत्सुकता होतीच. सेंट पर्सेंट धमाल असा हा चित्रपट लांबीला तसा कमी (तोकडा नव्हे) वाटतो. तसं पहायला गेलं तर अलिकडचे सगळेच माराठी सिनेमे बघताना असंच वाटत रहातं. सिनेमाच्या सुरवातिलाच यात पुढे काय असणार आहे याचा अंदाज येऊनही उठून जावसं वाटत नाही हे सिनेमाचं यश आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी ही कचकचीत नवीकोरी जोडी अख्खा सिनेमा चार खांद्यावर (दोघांचे दोन मिळून चार या अर्थानं अन्यथा या चार खांद्यांचा "त्या" चार खांद्यांशी तसा संबंध नाही) पेलून अलगद पुढे नेते. त्यातल्या त्यात डावं उजवं करायचंच तर कानातल्या बिकबाळीसहित स्वप्निल "लाजवाब". पुणेरी पोट्ट्याचं बेअरींग या मुंबईकरांनं तब्येतीत राखलंय. अखंड सिनेमाभर त्याची पुणेरी बडबड हशा पिकवत रहाते. या सिनेमाभर दोघंही एक जोडी कपड्यांवर वावरले आहेत (अपवाद स्वप्निलचं स्वप्नातलं गाणं) असलं लो बजेट काम हाय बजेट मनोरंजन आरामात करून गेलंय. एक छोटीशी कथा सतिश राजवाडेंनी ज्या अफ़लातून फ़ुलवलीय त्याला तोड नाही. ज्यांनी हा सिनेमा अजून पाहिलेला नाही त्यांनी डोळे झाकून तिकीट काढून डोळे उघडे ठेवून बघायला हरकत नाही.

जाता जाता- एका प्रसंगात (स्वप्निल आणि मुग्धा सीसीडीत बसलेले असताना) स्वप्निल ग्रील सॅंडवीचची ऑर्डर देताना ते कसं असायला हवं याची फ़ुटभर लांब सूचना देतो आणि प्रत्यक्षात खाताना मात्र साधं व्हेज सॅंडवीच खातो. हे कसं काय बुवा?

-मुंबई पुणे फ़ॅशनवरून वाद चाललेला असताना मुग्धा अचानकच स्वप्निलला "तू व्हर्जिन आहेस का?" हा प्रश्न का विचारते?

-सिंहगडावर हिंडताना मुग्धा हाय हिल्स (पेन्सिल हिल्स) घालून रॅम्पवर चालल्यासारखी कशी काय चालते?

-गल्लीत क्रीकेट खेळायला म्हणून घरातल्या अवतारात बाहेर पडलेला स्वप्निल खिशात डेबीट कार्ड का बाळगून असतो?

हे असे बारीक प्रश्न सिनेमा बघताना पडण्याची शक्यता आहे मात्र या सगळ्या बारीक शंकासहितही हा चित्रपट उत्तम आहे याबद्दल मात्र खात्री बाळगा.